महाराष्ट्र लोक भवन येथे बिहार राज्य स्थापना दिवस साजरा
मुंबई, दि. २३ मार्च : महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत नव्या युगाची सुरुवात होणार आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने सुसज्ज नव्या एसटी बससेवेचे लोकार्पण २४ मार्च २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिमंडळ परिसरात होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या सोहळ्यास विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देण्याच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.
‘राजमाता जिजाऊ’ बससेवेच्या माध्यमातून एसटी महामंडळाच्या ताफ्यात परंपरा आणि आधुनिकतेचा संगम साधण्यात आला आहे. लवकरच तब्बल तीन हजार नव्या स्मार्ट बसेस टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे.
या नव्या बससेवेला ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिजाऊसाहेबांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याचा उद्देश आहे. याआधी एसटी महामंडळाने ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘यशवंती’ आणि ‘हिरकणी’ या ऐतिहासिक नावांनी बससेवेला ओळख दिली आहे. त्या परंपरेत आता ‘राजमाता जिजाऊ’ या नावाची भर पडल्याने राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव अधिक अधोरेखित झाला आहे.
नव्या बसेस अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहेत. या बसमध्ये ३×२ आसनरचना असून एकूण ५६ प्रवासी बसू शकतील, जे सध्याच्या बसेसपेक्षा १६ आसनांनी अधिक आहे. त्यामुळे प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने चार सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस प्रणाली, पॅनिक बटन, सार्वजनिक घोषणा व्यवस्था आणि इलेक्ट्रॉनिक मार्गदर्शक फलक बसविण्यात आले आहेत.
ही बससेवा प्रामुख्याने दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर शटल पद्धतीने चालविण्यात येणार असून, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० बसेस नागपूर येथे दाखल होणार असून, तेथून या सेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे.
‘राजमाता जिजाऊ’ बससेवा ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचा सन्मान आणि आधुनिकतेचा आत्मविश्वास यांचे प्रतीक आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक परिवहन अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.


