Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“हरकत नाही”…. वाचा कल्पेश गोसावी यांनी सुलेखनकार कमल शेडगे यांना वाहिलेली शब्दांजली

“हरकत नाही”…. वाचा कल्पेश गोसावी यांनी सुलेखनकार कमल शेडगे यांना वाहिलेली शब्दांजली

काल कॅलिग्राफी च्या कलाविश्वातील एक तारा निखळला. आर्टिस्ट कमल शेडगे यांचं काल निधन झालं. कॅलिग्राफर कल्पेश गोसावी यांनी या निमित्ताने त्यांच्यासोबतच्या काही आठवणींना उजाळा देत त्यांना एक आगळी वेगळी आदरांजली दिली आहे.

भावपूर्ण आदरांजली…!

कमल शेडगे सरांना त्यांच्या घरच्या दुरध्वनीवर केलेला पहिला काॅल आज आठवला. सर, मी कल्पेश गोसावी. जेजे मध्ये टायपोग्राफी शिकतोय, तुम्हाला भेटायचं होतं. खुपच मृदू..किंचितश्या दबक्या आवाजात त्यांनी पलीकडून म्हटलं, कशासाठी? मी क्षणभर थांबलो…म्हटलं, सर माझ्या अभ्यासाच्या संदर्भाने तुमच्याशी बोलायचं होतं, माझा एक शैक्षणिक प्रकल्प आहे. सुटटीच्या दिवशी येईन. थोडं थांबून म्हणाले, घरचा पत्ता माहिती आहे का? मी म्हटलं, हो सर तुमचं एक पुस्तक आहे माझ्याकडे त्यात आहे.

पुढचा शब्द म्हणाले, ”हरकत नाही”.
संभाषण संपलं.

या सगळ्याला एकूणच काही “हरकत नाहीए” असं वाटून मी जायचा रविवार निश्चित केला व शेडगे सरांना कळवलं. सायनेकर सरांना काॅलेज मध्ये कळवलं कि अमूक अमूक दिवशी जातोय शेडगेंच्या घरी. सायनेकर सर या सर्व Documentation वर मार्गदर्शन करतच होते. मी नीटशी भरपूर विचारांती सरांशी बोलून एक प्रश्नावलीही तयार केली होती ज्याच्या
अनुषंगाने मला कमल शेडगे सरांशी बोलायचं होतं. जाण्याच्या दिवशी सोबत माझे मित्र जयेंद्र, आनंद होते. स्नेहल पाटील ही होती.

शेडगे सर सुरवातीला खुपच दबून बोलत होते.त्यांना मोकळेपण जाणवत नसावं असं वाटलं क्षणभर. कमल सरांचं गाव कोकणातलं. गप्पांच्या ओघात त्यांना कळलं कि मी पण मालवणजवळचा, सिंधुदूर्गातला. हे कळल्यावर त्यांची कळी खुलली व मी माझी प्रश्नावली डोक्यात ठेवून त्यांच्याशी अगदीच अनौपचारिक गप्पा सुरू केल्या. किती सुंदर दिवस होता तो…!! त्यांनी त्यांचं सगळं काम किती उत्साहात माझ्यासमोर रितं केलं आणि किती प्रेमाने एक एक पान हातात घेऊन दाखवलं. मी सायनेकर सरांना म्हटलं, सर मला शेडगे सरांवर essay करायचाय. त्याच्या कामावर एकूणच लिहावंसं वाटण्याजोगं खुप काही होतं आणि अक्षरांबाबतीतल्या अभ्यासाच्या दृष्टीने ते महत्वाचंही होतं. मी खुप मन लावून सगळा वृत्तांत-निरिक्षणं सगळं अगदी मनापासनं एकचित्ताने संकलित केलं. सायनेकर सरांनी सुचवलेले योग्य ते बदल केले. सगळं अगदी खुप प्रामाणिक कष्ट घेऊन केलं. मनाला वेगळाच आनंद मिळत होता. आपण या सा-या प्रवासात किती विविध बाजुंनी शिकत असतो नाही? कामाचा दृष्टिकोन शिकण्याचा-समजण्याचा व वैचारिकता सकस करण्याचा काळ होता हा.

त्याच्या कामाचं केलेलं सगळं एकत्रिकरण पाहिल्यावर सायनेकर सरांनी मला त्याच्या डोळ्यातूनच एक शाबासकीची थाप दिली जी मला व्यवस्थित जाणवायची व अजूनही जाणवते. सर म्हणाले, कल्पेश या लिखाणाची एक काॅपी न विसरता शेडगेंना दे व पुढे म्हणाले, मी संतोषशी बोलून घेतो कि अक्षरायच्या एका सेशनसाठी आपण कमल शेडगेंना आमंत्रित करण्यासाठी प्रयत्न करूया म्हणजे या सा-या संकलनाचं एक सुंदर सेशन सर्वांसाठीच करता येईल.

या कल्पनेचा आनंद झाला असतानाच या सा-याबद्दल पुन्हा एक किंचितसं टेंशन आलं यासाठी कि याबाबत कमल शेडगे सरांना कसं सांगावं व येण्याबाबत नेमकं कसं विचारावं. मी सायनेकर सरांना म्हटलं मी त्याच्या घरी जाणारच आहे, घेतो बोलून.

शेडगे सरांच्या पुन्हा घरी गेलो तर ते त्यांच्या दोनेक महिन्यानंतरच्या प्रभादेवीला पुल देशपांडे सभागृहात आयोजिलेल्या एका प्रदर्शनासाठी मांडण्याची काम करण्यात व्यस्त होते. मला म्हणाले, हि कामं बघ.तुला प्रदर्शनाच्या आधीच दाखवतोय, आधी कुठे कोणाला दाखवू नकोस फक्त फोटोज. तुला आवडतं आणि नेमका आलायस म्हणून दाखवली. त्यांच्या
चेह-यावरचा अशी कामं दाखवतानाचा आनंद मी खुप जवळून पाहिलाय. शेडगे सरांना चहा घेता घेता अक्षरायच्या मुलाखतीबद्दल सांगितलं व म्हटलं आम्हा सर्वांची तुम्ही यावं अशी फार इच्छा आहे. माझे जेजेतले शिक्षक संतोष क्षीरसागर व विनय सायनेकर यांचा निरोप घेऊन मी आलोय. तुमची एक छोटीशी मुलाखत व तुमचं काम सर्वांना पाहता येईल. बरेचसे विद्यार्थी असतील.

शेडगे सर पुन्हा दबल्यासारखे वाटले… मी त्यांना हे विचारून तसं अडचणीतच टाकलं होतं. मला म्हणाले, अरे मी आता कुठे बाहेर जात नाही रे आणि मला जमेल का बोलायला? मी माझं काम करतो इथे बसून फक्त आणि मनमोकळे हसले.

मी म्हटलं, सर नका बोलू काही. तुमचं काम दाखवू आपण. तुम्ही आलात तर अजून छान वाटेल. त्यावर ते म्हणाले, तु असशील का? मला दोन मिनटं अगदी स्तब्ध व्हायला झालं, म्हटलं सर, मी असेन. तुमच्या बाजुलाच बसतो हवं तर. त्यावर ते हसले. म्हणाले “हरकत नाही”.

या अक्षरायच्या अक्षरसंवाद सेशनसाठी अक्षरायच्या टीमने नेहमीच्याच उमेदीने मेहनत घेतली. सायनेकर सरांनी व मी बसून शेडगे सरांच्या कामाची वर्गवारी केली. किती विविध कामं आणि त्यांचे प्रकार. एका बाजूला माझं एमएफए चं वर्गातलं काम व दुसरीकडे रात्रंदिवस बसून शेडगे सरांच्या सगळ्या कामाच्या स्लाईड्स बनवणं हे मोठ्ठं काम होतं. त्यांच्या जुन्या पुस्तकातले स्कॅन्स काढा..मग इमेज क्लिनिंग करा… विविध कॅटेगरीनुसार त्या सा-याची मांडणी करा,लेआऊटिंग करा असं खुप काही होतं. हे सगळं करेपर्यंत मध्यरात्री उलटायच्या. दुस-या दिवशी काॅलेजमध्ये झोप डोळ्यावर घेऊनच दिवस संपायचा पण यामुळेच ही सारी कामं होऊ शकली. सायनेकर सरांनी हे सारं खुप बारकाईने तपासलं व आम्ही स्लाईड्सचे अनुक्रमांक ठरवण्याइतपत सारं काही केलं. संतोष सरांना आदल्या दिवशी पूर्ण स्लाईडशो रन करून दाखवला.

शेडगे सर ठरल्या दिवशी आले. महाराष्ट्र टाईम्समध्ये संझगिरिंच्या काळात कार्यरत असताना ते अध्येमध्ये जेजेत येत असत ती आठवण त्यांनी तळमजल्यावरच्या सायनेकर सर बसत त्या केबीन मध्ये गप्पा मारताना आवर्जून काढली. सायनेकर सरांनी त्यांना खुप छान अनौपचारिकरीत्या बोलतं केलं व ही मुलाखत छान रंगली. आश्चर्य म्हणजे, योगायोगाने का होईना मी त्यांना म्हटल्याप्रमाणे पूर्णवेळ स्टेजवर शेजारी बसून होतो. शेडगे सर व सायनेकर सर यांच्या बाजूला बसून हे सारं अनुभवण्यात किती वेगळंच वाटलं.

कमल शेडगे ख-या अर्थाने त्यांच्या कामात सिद्धहस्त म्हणतात तसे होते. तांत्रिकपणे कलेचं कुठल्याही आर्टस्कूल मधलं शिक्षण घेतलेलं नसतानाही त्यांच्या अक्षरलेखनातली शिस्त व काटेकोरपणा हा कमालीचा वाखाणण्याजोगा व ख-या अर्थाने त्यांचा “स्वतःचा” असा होता. आजच्या काळात आजुबाजूला ब-याच गोष्टी सहज बघण्यासाठी म्हणून उपलब्ध असताना व त्याकडे बघून तसं करण्याचा प्रयत्न करणं शक्य असताना या शक्यतेच्या अगदी विरूद्ध टोकाला बसून कमल शेडगे सारख्या अक्षरकाराने उभ्या हयातीत त्यांचं स्वतःचं असं अस्तित्व त्यांच्या वैयक्तिक शैलीने त्यांच्या कामातून सिद्ध केलं. तुम्ही तुमच्याबद्दल स्वतः वारंवार बोलत नसलात आणि प्रामाणिकपणे तुमचं काम एकनिष्ठतेने सकसपणे करत असलात कि जग तुमच्या कामाबद्दल आपणहून बोलतं याचं खुप उत्तम व ज्यातून सर्वांनाच शिकता येईल असं आदर्श उदाहरण होते कमल शेडगे. त्यांनी शांतपणे दृढनिश्चयाने केलेल्या त्यांच्या अक्षरांची दखल अवघ्या नाट्य-सिनेमा सृष्टीनी आपणहून घेतली यावरून शेडगेंच्या कामाची व्याप्ती लक्षात घेण्याजोगीच आहे. मुळातच शीर्षकं-लोगो-हेडिंग्स यासारख्या उंची-लांबी-रूंदीबाबतीत मितींचे अडथळे असण्याच्या विषयातही शेडगेंनी निर्माण केलेले अक्षरातले कल्पक बदल हे त्यांच्या स्वतःच्या कार्यपद्धतीतून आलेले व त्यांनी इतके खुबीने सजवलेले होते की शेडगे सरांच्या अक्षरलेखनांनी भारावून कित्येकांनी त्यांच्यासारखे कित्ते अंगिकारले हे शेडगेंच्या कामाचं खुप मोठं यश आहे.

टायपोग्राफीसारख्या विषयातही त्यांनी आपलं काम हे ठोकळेवजा न करता किती खुबीनं व हुशारीनं त्यात लालित्य जपत कायम जिवंत व तजेलदार ठेवलं. शेडगेंचं काम हे त्यामुळेच यांत्रिकपणाच्या कसोट्यांवर खरं उतरूनही ते यांत्रिक वाटत नाही तर त्यातली नैसर्गिकता ही तुमच्या डोळ्याला भुरळ पाडते हे त्यांच्या अक्षरलेखनाचं लख्ख सत्य आहे.

सुलेखनातल्या-अक्षरणातल्या, ग्राफिक डिझाईन मधल्या तांत्रिक बाबी विद्यार्थ्यांना वर्गात शिकवताना किती घासून पुसून आम्ही पाॅईंट स्केल, रिडक्शन व्हॅल्यूज, फिनिशींग, सेरिफ्स, प्रपोर्शन सारख्या बाबींचे करेक्शन्स देतो. कमल शेडगे हे या सर्व बाबतीत किती आदर्श ठरतात कि त्याचं काम हे ग्राफिक डिझाईनच्या सर्व निकषांच्या पार जाऊन अचूकतेच्या बाबतीतही परखड बनावं..! या सर्वांचं नेमकं शास्रोक्त परिमाण मोजण्यासाठी लागणारं, केवढं अदभूत रसायन हे त्यांच्या मेंदुपासून हातांच्या बोटापर्यंत, नैसर्गिकपणे अव्याहत इतकी वर्ष वाहत होतं? शेडगेंच्या कामासमोर म्हणूनच आदरपूर्वक नतमस्तक व्हावसं वाटतं कारण ते अगदी निरागसतेने आपल्या अक्षरांशी एकरूप होते.

या एकूणच मेहनतीवर व दृढनिश्चयावर पोसल्या गेलेल्या-विस्तारलेल्या पिढिच्या मुळाशी खुप सारी नैसर्गिक जादूई तत्वं आहेत, ती अंगिकारणं व या मुळांच्या सत्वाने आपल्या इंद्रियांना परिपूर्णतेकडे नेण्याचा प्रयत्न करणं हे आपल्या नक्कीच हातात आहे.

आज लाॅकडाऊनमध्ये मुसळधार पावसात अचानक निघून गेलेल्या शेडगे सरांना लाॅकडाऊनच्या बंधनांमुळे शेवटचं पाहून नमस्कार करता आला नाही याची रूखरूख मनात जाणवतेय. डोळे मिटून त्यांना मनातूनच सांगितलं, शेडगे सर, तुम्हाला भेटता आलं नाही शेवटचं…

कानात त्यांच्या मृदू आवाजातले तेच शब्द पुन्हा वाजले,
.
.
“हरकत नाही”…!
.
.

– कल्पेश गोसावी.

(कल्पेश गोसावी हे जाहिरात, डिझाईन व सुलेखन (कॅलिग्राफी) क्षेत्रात कार्यरत असून मुंबईतील सोफिया पाॅलिटेक्नीक मध्ये कला विभागात अध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *