Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नांदूरमधमेश्वर अभयारण्यात जागतिक पाणथळ दिन साजरा

नांदूरमधमेश्वर अभयारण्यात जागतिक पाणथळ दिन साजरा

नाशिक, दि. ४: नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारीतील नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात गुरुवारी जागतिक पाणथळ दिन साजरा करण्यात आला. चापडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक वन्यजीव विभागातील सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी भूषविले तर ज्येष्ठ पक्षिमित्र दत्ताकाका उगावकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. उत्तमराव डेर्ले, डॉ. अविनाश घोळवे, पक्षीमित्र आनंद बोरा, चापडगावचे सरपंच बबड दराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सायखेडा येथील व्ही. एन. नाईक महाविद्यालय तसेच जनता इंग्रजी शाळा, निफाड येथील गणपतदादा मोरे महाविद्यालय, भाऊसाहेब नगर येथील कर्मवीर काकासाहेब वाघ विद्यालय या शाळांतील तीनशेहून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पाणथळ भूमी संरक्षणाची शपथ दिली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, अध्यक्ष गणेश रणदिवे यांनी पाणथळ भूमीच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहून योगदान देण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात विद्यार्थी आणि वनविभागाचे अधिकारी यांच्यातील खुल्या संवादवजा चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक वन रक्षक गणेश रणदिवे, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले तसेच इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन केले.

नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याविषयी संक्षिप्त माहिती:

भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या ७५ रामसर स्थळांपैकी नांदूरमधमेश्वर हे २८ व्या क्रमांकाचे रामसर स्थळ आहे तर महाराष्ट्रातील ३ रामसर स्थळांपैकी प्रथम क्रमांकाचे रामसर स्थळ आहे. सुमारे ११९८.६५७ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या अभयारण्यात ५३६ प्रकारच्या जमिनीवरील आणि पाण्यातील वनस्पती आढळतात. तसेच येथे ७ प्रकारचे सस्तन वन्यप्राणी, ३०० जातींचे पक्षी, २४ प्रकारचे मासे आणि तब्बल ४१ प्रकारची फुलपाखरे आढळतात. बर्ड लाईफ इंटरनॅशनल या संस्थेने निश्चित केलेल्या महत्त्वाच्या पक्षीविषयक क्षेत्रांमध्ये या अभयारण्याचा समावेश होतो. हे अभयारण्य स्थलांतर करणाऱ्या पक्षांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या ९ जागतिक उड्डाण मार्गांपैकी मध्य आशियायी उड्डाणमार्गाच्या कक्षेत येत असून ते स्थलांतर करणाऱ्या पक्षांसाठी सोयीचा आणि सुरक्षित निवारा तसेच हिवाळी क्षेत्र उपलब्ध करून देते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *