मुंबई उपनगरात आतापर्यंत ५३ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त; चिल्ड्रेन्स एड सोसायटी परिसरातील सुमारे ६ एकर भूखंड शासनाच्या ताब्यात
मुंबई, दि. ११, मुंबई उपनगरातील शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामांविरोधातील विशेष मोहिमेत प्रशासनाने मानखुर्द येथे मोठी कारवाई करत सायन-पनवेल महामार्गालगत उभारलेले ५७ अनधिकृत वाणिज्य गाळे हटवले. या कारवाईमुळे चिल्ड्रेन्स एड सोसायटी परिसरातील सुमारे ६ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त झाली असून ती पुन्हा शासनाच्या ताब्यात देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेली ही मोहीम महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त समन्वयातून पार पडली. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
समन्वयातून पार पडली नियोजनबद्ध कारवाई
या मोहिमेत समीर शेख, पोलीस आयुक्त, परिमंडळ ६ यांच्या सहकार्याने सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली. अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण) पूर्व उपनगर, उपविभागीय अधिकारी पूर्व उपनगरे, उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण) चेंबूर, तहसीलदार कुर्ला, पोलीस प्रशासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यंत्रणेने संयुक्तपणे नियोजन करून कारवाई पूर्ण केली.
अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला वेग
मुंबई उपनगर जिल्ह्यात शासकीय भूखंडांवरील वर्षानुवर्षे प्रलंबित अतिक्रमणे हटविण्यासाठी महसूल प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या मोहिमेला अधिक वेग मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या मोहिमेत यापूर्वीही विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटविण्यात आले आहे. मानखुर्द परिसरातील सुमारे १४ एकर, कुर्ला स्क्रॅप परिसरातील सुमारे ११ एकर, टाटा पॉवर लाईन आणि मुख्य महामार्गालगतच्या सुमारे ६ एकर जागेवरील अतिक्रमणे हटविण्यात आली होती.
याशिवाय देवनारमधील शकिला अन्सारी कंपाऊंड परिसरातील १७ निवासी घरे, चेंबूरमधील शंकरा कॉलनीतील २३ वाणिज्य गाळे हटवून सुमारे २ एकर जमीन ताब्यात घेण्यात आली. बोरीवली आणि अंधेरी तालुक्यातील अतिक्रमणे तसेच चिल्ड्रेन्स एड सोसायटी परिसरातील ताज्या कारवाईसह आतापर्यंत एकूण ५३ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
शासकीय जमिनींच्या संरक्षणावर प्रशासनाचा भर
मोठ्या क्षेत्रावर वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेली अतिक्रमणे हटविणे हे आव्हानात्मक मानले जात असले तरी विविध विभागांच्या संयुक्त नियोजनातून ही मोहीम सातत्याने पुढे नेण्यात येत आहे. मानखुर्दमधील ५७ वाणिज्य गाळ्यांवरील कारवाई ही या मोहिमेतील महत्त्वाची पायरी मानली जात असून, शासकीय जमिनींवरील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात प्रशासनाची कठोर भूमिका कायम राहणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
