आझाद मैदानावरील उपोषणावर जरांगे ठाम; “सरकारने आमचा अधिकार हिरावून घेऊ नये”
मुंबई, दि. १२ : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याच्या भूमिकेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ठाम असून, आंदोलनासाठी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून परवानगी मागितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार हिरावून घेतला जाऊ नये, अशी मागणी करत त्यांनी सरकारवर कायद्याच्या चौकटीत वागण्याचे आवाहन केले.
मुंबईत होणाऱ्या प्रस्तावित उपोषणाबाबत बोलताना जरांगे पाटील यांनी प्रशासनाकडे आवश्यक अर्ज सादर केल्याची माहिती दिली. आंदोलन पूर्णपणे शांततेत आणि लोकशाही पद्धतीने होणार असल्याचे सांगत, सरकारने अडथळा निर्माण करण्याऐवजी कायदेशीर अधिकारांचा आदर करावा, असे त्यांनी म्हटले.
सरकारवर गंभीर आरोप
सरकारच्या भूमिकेवर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारने आमचा अधिकार हिरावून घेऊ नये.” त्यांच्या मते, न्यायव्यवस्थेचे नियम सरकारनेही पाळले पाहिजेत आणि नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचा सन्मान केला गेला पाहिजे.
तसेच, “सरकार न्यायदेवतेपेक्षा स्वत:ला मोठं समजत आहे.” असा आरोप करत त्यांनी सरकार मनमानी करत असल्याचा दावा केला. कायदा आणि संविधानाच्या चौकटीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.
आझाद मैदानावरच उपोषणाचा निर्धार
मुंबईतील आंदोलनाबाबत कोणताही संभ्रम नसल्याचे सांगत जरांगे पाटील म्हणाले की, “उपोषण आझाद मैदानावरच होणार.” त्यांनी पुढे “मुंबईत आमचं कोणतंही विघ्न होणार नाही, सरकारनेच आमचे विघ्न बनू नये ही आमची अपेक्षा आहे.” असेही नमूद केले. सरकारने न्याय दिला नाही तर न्यायालयाकडून न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी न्यायव्यवस्थेला सर्वसामान्यांचा आधार असल्याचे सांगितले.
गणपतीच्या काळात सरकारला आवाहन
सरकारला उद्देशून जरांगे पाटील म्हणाले, “सरकार गणपतीला मानणारे असेल तर त्यांनी विघ्न बनू नये.” तसेच, “सरकार कायद्याला लोकशाहीला माननानरे असेल तर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे” त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. आंदोलनासाठी आवश्यक सर्व नियम पाळण्याची तयारी असल्याचे सांगताना त्यांनी सरकारने आडमुठी भूमिका घेऊ नये, असेही आवाहन केले.

अंतरवाली सराटीत उद्या निर्णायक बैठक
पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी उद्या दुपारी १२ वाजता अंतरवाली सराटी येथे बैठक होणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली. या बैठकीला राज्यभरातील मराठा बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा, मुंबईतील उपोषणाची तयारी आणि त्यासंबंधीच्या निर्णयांवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पुढील टप्प्याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
