Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

प्राथमिक शिक्षण हे केवळ मातृभाषेतच हवे – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू

प्राथमिक शिक्षण हे केवळ मातृभाषेतच हवे – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू

नागपूर येथील अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे उद्घाटन

नागपूर: भाषेला जाती किंवा धर्माच्या दृष्टिकोनातून न बघता संस्कृत भाषेचा प्रचार हा साध्या, सोप्या भाषेत करुन त्याची शब्दावली आजच्या आवश्यकतेनुसार समृद्ध करणे आवश्यक आहे. वैयक्तिक जीवनात स्थानिक भाषा ही अत्यंत महत्त्वाची असून, प्राथमिक शिक्षण हे केवळ मातृभाषेतच व्हायला हवे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.

कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापिठातर्फे सुरेश भट सभागृहात त्रिदिवसीय अखिल भारतीय प्राच्यविद्या संमेलनाचे उद्घाटन उपराष्ट्रपती श्री. नायडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, परिषदेचे आयोजक आणि विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. श्रीनिवास वरखेडी, अखिल भारतीय प्राच्याविद्या परिषदेचे अध्यक्ष प्रा. गौतम पटेल, कार्यकारी सचिव प्रा. सरोजा भाटे, स्थानिक सचिव प्रा. मधुसूदन पेन्ना आणि कुलसचिव प्र. सी. जी. विजयकुमार यावेळी उपस्थित होते.

संस्कृत ही सर्व भाषांची जननी असून, विविध भाषेची सुरुवात संस्कृत या भाषेपासून झाली आहे. इतिहासाचे अध्ययन करण्यासाठी प्राच्यविद्येचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगताना उपराष्ट्रपती म्हणाले की, वैयक्तिक जीवनात तसेच प्रशासनिक कार्यामध्ये स्थानिक भाषा महत्त्वाची आहे. मातृभाषेतून भावभावना, संकल्पना, व्याख्या आदी सहज स्पष्ट होतात. त्यामुळे मराठी भाषेतूनच प्राथमिक शिक्षण देणे महत्त्वाचे असल्यामुळे राज्यांनीही केवळ मातृभाषेतूनच शिक्षण द्यावे, असे आवाहनही उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.

नागपूर हे प्राच्यविद्येचे प्रतिष्ठित केंद्र असून, भोसले यांच्या वेदशाळेमध्ये न्याय, व्याकरण, साहित्य, वेद, वेदांग आदी शास्त्रांचे संशोधन हे प्राच्यविद्येसाठी एक महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ आहेत. जगात संस्कृत भाषेला आदराचे स्थान असून, जागतिकस्तरावर या भाषेच्या अध्ययनाचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेची तुलना अमृतासोबत केली आहे. देशात दोनशे भाषा लुप्त होत असून, एक भाषा ही एक संस्कृती आहे. आपली भाषा, संस्कृती व इतिहासाची माहिती युवा पिढीला शिकविणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

बौद्ध, पाली, पारसी, अरबी भाषांचे अध्ययनही अनेक भाषांमधून करण्यात आले आहे. या भाषा, अध्ययनाचे दस्तावेज उपलब्ध आहेत. यावेळी  संस्कृतसह प्राच्यविद्या अध्ययन व संशोधनाच्या विविध संस्थांचा पुण्यातील भांडारकर प्रतिष्ठाण यासह इतरही भाषासंस्थाचा आवर्जून उल्लेख केला. भाषा आणि भावना सोबत असल्यास त्या सहज व्यक्त करता येतात. तसेच त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडेही सहज वहन करता येतात. भारत हा बहुविध भाषा असलेला मोठा देश असून, येथे १२१ भाषांमध्ये स्थानिकांकडून संवाद साधला जातो, असे त्यांनी सांगितले.

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आपापल्या मुलांना गौरवशाली असलेला भारताचा इतिहास शिकविण्याचे आवाहन करताना त्यांनी अध्यात्मिक इतिहास संत तुकाराम, ज्ञानेश्वरांपासून ते झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, संत बसवेश्वर, नारायण गुरु, शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्रांचा इतिहास शिकविण्याचे आवाहन केले. कस्तुरीनंदन समितीने शिक्षणाबद्दल अनेक सूचना केल्या असून, त्याचे पालन होणे आवश्यक आहे. त्यांच्या सूचनांनुसार कला, क्रीडा, संस्कृती, पर्यावरण, कृषी, निसर्ग आदी विषयाच्या शिक्षणाला प्राधान्य देतानाच भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा अभिमान सर्वांनीच बाळगण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इतिहास, संस्कृती, परंपरा, मूल्याधिष्ठित जीवनपद्धती यासंदर्भात मनोगत व्यक्त करताना आजही सामाजिक व्यवस्था सन्मान, संस्कृती आणि ज्ञानावर आधारलेली असल्याचे सांगितले. भारतीय विकसित तंत्रज्ञानाबद्दल जगात सर्वात जास्त मागणी असून, ज्ञान ही आजची सर्वात मोठी संपत्ती आहे. भारतीय जीवन पद्धतीला ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड आहे.

संस्कृतचे भारतापेक्षाही जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणावर अध्ययन होत असल्याचे लक्ष वेधले. विद्यापिठाच्या पूर्वीच्या कुलगुरुंनी संस्कृत भाषेची जनजागृती, प्रसारणाचे चांगले काम केले असल्याचे सांगून विद्यमान कुलगुरुही ते त्याच ताकदीने पुढे नेत असल्याचे सांगितले. प्राच्यविद्या जगाच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र होत असून, ते नागपुरात होत असल्याची आनंददायी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासोबतच संशोधनाला कवि कुलगुरु संस्कृत विद्यापिठाच्या माध्यमातून प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगताना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले की, विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनातर्फे संपूर्ण सहकार्य आहे.  संस्कृत भाषेचे राज्यातील एकमेव विद्यापीठ असून, संपूर्ण भारतात संस्कृत भाषेला सामान्य अभ्यासकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य विद्यापिठामार्फत सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या असून, परिषदेतील निर्णयासंदर्भात राज्य शासनातर्फे आवश्यक  सहकार्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अखिल भारतीय प्राच्याविद्या परिषदेचे अध्यक्ष प्रा. गौतम पटेल यांनी प्राच्यविद्या परिषदेच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली. यावेळी १११ पुस्तकांचे डिजिटल प्रकाशन करण्यात आले. अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेच्या शंभर वर्षपूर्तीचा माहिती देणारा हिस्टरी ऑफ ए.आय.ओ.सी. हा चित्रपट दाखविण्यात आला. तसेच प्राच्यविद्या परिषदेच्या शंभर वर्षपूर्ती ग्रंथाचे विमोचन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले.

कवि कुलगुरु संस्कृत विद्यापिठाचे कुलगुरु श्रीनिवास वरखेडी यांनी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना शाल व स्मृतीचिन्ह देऊन गौरव केला. परिषदेचे सचिव मधुसूदन पेन्ना यांनी आभार मानले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *