हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने कागदपत्रांची तपासणी करून पात्र प्रकरणे नियमानुसार निकाली काढण्याच्या सूचना
छत्रपती संभाजीनगर, दि. ८ : कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दाखल होणाऱ्या प्रकरणांची छाननी अधिक स्पष्ट आणि नियमबद्ध पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला आहे. उपलब्ध शासकीय नोंदी, वंशावळ आणि इतर पुराव्यांची पडताळणी करून पात्र अर्जदारांना प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्याबाबत न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील कार्यपद्धती आणि विभागातील प्रकरणांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयातून त्यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.
बैठकीत कुणबी, मराठा-कुणबी तसेच कुणबी-मराठा प्रमाणपत्रांसाठी आवश्यक असलेल्या कागदोपत्री पुराव्यांची उपलब्धता, वंशावळ तपासणी आणि स्थानिक पातळीवरील यंत्रणांकडून होणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. नोंदींच्या आधारे पात्र ठरणाऱ्या प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून पुढील कार्यवाही करण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने कागदपत्रांची पडताळणी
हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने होणाऱ्या कार्यवाहीत शासन निर्णयातील तरतुदी लक्षात घेऊन अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची योग्य प्रकारे छाननी करण्याच्या सूचना न्यायमूर्ती शिंदे यांनी दिल्या. ग्राम आणि तालुका स्तरावरील यंत्रणांनी अर्जदारांना आवश्यक जुन्या नोंदी व संबंधित कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
या प्रक्रियेत उपलब्ध पुरावे आणि शासकीय नोंदी यांना महत्त्व असल्याने केवळ अर्ज प्राप्त करून न थांबता त्यांची नियमानुसार पडताळणी करून पात्र प्रकरणांवर पुढील कार्यवाही करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनीही विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये संबंधित प्रकरणांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. उपलब्ध नोंदींचा योग्य वापर करून पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र मिळविण्यात अडथळे येऊ नयेत, यासाठी विविध स्तरांवरील यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीला सह आयुक्त मंजूषा मिसकर, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे अध्यक्ष व सदस्य दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
दरम्यान, विविध जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती बैठकीत मांडली. त्यामुळे उपलब्ध नोंदींची छाननी, वंशावळ पडताळणी आणि पात्र प्रकरणांवरील पुढील कार्यवाही याबाबत जिल्हानिहाय स्थितीचा आढावा घेण्यात आला.
कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेत नियमांचे पालन करत पात्र अर्जदारांना आवश्यक कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र मिळण्याची कार्यवाही अधिक सुसूत्र करण्याच्या दृष्टीने या बैठकीतील मार्गदर्शन महत्त्वाचे मानले जात आहे.
