२२ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठवता येणार; उत्कृष्ट छायाचित्रांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र
मुंबई, दि. १२ : मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून ते तिच्या सांस्कृतिक वैभवापर्यंत आणि दैनंदिन जगण्यातील छोट्या-छोट्या क्षणांपर्यंत शहराचे अनेक पैलू छायाचित्रांमधून टिपण्याची संधी छायाचित्रप्रेमींना मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), पर्यटन विभाग आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुंबई पर्यटन’ उपक्रमांतर्गत ‘मुंबई शहराच्या विविध छटा’ या विषयावर छायाचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रवेशिका पाठवता येणार आहेत.
स्पर्धेत मुंबईच्या केवळ प्रसिद्ध पर्यटनस्थळांचे छायाचित्रण करण्याऐवजी शहराचे वेगळे अनुभव आणि त्यामागच्या कथा मांडण्यावर भर देण्यात आला आहे. मुंबईची संस्कृती, उत्सव, ऐतिहासिक वारसा, निसर्ग, वास्तुकला, व्यक्ती तसेच शहरातील दैनंदिन जीवनातील प्रसंग यापैकी कोणताही पैलू सर्जनशील पद्धतीने छायाचित्रातून सादर करता येणार आहे.
एका स्पर्धकाला एकच छायाचित्र
प्रत्येक सहभागीला या विषयाशी संबंधित एक मूळ छायाचित्र सादर करता येईल. छायाचित्र उच्च दर्जाचे असून जेपीईजी किंवा जेपीजी स्वरूपात असणे आवश्यक आहे. त्याचा आकार कमाल १० एमबी असावा.
छायाचित्रात किरकोळ स्वरूपाचे संपादन करण्यास परवानगी आहे. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार केलेली छायाचित्रे स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाहीत. तसेच छायाचित्रावर कोणताही मजकूर, चौकट, लोगो किंवा वॉटरमार्क लावलेला नसावा.
प्रवेशिकेसोबत संबंधित छायाचित्र स्पर्धेच्या विषयाशी कशा प्रकारे जोडलेले आहे, याचे संक्षिप्त वर्णनही द्यावे लागणार आहे. सहभागीचे नाव आणि संपर्क क्रमांकासह प्रवेशिका mumbaitourism@maharashtratourism.gov.in या ई-मेल पत्त्यावर पाठवायची आहे.
प्राप्त छायाचित्रांची सुरुवातीला स्पर्धेच्या नियमांनुसार छाननी केली जाईल. पात्र ठरलेल्या प्रवेशिकांचे एमटीडीसीने नियुक्त केलेल्या परीक्षकांकडून परीक्षण होईल. छायाचित्राचे विषयाशी असलेले नाते, कल्पकता, रचना, तांत्रिक गुणवत्ता आणि एकूण परिणामकारकता हे प्रमुख निकष असतील. मुंबईची एखादी कथा, भावना किंवा शहराकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन प्रभावीपणे मांडणाऱ्या छायाचित्रांना विशेष महत्त्व दिले जाणार आहे.
प्रथम तीन क्रमांकांना पारितोषिक
स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिकासह प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पात्र प्रवेशिका सादर करणाऱ्या अन्य सहभागींसाठीही सहभाग प्रमाणपत्राची तरतूद करण्यात आली आहे. विजेत्यांचा एमटीडीसीकडून अधिकृत समारंभात गौरव केला जाणार आहे.
स्पर्धेसाठी सादर केलेल्या छायाचित्रांचे कॉपीराइट हक्क एमटीडीसीकडे राहणार आहेत. मुंबई पर्यटनाच्या प्रसिद्धीसाठी, विविध प्रकाशनांमध्ये किंवा इतर संबंधित कारणांसाठी या छायाचित्रांचा वापर केला जाऊ शकतो. अशा वेळी लागू असल्यास संबंधित छायाचित्राच्या कॉपीराइट धारकाला योग्य श्रेय दिले जाईल.
एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश आर. गटणे म्हणाले की, “मुंबई हे असंख्य कथा आणि अनुभवांनी समृद्ध असे शहर आहे. प्रत्येक अनुभव मुंबईच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाची वेगळी झलक दाखवतो. या स्पर्धेच्या माध्यमातून छायाचित्रप्रेमींनी आपल्या सर्जनशील नजरेतून हे क्षण टिपावेत आणि मुंबईची विविध रूपे जगासमोर आणावीत, असे आमचे आवाहन आहे.”
स्पर्धेबाबत अधिक माहिती किंवा आवश्यक चौकशीसाठी ९४२५७१७५२९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे नेहमीच्या नजरेऐवजी कॅमेऱ्याच्या वेगळ्या दृष्टीने पाहणाऱ्या छायाचित्रप्रेमींसाठी ही स्पर्धा आपल्या कलाकृतीला व्यासपीठ मिळवून देण्याची संधी ठरू शकते.
