Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“कूट बी मरण येवो मुटभर माती भेटली तरी लय हाय” वाचा सपना फुलझेले यांचा लॉकडाऊन च्या जखमांवर आधारीत ब्लॉग

“कूट बी मरण येवो मुटभर माती भेटली तरी लय हाय” वाचा सपना फुलझेले यांचा लॉकडाऊन च्या जखमांवर आधारीत ब्लॉग

आज पुन्हा एकदा संध्याकाळी 4-5 च्या सुमारास #अन्नधान्य #किट वाटप करण्यासाठी गावाबाहेर वसलेल्या #मजूर वर्गाच्या झोपडपट्टीत जाणं झालं. (स्थानिक मजुरांसोबतच काही प्रमाणात कामाच्या शोधात दुसऱ्या राज्यातून आलेला आणि आता इथंच स्थायिक झालेला मजूरवर्ग ही इथं वास्तव्यास आहे)
एक प्रकारचे औदासिन्यच या संपूर्ण वस्तीत भरून गेलंय असं वाटून गेलं. त्यांचं जीवनचक्र जणू थांबूनच गेलं. कुणीतरी काही तरी मदत घेऊन येतील आणि कसा तरी हा संसाराचा गाडा ओढला जाईल. पोटापाण्याचा, भुकेचा हा प्रश्न तात्पुरता तरी मिटेल या आशेने त्या नजरा आमच्यावरच रोखून होत्या. ज्या खरंतर आमच्याच काळजाला चरे पाडत होत्या. त्या नजरेतला तो भकासपणा बघवला जात नव्हता. त्या नजरेला नजर देण्याचं धाडस आमच्यात तरी नव्हतं. वस्तीतली वयात येणारी कुमारवयीन आणि तरणीताठी पोरं पत्ते कुटण्यात तल्लीन होती. आम्हाला बघून ती लाजेखातर इकडे तिकडे विखुरली #सोशलडिस्टंसिन्ग चा फडशा कसा पडतो त्याचं डोळ्यादेखतचा दाखला समोर होता. सर्वांना एकत्र करून वाटप करण्यापेक्षा प्रत्येकाच्या अंगणात आणि दारात जाऊन देणं आम्हाला जास्त सोयीचं वाटतं अर्थात योग्य ती सगळी काळजी आणि खबरदारी घेऊन. पण वाटप करताना प्रत्येकाच्या तोंडी एकच प्रश्न…ताई कधी संपणार हे सगळं? आता असह्य झालं सारं. जगणं नकोसं झालंय. कोणतंच उत्तर नव्हतं आमच्याकडे. काय बोलणार? काय सांगणार? कारण त्यांना #लॉकडाऊन #पॅकेज #घोषणा यांच्याशी दूरदूर पर्यंत काही देणंघेणंच नाही. जगावं कसं हाच त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न. त्यातलेच काही मध्यम वयीन स्त्री पुरुष बोलले, ‘ताई दाळ, तांदुळ, तेल, हिरोती ( लाल मिरची पुड ) देता पर… साबणाची वडी अन कपडे धुवाचा सोडा (वाशिंग पावडर) बी द्या की व जरा, हात धुवा हात धुवा सांगत्यात सारी…पर हित तं आंग धुवाले आन कापडं धुवाले बी काय नाय तं कायंन हात धुणार ? तरण्या ताठ्या बायपोरीच अवघड होऊन बसलंय व…ताय, त्ये इटाळाची कापडं…’
मेंदू तसाच बधिर होऊन गेला. इतका गंभीर आणि मूलभूत प्रश्न पण अजुन कोणत्याच #स्वयंसेवी #संस्था आणि सरकारी यंत्रणेला, याची जाणीव होऊ नये.

अन्नधान्यासोबत त्यांना सॅनिटरी पॅड ची ही तितकीच गरज आहे हे लक्षातच येऊ नये? काम बंद, मजुरी बंद, घरात येणारा पैसा ही बंद. घरात तर खायचे ही वांधे मग अशा परिस्थितीत त्यांनी हे सॅनिटरी पॅड विकत आणावे तरी कुठून आणि कसं ? कुणाला मागावे ? कोण देणार ? प्रश्न फक्त या इथल्या स्त्रियांचाच नाही तर समस्त देशभरातील कामगार, मजूर, शेतकी मजुर स्त्रियांच्या आणि त्यांच्या वयात येणाऱ्या मुलींच्या आरोग्याचा आहे. स्वच्छतेचा आहे. त्यांच्या लैंगिक आजाराचा, त्याच्या इन्फेकशन चा आहे. आणि इतक्या महत्वपूर्ण प्रश्नाकडे आपण इतक्या सहजपणे डोळेझाक केलीय. फक्त अन्नधान्य आणि जेवणाची पाकिटं वाटून आपली जबाबदारी संपत नाही तर त्यांच्या पोटापाण्यासोबत स्त्रियांच्या मूलभूत प्रश्नांकडे आणि गरजेकडे ही तितकंच लक्ष देण्याची गरज आहे आणि ते ही तातडीनं.

त्यातल्याच काही मजूर स्त्री पुरुषांना आम्ही प्रश्न केला की तुम्हाला तुमच्या गावी किंवा राज्यात परत जायचं आहे का ? तशी व्यवस्था करायचा आम्ही प्रयत्न करतो.
त्यांचं उत्तर ऐकून तर बुद्धीच सुन्न झाली, मन हादरून गेलं. ‘काय कराच ताई जाऊन बी ? तीत बी मरणं अन इत बी मरणं पर जातान रस्त्यात मेलो तर कुत्र बी इचारणार नाय आमच्या मढ्याले. आन काय माहित तीत बी आमाले गावात आमचेच गणगोत येऊ देल क नाय. जे होयाचं ईतच होऊ दे. कूट बी मरण येवो मुटभर माती भेटली तरी लय हाय.’ काळीज पिळवटुन गेलं. जिवंत राहण्यासाठीची ही कुतरओढ चालली असताना कुठलं आलंय घरदार, जमीनजुमला, #जातपात, #धर्म आणि #राज्यसीमेचे #राजकारण. या तर भरल्या पोटाच्या वांझोट्या गप्पा आणि चर्चा. आणि या सगळ्यांतच आणखी कहर म्हणजे आज वाटप करताना खरंतर प्रकर्षाने जाणवली ती तेथील स्त्रिया आणि मुलींच्या डोळ्यांत असलेले विचित्र असे भीतीचे सावट आणि विषन्नता. काहीतरी सांगण्यासाठी थरथरणारे ओठ, भिरभिरणारी नजर, आणि हाताची चाललेली चुळबुळ. त्यातल्या त्यात अन्नधान्य वाटप करताना समोर पुरुषवर्ग असल्याने काहीच बोलता न येण्याची त्यांची #घुसमट. नक्की काय चाललेलं असेल त्यांच्या मनात ? काय सांगायचं असेल त्यांना ? कसली भीती होती त्या डोळ्यांत ? राहून राहून मनाला हाच प्रश्न पोखरतोय….पोखरतच जातोय.

सपना फुलझेले, नागपूर

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *