Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वर्क फ्रॉम नेचर, वर्क विथ नेचर संकल्पनांना पर्यटकांचा प्रतिसाद; एमटीडीसीच्या पुणे विभागाची सर्वोत्तम कामगिरी

वर्क फ्रॉम नेचर, वर्क विथ नेचर संकल्पनांना पर्यटकांचा प्रतिसाद; एमटीडीसीच्या पुणे विभागाची सर्वोत्तम कामगिरी

मुंबई: कोरोना संकटाचे परिणाम कमी झाल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पुणे विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे पुणे विभागातील पर्यटक निवासांना पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. महामंडळाच्या अर्धवार्षिक आढाव्यामध्ये पुणे विभागातील पर्यटक निवास सरस ठरले आहेत. विभागाने राबविलेल्या नवनवीन संकल्पना, कोरोना रोखण्यासाठी राबविलेल्या उपाययोजना, पर्यटकांना दिलेल्या सर्वोत्तम सुविधा यामुळे या विभागातील पर्यटक निवासांना पर्यटकांनी पुन्हापुन्हा भेट दिली, अशी माहिती एमटीडीसीचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी दिली.

महामंडळाच्या अर्धवार्षिक आढाव्यामध्ये माळशेज घाट पर्यटक निवासास एप्रिल ते सप्टेंबर २०२१ या कालावधीतील सर्वोत्तम कामगिरी असलेले पर्यटक निवास म्हणून प्रमाणित करण्यात आले. विष्णू गाडेकर हे या पर्यटक निवासाचे व्यवस्थापक आहेत. महाबळेश्वर पर्यटक निवासास नोव्हेंबरमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम पर्यटक निवास म्हणून गौरविण्यात आले. सुहास पारखी हे या पर्यटक निवासाचे व्यवस्थापक आहेत. पानशेत पर्यटक निवासास एप्रिल ते सप्टेंबर २०२१ या कालावधीतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम परफॉर्मन्स असलेले पर्यटक निवास म्हणून गौरविण्यात आले. गणेश मोरे हे या पर्यटक निवासाचे व्यवस्थापक आहेत. सर्वोत्तम कामगिरीबद्दल या सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुणे विभागातील पर्यटक निवासांमध्ये राबविण्यात आलेल्या वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर या अभिनव संकल्पनांमुळे महामंडळाच्या पर्यटकांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली. टाळेबंदीमुळे कंटाळलेल्या पर्यटकांना पर्यटनविषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहिती वेबसाईट, फेसबुक आणि व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात आली.

पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या अव्याहतपणे सुरु असलेल्या उपाययोजना, उपहारगृहे आणि अनुषंगिक बाबींची काटेकोरपणे केलेली स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण तसेच शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सिमीटर, मुखपट्टी, हातमोजे अशी व्यवस्था, पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय सुविधा यामुळे महामंडळाची पर्यटक निवासे पर्यटकांना आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री पटली आहे. त्यामुळे डिसेंबर, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक महामंडळाच्या पर्यटक निवासांना प्राधान्य देत पर्यटकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.

वर्क फ्रॉम नेचर, मातीच्या भांड्यातील जेवण, अनुभवात्मक पर्यटनांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिक कलाकारांना आणि खाद्यपदार्थांना दिलेले प्राधान्य यामुळे पर्यटकांना आपल्या पर्यटनाचे प्रसंग संस्मरणीय करता आले. त्यामुळे पर्यटकांनीही  निसर्गाचे आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काळजी घेत, शासकीय नियमांचे पालन करीत पर्यटनाचा, नववर्ष स्वागताचा आनंद घेतला. आगामी कालावधीत अनुभवात्मक पर्यटनाबरोबरच वेगवेगळ्या अभिनव संकल्पना राबवून पर्यटनामध्ये वाढ करण्यासाठी एमटीडीसी प्रयत्नरत आहे, असे हरणे यांनी सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *