मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील डॉक फिल्म बाजारसाठी प्रवेशिका सादर करण्याला १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. २: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १८ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत (MIFF) आयोजित केलेल्या पहिल्या-वहिल्या डॉक फिल्म बाजारसाठी प्रवेशिका दाखल करण्याची मुदत वाढवल्याची घोषणा केली आहे. देशाच्या भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागात काम करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना प्रवेशिका सादर करणे सुलभ व्हावे यासाठी पूर्वी जाहीर करण्यात आलेली अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ ऐवजी आता १० एप्रिल २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
हा बाजार १६ ते १८ जून २०२४ या कालावधीत मुंबईत आयोजित केला जाणार आहे. चित्रपट निर्मिती आणि चित्रपट वितरण यात प्रतिभेचे दर्शन घडवणाऱ्या माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन सामग्रीला प्रोत्साहन आणि सहाय्य करण्यासाठी स्थापित केलेले पहिले सर्वसमावेशक व्यासपीठ बनणे हे डॉक फिल्म बाजारचे उद्दिष्ट आहे.
डॉक फिल्म बाजारच्या प्रमुख विभागांमध्ये डॉक को-प्रॉडक्शन मार्केट (डॉक सीपीएम), डॉक व्ह्युईंग रूम (डॉक व्हीआर) आणि डॉक वर्क-इन-प्रोग्रेस लॅब (डॉक डब्ल्यूआयपी) यांचा समावेश असून या विभागात चित्रपट निर्मात्यांना त्यांचे चित्रपट सादर करण्यासाठी आमंत्रित केले जात आहे. डॉक को-प्रॉडक्शन मार्केट हे एक असे व्यासपीठ आहे जे प्रामुख्याने जागतिक चित्रपट क्षेत्रातून कलात्मक आणि आर्थिक सहाय्य प्राप्त करण्यासाठी तयार केले आहे. जागतिक स्तरावर चित्रपट निर्माते आणि संभाव्य निर्माते किंवा सह-निर्माते यांच्यातील भागीदारी सुलभ करणारा हा एक विभाग आहे. हा विभाग माहितीपट आणि ॲनिमेशन चित्रपट प्रकल्पांसाठी सहकार्य, सह-निर्मिती आणि निधी मिळवण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो.
चित्रपट निर्माते त्यांचे प्रकल्प सादर करुन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहाय्य आणि सहयोगासाठी मार्ग शोधू शकतात. डॉक को-प्रॉडक्शन मार्केटमधून निवडलेल्या प्रकल्पांना ओपन पिच सत्रात त्यांचे प्रकल्प सादर करण्याची संधी मिळेल तसेच निर्माते, वितरक आणि वित्त पुरवठादार यांच्याशी व्यक्तिगत चर्चा करण्यासाठी एक समर्पित जागा मिळेल. व्ह्यूइंग रूम हे चित्रपट निर्मात्यांसाठी त्यांचे माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन फिल्मचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ आहे. ही एक मर्यादित प्रवेश असलेली जागा आहे जिथे नोंदणीकृत प्रतिनिधींना निवड करण्यात आलेले चित्रपट पाहण्यासाठी प्रवेश दिला जातो. हे व्यासपीठ चित्रपट महोत्सवांद्वारे आपल्या चित्रपटाची जागतिक विक्री, वितरण भागीदार, सह-निर्माते, फिनिशिंग फंड आणि स्क्रीनिंग या संधी शोधणाऱ्या चित्रपटांसाठी आदर्श आहे.
वर्क-इन-प्रोग्रेस लॅब ही निर्मितीची अंतिम प्रक्रिया शिल्लक असणाऱ्या चित्रपटांसाठी बंद दरवाजाची प्रयोगशाळा आहे जिथे निवड झालेल्या प्रकल्प प्रतिनिधींना मार्गदर्शन, अभिप्राय आणि उद्योग व्यावसायिकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. ही लॅब फक्त ३० मिनिटांपेक्षा जास्त कालावधीच्या माहितीपट आणि ॲनिमेशन चित्रपटांसाठी खुली आहे. ही सुविधा मिळवण्यासाठी एकमेव निकष आहे, तो म्हणजे सादर केला जाणारा चित्रपट त्याच्या रफ-कट स्टेजमध्ये किंवा अंतिम संकलनाच्या अगदी आधीच्या टप्प्यात असावा आणि चित्रपटाची सुरुवात त्यांच्या DI किंवा अंतिम ध्वनी डिझाइन सारख्या पोस्ट प्रोडक्शन प्रक्रियेसह झालेली नसावी.
या उपक्रमाबद्दल बोलताना एनएफडीसीचे सहसचिव (चित्रपट) आणि व्यवस्थापकीय संचालक प्रितुल कुमार म्हणाले, “डॉक फिल्म बाजारचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्सल आणि आकर्षक कथा प्रदर्शित करणाऱ्या चित्रपटांना संधी मिळवून देणे हे आहे. हे व्यासपीठ चित्रपट निर्मात्यांना सध्याचे ट्रेंड, बाजाराची मागणी, वितरण धोरणे आणि प्रेक्षकांची रुची आणि प्राधान्ये याबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी मिळविण्यात मदत करेल. डॉक फिल्म बाजार निवड झालेल्या प्रवेशिकांना उद्योग तज्ञ आणि अनुभवी चित्रपट निर्मात्यांकडून मौल्यवान अभिप्राय, अंतर्दृष्टी आणि सूचना प्राप्त करण्यास सक्षम करेल, तसेच त्यांना त्यांचे चित्रपट खरेदी करू शकतील किंवा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करू शकणारे सहयोगी शोधण्याची अत्यंत आवश्यक संधीही प्रदान करेल.” प्रवेशिका सादर करण्याबाबत अधिक तपशील MIFF च्या www.miff.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.