Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या कोणत्या संकेतस्थळावर उद्योगांना कुशल मनुष्यबळ तर इच्छुकांना रोजगार संधींची माहिती मिळेल

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

संकेतस्थळावर उपलब्ध सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे उद्योजक आणि त्यांना आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळामध्ये समन्वय साधून दोघांनाही उपयोगी ठरणारे माध्यम तयार करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

खाजगीशासकीय रोजगारसंधींची माहिती होते उपलब्ध

बेरोजगार तरुणांसाठी या संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी त्यांनी संकेतस्थळावर त्यांच्या शैक्षणिक आणि इतर माहितीसह नोंदणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे आवश्यकतेनुसार एखाद्या उद्योग अथवा आस्थापनेकडून त्यांना जॉब ऑफर मिळू शकते. याशिवाय नोकरी साधक (नोकरी शोध) याठिकाणी क्लिक केल्यावर रोजगार यादी, क्षेत्र, स्थान व शिक्षणानूसार रोजगार संधींची माहिती मिळते. विविध माध्यमांमध्ये प्रसिध्द होणाऱ्या रिक्त पदांच्या जाहिराती पाहण्यासाठी “रिक्तपदांच्या जाहिराती” (Vacancy Advertisement) या टॅबव्‍दारे माहिती मिळू शकते. शासकीय तसेच खासगी अधिसूचीत रिक्तपदांची माहिती, त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करणे, राज्यभरात आयोजित होणाऱ्या रोजगार मेळाव्यांची माहिती मिळवणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमात सहभागी होणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे आणि सहभाग घेणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंरोजगारासाठी योजनांची माहिती मिळविणे व लाभ घेण्यासाठी उचित योजनेंतर्गत प्रकरण सादर करणे आदी कार्यवाही करता येते.

उद्योजकांना मिळते नोकरी इच्छुक उमेदवारांची माहिती

संकेतस्थळावर उद्योजकांसाठीही विविध सुविधा उपलब्ध आहेत. नोंदणी केलेल्या नोकरीइच्छुक उमेदवारांची माहिती, त्यांचे शिक्षण, कौशल्य, अनुभव, ठिकाण याप्रमाणे एकत्रितरित्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. याशिवाय उद्योजक म्हणून नोंदणी करणे, नवीन प्लांट, शाखेची स्वतंत्र नोंद करणे, वेळोवेळी निर्माण होणारी रिक्‍तपदे अधिसूचित करणे, त्याअन्वये नोंदविलेल्या मागणीनुसार सिस्टीमद्वारे पुरस्कृत पात्र उमेदवारांची यादी मिळविणे, या पदांची विनामुल्य प्रसिद्धी करणे, ही यादी पीडीएफ किवा एक्सेलमध्ये डाऊनलोड करणे, मुलाखती आयोजित करणे, प्राथमिकरित्या निवडलेल्या उमेदवारांना सिस्टीमद्वारे विनामुल्य एसएमएस पाठविण्याची सुविधा, मुलाखत प्रक्रियेनंतर रुजू झालेल्या उमेदवारांचे प्लेसमेंट ऑनलाईन नोंदविणे आदी कार्यवाही करता येते. उद्योजकांना सीएनव्ही कायदा १९५९ अंतर्गत बंधनकारक असलेले त्रैमासिक मनुष्यबळ विवरणपत्रही या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करता येते.

संकेतस्थळावर रोजगार विषयक सर्व सेवा ह्या उद्योजक आणि उमेदवार या दोघांनाही विनामुल्य उपलब्ध आहेत. सर्वांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे देऊ केलेल्या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. याबाबत काही अडचणी असल्यास जिल्ह्यातील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी संपर्क साधावा.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *