‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक एसटी बससेवेचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
मुंबई, दि. २३ : राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत आधुनिकतेचा नवा टप्पा गाठण्याच्या दृष्टीने ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण २४ मार्च २०२६ रोजी विधिमंडळाच्या प्रांगणात पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे तसेच विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यातील परिवहन व्यवस्थेत गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेच्या समावेशामुळे एसटी महामंडळाच्या ताफ्यात परंपरा आणि प्रगती यांचा समतोल साधला गेला आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने सुमारे तीन हजार अत्याधुनिक स्मार्ट बसेस सेवेत दाखल केल्या जाणार असून, त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक सक्षम आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होणार आहे.
या बससेवेला ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देण्यामागे स्वराज्याच्या पायाभरणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिजाऊसाहेबांप्रती आदर व्यक्त करण्याचा हेतू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घडणीत जिजाऊंचे संस्कार हे प्रेरणास्थान मानले जातात. यापूर्वीही एसटी महामंडळाने ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘यशवंती’ आणि ‘हिरकणी’ अशा ऐतिहासिक नावांनी बससेवा सुरू करून सांस्कृतिक वारशाचा गौरव जपला आहे. त्या परंपरेत ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या नावाची भर पडल्याने या वारशाला अधिक बळ मिळाले आहे.
नव्या बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असणार आहेत. या बसेसमध्ये ३×२ आसनरचना असून एकूण ५६ आसन क्षमता उपलब्ध असेल, जी सध्याच्या बसेसपेक्षा १६ आसनांनी अधिक आहे. त्यामुळे अधिक प्रवासी आरामदायी पद्धतीने प्रवास करू शकतील.
तसेच या बसेसमध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन, सार्वजनिक घोषणा प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक मार्गदर्शक फलक यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि तंत्रज्ञानाधारित होणार आहे.
ही सेवा प्रामुख्याने दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर शटल पद्धतीने चालविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल, तसेच वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. राज्यातील प्रमुख मार्गांवर ही सेवा टप्प्याटप्प्याने विस्तारली जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली.
या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ५० बसेस नागपूर येथे दाखल होणार असून, तेथून या नव्या सेवेला सुरुवात करण्यात येईल. पुढील काही महिन्यांत इतर विभागांमध्येही या बसेस सुरू करण्याचे नियोजन आहे.
‘राजमाता जिजाऊ’ बससेवा ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान आणि आधुनिकतेचा आत्मविश्वास यांचे प्रतीक आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक परिवहन अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
