Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बंडखोर ब्लॉग : “मराठी पाऊल पडते पुढे….पण आम्हीच खेचू मागे”

बंडखोर ब्लॉग : “मराठी पाऊल पडते पुढे….पण आम्हीच खेचू मागे”

मराठी पाउल पडते पुढे… पण आम्हीच खेचू मागे.
“सैराटसाठीची गाणी सोनी स्कोअरिंग ला रेकोर्ड करण्यासाठी जेव्हा मी आणि अतूल हॉलीवूडला जाण्यासाठी विमानात बसलो तेव्हा ” सात समुद्रापार मराठी चित्रध्वजा आम्ही नेउ” ही आम्हीच संगीतबद्ध केलेली ओळ मला सारखी आठवत होती” असं अजय गोगावलेंनी एका मुलाखतीत सांगितल होतं . मराठी चित्रपट सातासमुद्रापार जाणं ही आपल्यासाठी खुप अभिमानाची गोष्ट आहे. “श्वास” “कोर्ट” ह्या सिनेमांनीही मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकवला. नुकताच आणखी एक मराठी सिनेमा सातासमुद्रापार जाणार आहे, तो म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला “काळ” हा भयपट. त्यात वापरलेली फाउंड फुटेज पध्दत हा मराठीतला असा पहीलाच प्रयत्न आहे आणि रशियाला ती पद्धत लोकप्रिय आहे आणि “काळ” चा ट्रेलर पाहून हा सिनेमा तिकडे प्रदर्शित करण्यासाठी “फ्रेम्स प्रोडक्शन्स” ला विचारण्यात आले आणि हा सिनेमा रशियात रशियन भाषेत प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा ठरला.

इथे भाषेचा धागा पकडून मला “काळ” आणि नुसता काळच नाही तर इतर मराठी चित्रपटांबाबत मराठी प्रेक्षकांचे आणि त्यांनी दिलेल्या प्रतिसादाचे जे अनुभव आले ते सांगायचे आहे. वर उल्लेख केलेल्या चित्रपटांपैकी ” सैराट” सोडला तर आर्थिक पातळीवर फारसं यश या कौतुक झालेल्या चित्रपटांना मिळालेले नाही. एकीकडे जग आपली दखल घेतं म्हणून कौतूक करायचं आणि दुसरीकडे तिकिट खिडकीवर रांगा मात्र हिंदीत आपल्या आवडत्या ” स्टार” च्या चित्रपटाला लावायच्या. रविवारच्या सुटीला विकेंड प्लान करताना सिनेमागृहात जाऊन चित्रपट पहायचा विचार आपला कोणता स्टार या चित्रपटात आहे हे पाहण्यापासून सुरु होतो, तो नसेल, किंवा आपला आवडता चेहरा आणि शरीर नसेल तर मग मराठीचा पर्याय पाहीला जातो. म्हणजे एकीकडे रशीया आपल्या भाषेतच (इंग्रजीत नाही) अनुवादीत करुन मराठी सिनेमा पाहतेय आणि आमचे मराठीजन मात्र पहीली पसंती परभाषेला देतात (मराठीजनांसाठी मराठी सोडून जगातल्या इतर सर्व भाषा परभाषा आहेत, “हिंदी राष्ट्रभाषा आहे” हे ज्ञान कृपया देउ नये). आता” मराठी प्रेक्षक येतात, तुम्ही सकस सिनेमे तर द्या. आम्ही दुनियादारी, नटरंग आणि नटसम्राट आणि सैराट ला गर्दी केली नव्हती का? दादा कोंडकेंच्या सिनेमांना आम्ही सिल्वर ज्युबिली नव्हतं केलं का?” असे युक्तिवाद कोणी यावर करेल. तर माझा त्यांना सवाल आहे, वरील सर्व चित्रपटांच्या विषयात “वाद” “गाणी” “नावाची लोकप्रियता” “द्विआर्थी विनोद” ह्यामुळे प्रेक्षक खेचला गेलाय. म्हणजे तुम्ही आम्ही खेचले गेलो. मग आता “जोगवा” “फॅंड्री” “खेळ मांडला” या आणि अशा कित्येक सिनेमांमधे सकसता नव्हती का? मग तिथे गर्दी का नाही केली?. “फॅंड्री” सारखा सिनेमा बनवणाऱ्या नागराज सारख्या दिग्दर्शकाला ” सैराट” ला फिल्मी फंडा का वापरावा लागला? आणि तो फंडा नाही वापरला तर तुम्ही चित्रपट घरी मोबाईलवरच बघणार आहात का? मग प्रयोगशील निर्मात्या आणि दिग्दर्शकांनी काय राष्ट्रीय पुरस्कार आणि त्या निमित्ताने मिडीयाने दिलेल्या कौतुकावच समाधान मानायचं का? चित्रपट उभा करण्यासाठी लागलेल्या पैसा त्यांनी मिळवायचाच नाही का?

सकस मराठी सिनेमा येत नाही अशी बोंब का मारता? “काळ” हा कमी बजेट मधला उत्तम भयपट आहे. त्यात आघाडीची भूमिका करणाऱ्या संकेतच्या स्वतःच्याशहरात म्हणजे नाशिक मधेच केवळ दोन मल्टिप्लेक्समधे एक एक म्हणजे एकूण दोन खेळ मिळाले, ते ही दुपारच्या वेळेला. खरंतर “काळ” हा २४ जानेवारीला प्रदर्शित होणार होता, पण तान्हाजी ला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे त्याचे खेळ कमी करून एखाद्या नव्या दिग्दर्शकाच्या नव्या चेहऱ्यांना घेऊन केलेल्या प्रयोगशील सिनेमाला देण्यास मल्टीप्लेक्स मालक तयार झाले नाही. तारीख ३१ जानेवारी वर ढकलली गेली आणि त्याच दिवशी ” चोरीचा मामला” व ” मेकअप” हे दोन मराठी तर ” जवानी जानेमन” व अजून एक हिंदी असे सिनेमे प्रदर्शित झाले. सोबतच ऑस्कर च्या शर्यतीत असलेले इंग्रजी सिनेमेही प्रदर्शित झाले. ह्याचा सर्वात जास्त फटका मराठी सिनेमांनाच बसला. त्यांना प्राईम टाईम शो नाकारले गेले. दुपारी, रात्री उशीरा अश्या कमी गर्दीच्या वेळा त्यांना देण्यात आल्या. इतर वेळा अर्थातच हिंदी सिनेमांना मिळाल्या त्यात तान्हाजी अजूनही गड राखुन आहे. ह्यात मल्टीप्लेक्स मालकांची चुक नाहीच…. धंदा ज्यामुळे होईल, आग्रह ज्याचा असेल त्या सिनेमाचे खेळ ते का नाही दाखवणार? हा मराठीचा आग्रह आपण करतो आहोत का? “काळ” “चोरीचा मामला” “मेकअप” ह्यात काय कमी आहे? रटाळ आहेत? की मनोरंजन नाही त्यांच्यात? सर्व आहे फक्त दाक्षिणात्य माणूस जसा आपल्या भाषेचा आग्रह धरतो तसा आग्रह धरणारा मराठी माणूस त्यांच्या मागे नाही. एका महीन्यापुर्वी आलेल्या “धुरळा” हा खुप कमाई करेल असं वाटत असतांनाच “तान्हाजी”” येताच त्याचे खेळ निम्म्यावर आले. राग “तान्हाजी” सिनेमावर नाहीच. राग आहे द्विभाषी झालेल्या मराठी माणसावर. “हिदु” या भालचंद्र नेमाडेंच्या कादंबरीतला “खंडेराव” म्हणून द्विभाषिक माणसाची मुळ भाषा कालांतराने मरण पावते असं म्हणतो. मराठी माणूस मराठीसाठी आग्रही असता तर तान्हाजी मुळातच मराठीत चित्रीत झाला असता आणि “तुंबाड” ही राही अनिल बर्वेने मराठीतच केला असता. मराठी मरेल अशी भिती वाटण्यासारखी परीस्थिती नक्कीच आहे. ह्यात हट्ट करणारे मराठीजन ही आहेच. औरंगाबादला “काळ” चा आणखी एक खेळ सुरु करायला तिकडच्या प्रेक्षकांनी भाग पाडले. अशा प्रेक्षकांच्या आशेवरच प्रयोगशील मराठी सिनेमांच्या दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी अवलंबून रहायची वेळ आलीय. हा हट्ट वाढीस लागो, आणि ” मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” हे आपल्या हातून घडो हिच अपेक्षा.

– प्रभात गांगुर्डे

(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *