
राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाच्या प्रगतीचा घेतला आढावा
“चित्रपट वारसा अभियान भारतीय चित्रपटांचा ठेवा जतन करण्याच्या प्रयत्नांना नवसंजीवनी देत आहे” – अनुराग सिंह ठाकूर
पुणे, दि. १२: केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार व क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ११ मार्च २०२३ रोजी पुणे दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (एनएफडीसी) भेट दिली आणि राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान अंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान भारतीय चित्रपटांचा ठेवा जतन करण्याच्या प्रयत्नांना नवसंजीवनी देत आहे, पूर्वी सहजपणे उपलब्ध नसलेले अनेक चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम दर्जा राखून उपलब्ध करून दिले जातील, तसेच पुढील १०० वर्षे आणि त्याहून अधिक काळासाठी भारतीय चित्रपटांचे दीर्घकालीन जतन खात्रीने केले जाईल, असे ठाकूर म्हणाले.
राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान जोमाने सुरु आहे. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ३ मोठे प्रकल्प सुरु आहेत: चित्रपटांचे डिजिटायझेशन, चित्रपट रील्सचे जतन आणि चित्रपट पूर्वस्थितीत आणणे. चित्रपटांचे जतन करण्याच्या दृष्टीने हे सर्व प्रकल्प प्रचंड मोठे आहेत आणि जागतिक स्तरावर अशा प्रकारचे प्रयत्न यापूर्वी कधीही करण्यात आलेले नाहीत. आतापर्यंत, १२९३ चित्रपट, १०६२ लघुपट आणि माहितीपट, 4K व 2K रिझोल्यूशनमध्ये डिजीटाईझ करण्यात आले आहेत. याशिवाय २५०० चित्रपट लघुपट आणि माहितीपट डिजिटायझेशनच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. दरम्यान, १४३३ सेल्युलॉइड रिल्सच्या संवर्धनाची कामे पूर्ण झाली आहेत. जगातील चित्रपट संवर्धन क्षेत्रातील आघाडीची तज्ज्ञ कंपनी ‘लीमॅजिन रिट्रोव्हाटा’ या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या सहकार्याने अत्यंत काळजीपूर्वक हे काम करण्यात आले आहे. अनुराग सिंह ठाकूर यांनी एनएफडीसी-एनएफएआयच्या संकुलात नव्याने उभारलेल्या चित्रपट संवर्धन प्रयोगशाळेचीही पाहणी केली, या ठिकाणी सेल्युलॉइड रील्स संवर्धनाचे काम सुरु आहे. पुढील काही महिन्यांत आणखी शेकडो चित्रपटांचे जतन केले जाईल, तर काही रील्स या दुर्मिळ भारतीय चित्रपटांच्या शिल्लक राहिलेल्या प्रती असू शकतात. एनएफडीसी-एनएफएआयने अलीकडेच चित्रपट पूर्वस्थितीत आणण्याचे काम सुरु केले असून २१ चित्रपट डिजिटलरित्या पुनर्संचयित केले जात आहेत. पुढील ३ वर्षांमध्ये, अनेक चित्रपट, लघुपट आणि माहितीपट डिजिटल पद्धतीने पूर्वस्थितीत आणले जातील.