Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

चौथ्या रोजगार मेळ्या अंतर्गत महाराष्ट्रात अडीच हजारांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान

नारायण राणे, डॉ. भागवत कराड ,कपिल पाटील आणि रामदास आठवले या केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते मुंबई, नागपूर, नांदेड आणि पुणे या चार ठिकाणी आयोजित रोजगार मेळ्यात उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान

राष्ट्रीय रोजगार मेळ्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले नियुक्तीपत्रांचे वितरण

मुंबई दि. १३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित करत विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या उमेदवारांना सुमारे ७१,००० नियुक्ती पत्रांचे वितरण केले. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणी मध्य रेल्वेच्या वतीने आयोजित आजच्या या चौथ्या रोजगार मेळ्यात महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी  एकूण २५३२ उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली,यांपैकी एकूण ६५० जणांना प्रत्यक्ष तर १८६२ जणांना ईमेल च्या माध्यमातून नियुक्ती पत्रे देण्यात आली.दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने नांदेड इथे आयोजित रोजगार मेळ्यात एकूण ३७० उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे आज झालेल्या कार्यक्रमात, केंद्रीय सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते २५ उमेदवारांना आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते १७५ अशी एकूण २०० नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, मध्य रेल्वेचे अतिरिक्त महा व्यवस्थापक अलोक सिंह, विभागीय रेल्वे  व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल आणि मध्य रेल्वेचे महा व्यवस्थापक नरेश लालवानी उपस्थित होते.

भारत आत्मनिर्भर आणि महासत्ता होण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरीकाने योगदान द्यावे असे आवाहन नारायण राणे यांनी यावेळी केले. आत्मनिर्भर भारताचा दृष्टिकोन  साकार करण्यासाठी रोजगार निर्मिती महत्वाची आहे आणि  त्यादृष्टीने केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत, असे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात स्थापन झाल्यांनतर भारताच्या अर्थव्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली असे राणे यांनी नमूद केले. नव्याने नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांनी सेवा देताना  प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा आणि शिस्त बाळगत तसेच जबाबदारी समजून काम करावे. आपण भारताचे एक सेवक आहोत त्यामुळे भारताच्या जनतेची सेवा करून देशाची प्रगती साधणं हे आपले कर्तव्य आहे, असे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.

नागपुरात अजनी येथील रेल्वे सामुदायिक सभागृहात केंद्रशासनाच्या सेवेत दाखल होणाऱ्या २१० उमेदवारांना नियुक्ती पत्राचे वितरण केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मध्य रेल्वेचे नागपूर क्षेत्र महाव्यवस्थापक तुषार कांत पांडे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभाग महाव्यवस्थापक नमिता त्रिपाठी, नागपूर क्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल शुभा मधाळे प्रामुख्याने उपस्थित होते .

केंद्र शासनाच्या सेवेत नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांनी आपले ज्ञान वाढवण्यासाठी सतत अभ्यास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, आपल्या अभ्यासाचा जीवनात तसेच समाजासाठी उपयोग, कठोर मेहनतीसोबतच सोबतच स्मार्ट वर्क त्याचप्रमाणे आरोग्याची काळजी या पंचसुत्रीवर लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन कराड यांनी यावेळी बोलताना केले. भारत हा जगातील सर्वात युवक असलेला देश आहे. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करण्याकरता केंद्रशासन विशेष लक्ष देत आहे, असे ते म्हणाले.

नागपूर येथे आज २१० नियुक्तीपत्र वितरित केले  असून त्यामध्ये रेल्वे विभागात १५६ डाक विभागात ५, भारतीय खाण विभागात १७, आयकर विभागात – १६, केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये – 1, केंद्रीय भूजल मंडळात – 1 नवोदय विद्यालय समितीमध्ये 1 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था येथे 1. त्याचप्रमाणे आरोग्य विभाग एम्स मध्ये 1 अशा २१० नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले.

नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालय संकुलातील नियोजन भवनातील मुख्य सभागृहात रोजगार मेळा योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या नवनियुक्त उमेदवारांना कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते रेल्वे विभागातील ३४० तर टपाल विभागातील ३० उमेदवारांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

देशाच्या अर्थव्यवस्थेने जगात पाचव्या क्रमांकावर घेतली यात युवा वर्गाचे मोठे योगदान आहे असे सांगत देशाच्या विकासात विविध मंत्रालयातील नवनियुक्त उमेदवारांनी भरीव योगदान द्यावे असे आवाहन कपिल पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या विकासासाठी करत असलेल्या कार्याची प्रशंसा आंतराष्ट्रीय स्तरावर होत आहे. नरेंद्र मोदी यांचे देशाप्रती असलेले प्रेम आणि ते देशाच्या विकासासाठी करत असलेली मेहनतीची आंतराष्ट्रीय माध्यमांनी दखल घेतल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या  संस्कृतीचे, वारशाचे जतन करण्याचे मोठे काम  केंद्र सरकारने हाती घेतले आहे, असे पाटील यांनी सांगितले.

पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासकीय प्रबोधिनी ‘यशदा’ इथे आज झालेल्या रोजगार मेळाव्यात १६१ जणांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या मुख्य व्यवस्थापक रेणू दुबे आणि अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक  ब्रिजेशकुमार सिंह हे यावेळी उपस्थित होते.

आजच्या तरुणांनी देश उभारणीच्या आणि विकासाच्या प्रक्रियेत भरीव योगदान देण्याचे आवाहन यावेळी आठवले यांनी केले. आजचा तरुण हा तांत्रिक क्षमतेमध्ये अग्रेसर असून त्याच्या जवळील या कौशल्याचा उपयोग समाज निर्मितीसाठी करणे आवश्यक असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले .

आज झालेल्या या रोजगार मेळाव्यात  रेल्वे , बँक,  संरक्षण मंत्रालय, टपाल, केंद्रीय राखीव सुरक्षा बल, हिंदुस्तान पेट्रोलियम, आदी विविध विभागातील नियुक्ती पत्रांचा समावेश आहे .

रोजगार मेळाव्याविषयी

रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेचे हा रोजगार मेळा एक पुढचे पाऊल आहे.

केंद्र शासनाने आतापर्यंत चार रोजगार मिळावे आयोजन केले असून यापैकी २२ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित पहिल्या मेळाव्यात ७५ हजार २२६, २२ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित दुसऱ्या रोजगार मेळाव्यात ७१ हजार ५६, २० जानेवारी २०२३ रोजी तिसऱ्या रोजगार मेळाव्यात ७४,४२६ तर १३ एप्रिल २०२३ रोजी आयोजित चौथ्या रोजगार मेळाव्यात ७१ हजार ५०६ उमेदवारांना देशभरात नियुक्तीपत्र दिले आज झालेल्या रोजगार मेळाव्यात उमेदवारांना ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, सीनियर कमर्शियल क्लर्क कम तिकीट क्लर्क, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, ज्युनियर अकाउंटंट, पोस्टल असिस्टंट, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, सीनियर ड्राफ्ट्समन, जेई/पर्यवेक्षक, सहाय्यक प्रोफेसर, शिक्षक, यांसारखी पदे तसेच  ग्रंथपाल, परिचारिका, परिविक्षा अधिकारी, पीए, एमटीएस या पदांची नियुक्ती पत्रे देण्यात आली .

विविध सरकारी विभागांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या या सर्व कर्मचाऱ्यांसाठी असलेला ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम ‘कर्मयोगी प्रमुख’ या मंचाच्या माध्यमातून नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी मिळणार आहे. या चारही ठिकाणी आयोजित कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह नियुक्त उमेदवार, त्यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *