
गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्यासाठी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र
मुंबई, दि. २४: गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल्ल होत आहे. रेल्वे अधिकारी आणि तिकिटांच्या दलालांच्यातल्या अभद्र युतीमुळेच हे होत असावे. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करुन चढ्या दराने त्याची विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. यामध्ये कोणा-कोणाचे हितसंबध गुंतले आहेत, या गैरप्रकारात कोण-कोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. या तिकीटाच्या आरक्षणासंबंधी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वने चौकशी करावी. अशा रेल्वे दलालांवर नियंत्रण ठेवावे. तसेच कोकणच्या चाकरमान्यांच्या सोईसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना केली आहे.