Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उद्योग क्षेत्रातील नव्या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा – उद्योग मंत्री सुभाष देसाई

उद्योग क्षेत्रातील नव्या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा – उद्योग मंत्री सुभाष देसाई

मुंबई : संकटासोबत संधी निर्माण होते. कोरोना संकटामुळे उद्योग क्षेत्रांत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा, याकामी महाराष्ट्र सरकार आपल्याला पाठिशी उभे आहे. मराठमोळ्या हिमतीमुळेच कोरोनाच्या संकटावर आपण मात करून पुढे जाऊ, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला. ‘ऑल इंडिया सारस्वत कल्चरल’ संघटनेच्या वतीने आयोजित ‘उद्योग क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावरील वेबिनारमध्ये देसाई बोलत होते. यावेळी संघटनेचे अजित गुंजीकर, किशोर मासूरकर, नरेंद्र वझे, स्मिती गवाणकर आदी उपस्थित होते.

सध्या संपूर्ण जग एका वेगळ्या संकटाला तोंड देत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे पुढे काय होणार, असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. परंतु या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन व उद्योग विभाग सज्ज झाला आहे. संकटासोबत संधी मिळते हे हेरून उद्योग विभागाने विविध धोरणं आणि योजना आखल्या आहेत. त्याचा मराठी माणसांनी फायदा घ्यावा व महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या वेगळ्या उंचीवर नेण्यास सहकार्य करावे, असे आवाहन देसाई यांनी केले.

कोरोनामुळे अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत. त्यांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी भूखंड, रस्ते आदी सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. एमआयडीसीने या आणि उद्योग सुरू करा, ही संकल्पना राबविण्यासाठी नवीन उद्योगांसाठी तयार शेड तयार करण्याचाही निर्णय़ घेतला आहे. गुंतवणुकदार यंत्र-सामुग्री आणून थेट उत्पादन सुरू करू शकतील. याशिवाय उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या विविध परवान्यांचा जाच कमी करून महापरवाना पद्धत सुरू केली आहे. शिवाय मोठ्या गुंतवणुकदारांसाठी उद्योगमित्र संकल्पना हाती घेतली आहे. उद्योग विभागाचा एक अधिकारी त्या गुंतवणुकदारांसोबत पहिल्या दिवसांपासून उत्पादन सुरू होईपर्यंत सर्व गोष्टींचा पाठपुरावा करणार आहे. आता गुंतवणुकदारांनी पुढे यावे आणि उद्योग सुरू करावेत, असे आवाहन उद्योगमंत्र्यांनी केले.

उद्योगांत कामगारांची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी ‘कामगार विनिमय ब्युरो’ स्थापन केला जाणार आहे. यावर लवकरच बैठक होईल. कामगारांची नोंदणी करून गरजेनुसार उद्योगांना कामगारांचा पुरवठा केला जाईल. यावेळी अल्पकालिन प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्यात येईल. महाराष्ट्रात कामगारांची टंचाई भासणार नाही, याची शासन काळजी घेत आहे. याशिवाय असंघटीत क्षेत्र व कामगारांना शासन मदत करण्यास तयार आहे.

सत्तर हजार उद्योगांना परवाने, आरोग्याला प्राधान्य

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना राज्यात सत्तर हजार उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पन्नास हजार उद्योग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. हे करताना प्रत्येकाच्या जीवनाची काळजी घेतली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लोकांच्या जीवनाला व आरोग्याला अधिक प्राधान्य दिले असल्याने उद्योगांत काम करणाऱ्या कामगारांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना दिल्याआहेत.

केंद्राच्या पॅकेजचा सर्व घटकांना फायदा

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये उद्योगांसाठी अनेक सवलतींचा वर्षाव केलेला आहे. सेवा, उत्पादन क्षेत्राला दिलासा आहे. सोबत पर्यटन, वाहतूक आदी उद्योग क्षेत्रासाठी मोठी संधी आहे. याचा बारकाईने अभ्यास केल्यास त्याचे लाभ समजू शकतात. त्यामुळे या संधीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाने लाभ घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी केले.

औषध उत्पादन क्षेत्रासाठी लवकरच फार्माधोरण

कोरोना संकटकाळात औषध निर्माण क्षेत्राने मोठे काम केले आहे. आरोग्याशी निगडीत गोष्टी पुरवण्याकामी या क्षेत्राचा मोठा वाटा राहीला आहे. या क्षेत्राला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी फार्मा पॉलिसी तयार केली जाणार आहे. लवकरच यासाठी बैठक घेतली जाईल. यामध्ये फार्मा क्षेत्रातील उद्योजक, सीईओंना निमंत्रित केले जाईल. याशिवाय एक्सपोर्ट प्रमोशन काऊन्सिलचे प्रतिनिधी असतील. या बैठकीतील चर्चेनंतर फार्मा क्षेत्रासाठी चांगले धोरण तयार केले जाईल.

उद्योगांचे विकेंद्रीकरणासाठी गुंतवणुकदारांनी पुढे यावे

मुंबई, पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक झालेली आहे. कोरोनामुळे या भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी शासनाने उद्योगांचे विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला आहे. गुंतवणुकदारांनी राज्य शासनाचे धोरण समजून घ्यावे. बाहेर जिल्ह्यात आपले प्रकल्प सुरू करावेत, असे आवाहन देसाई यांनी केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *