
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कवयित्री पल्लवी माने यांनी मांडलेय कालौघानुसार बदलत्या स्त्री चे भावविश्व
आज जागतिक महिला दिना निमित्त स्त्रियांचे विश्व, त्यांचे अवकाश मांडताना काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात कि स्त्री मग ती भारतीय असो, मेक्सिकन असो, किंवा मग ती अमेरिकन वा रशियन अशा कोणत्याही वंशाची स्त्री हि एकाच गाभ्यातून साकारली गेली आहे. तिची भावनिक पातळी, तिची विचार करण्याची वृत्ती, आणि कार्यक्षमता यात एक समान धागा आहे. प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर तिचे भावविश्व हे बदलत जाते. मुलगी, बहिण, आई, आणि इतर अनेक नाती जपताना ती अनेक स्थित्यंतरांमधून तावूनसुलाखुन निघते. करिअर आणि कुटुंब यात कसरत करत राहते, तिच्या लेखी हा रोजचा जगण्याचा भाग आहे. यात तिला इतर बाह्य घटकांकडून कितपत मदत मिळते किंवा साथ मिळते हे व्यक्तिपरत्वे, स्थानपरत्वे बदलत जाते. पण तरीही मूळ गाभा तोच.
मी मेक्सिकन स्त्रिया जवळून पाहिल्या. जवळजवळ त्या भारतीय संस्कृतीत असणाऱ्या पुरातन स्त्रियांचेच प्रतिनिधित्व करतात. त्यांचीही स्वप्ने लग्न, कुटुंब, पडेल ते काम करून चार पैसे कमवणे इतकीच दिसतात. यात मुळात फार उच्च पदाधिकारी बनण्याचा अट्टाहस नसतो. भले त्या लोकांचे घर क्लीनिंग चे काम घेतील किंवा एखाद्या फास्टफूड मध्ये फूड पॅक करतील पण, यात दर तासाला चांगले पैसे मिळवणे इतकाच भाग असतो. त्या मानाने अमेरिकन स्त्रिया जास्त शिक्षित आहेत आणि रियल इस्टेट, बँक, शाळा, हॉस्पिटल, अशा विविध क्षेत्रात काम करताना दिसतात. पण एक मात्र नक्कीच कि भारतीय स्त्रिया करिअर ला फार प्राधान्य देतात. एक किंवा दोन मुले इतकेच छोटे कुटुंब ठेवतात. इथे अमेरिकेत सरकार जितके मोठे कुटुंब तितके करांमध्ये मधे सवलत देते, सरकारी योजनांचा फायदा मिळतो कदाचित या मुळे ही असेल पण कमीतकमी चार मुले तरी प्रत्येकीला दिसतात आणि गमतीचा भाग असा कि या सात-आठ मुलांच्या मदर्स भारतीय स्त्री पेक्षा अधिक कार्यक्षम आणि उत्साही असतात. मुळात त्यांचे मुलांना जन्म देणेच अगदी अठरा, ऐकोणिस या पासून चालू होते. वयाच्या तिशी पर्यन्त त्या आठ नऊ मुलांच्या आया असतात. बरं यात लग्न संस्था मजबूतच हवी असे काही नाही. यात बिना लग्नाची मुले आणि मुले झाल्यावर लग्न हा ही कॉमन भाग आहे. हा सगळा झाला संस्कृतीचा भाग. पण स्त्रिया या अधिक कणखर आणि प्रसन्न असतात हे अगदी नक्की.
असं म्हणतात कि स्त्री समृद्ध होत जाते आणि ती कुटुंबाला ही समृद्ध करते हे ८० टक्के जरी खरे असले तरी पुरुष ही कुटुंब संस्थेचा पायाच आहे. मुळात स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना पूरक आणि अनुकूल आहेत. निसर्गाने ती मांडणीच तशी केली आहे. काळानुरूप बदल हा अटळ आहे. कारण निसर्ग बदलत जातो तसेच मानवी भावविश्व ही. स्त्रिया अधिक भावनिक किंवा सेंसिबल असतात पण तरीही त्या स्वतःला बॅलेन्स करायला शिकल्या आहेत.
पूर्वीची आईची प्रतिमा म्हणजे उरलेले शिळे अन्न खाणारी आई, अंगाई गाऊन जोजवणारी आई, आता आई डायट कॉन्शियस आहे. आता आई बॉलीवुड हॉलीवुड च्या गाण्यांवर रील्स ही बनवते. तिला स्वतःचा चॉइस आहे. निर्णय घेण्याची क्षमता आहे. अर्थातच ‘अर्थ’ हातात असले कि तिच्या निर्णयालाही अर्थ द्यावा लागतो, आणि येतोही.
सौंदर्याच्या कल्पना जशा ज्याच्या त्याच्या नजरेतून असतात तशाच स्त्री बाबतीतही. मग ती ऊंच असो ठेंगणी, तरतरित नाकाची असो वा नकटी ती एका मराठी गाण्याच्या ओळीप्रमाणे “तू चंचला, तू कामिनी, तू पद्मिनी, तू रागिणी तना-मनात माझिया तुझी सदैव मोहिनी” अशीच असते आणि कालातीतअशीच राहिल !
पल्लवी माने, अमेरिका डेनवर