राज्यात पावसाचा जोर कायम; रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांत रेड अलर्ट निर्गमित
मुंबई, दि. २५: राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट निर्गमित केला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे, तर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रायगड, पुणे, लातूर, नांदेड, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांना विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्या पाऊस ओसरण्याचा अंदाज आहे. दरम्यान, राजधानी मुंबईत सकाळपासून वातावरण ढगाळ असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत.
