Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भारताची हवामानविषयक निरीक्षणे आणि सेवांसाठी उपयुक्त जीएसएलव्ही-एफ 14/इन्सॅट-3 डीएस उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

भारताची हवामानविषयक निरीक्षणे आणि सेवांसाठी उपयुक्त जीएसएलव्ही-एफ 14/इन्सॅट-3 डीएस उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्‍ली/श्रीहरीकोटा, दि. १७: इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र येथून आज दुपारी साडेपाच वाजता जीएसएलव्ही-एफ 14 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने इन्सॅट-3डीएस या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या प्रकल्पाला केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे संपूर्ण अर्थसहाय्य लाभले आहे.

आधीपासून आपापल्या कक्षेत कार्यरत असलेल्या इन्सॅट-3डी तसेच इन्सॅट-3डी आर या उपग्रहांकडून मिळत असलेल्या हंगाम, हवामान आणि महासागरांशी संबंधित हवामानविषयक सेवांमध्ये इन्सॅट-3डीएस या उपग्रहामुळे अधिक भर पडणार आहे. नव्याने प्रक्षेपित केलेला इन्सॅट-3डीएस हा उपग्रह पृथ्वीचा पृष्ठभाग, वातावरण, महासागर तसेच पर्यावरण यांच्या निरीक्षणविषयक कार्यांमध्ये सुधारणा करणे, माहिती संकलित करण्याच्या तसेच ती प्रसारित करण्याच्या क्षमता उंचावणे आणि उपग्रहाच्या सहाय्याने केली जाणारी संशोधन आणि बचाव कार्यविषयक सेवा सुधारणे ही कार्ये पार पाडेल. या उपक्रमामुळे भारतातील हंगामाशी, हवामानाशी तसेच महासागरांशी संबंधित निरीक्षणे आणि सेवा यांना चालना मिळणार असून त्यायोगे संबंधित क्षेत्रांतील ज्ञानाचा विस्तार होईल आणि भविष्यात अधिक उत्तम आपत्ती निवारण आणि त्यासंदर्भातील सुसज्जता साध्य करता येईल.

51.7 मीटर उंच आणि 4 मीटर रुंद जीएसएलव्ही-एफ14 या उपग्रह प्रक्षेपकाने इन्सॅट-3 डीएस या उपग्रहाला आधी अवकाशातील जिओसिंक्रोनस हस्तांतरण कक्षेत आणि त्यानंतर जिओसिंक्रोनस स्थिर कक्षेत स्थापित केले. इन्सॅट-3 डीएस हा उपग्रह इस्रोच्या सुसिद्ध आय-2के बस प्लॅटफॉर्मच्या सभोवती उभारण्यात आलेला 2,275 किलोग्रॅम वजनाचा उपग्रह आहे. तो पुढील अत्याधुनिक पेलोडसह सुसज्जित आहे: (i)पृथ्वी आणि तिच्या सभोवतालच्या वातावरणाची छायाचित्रे घेण्यासाठी सहा वाहिन्यांचा ऑप्टिकल रेडिओमीटर असलेला इमेजर पेलोड, (ii) वातावरणाची माहिती पुरवण्यासाठी 19 वाहिन्यांचा साउंडर पेलोड: तसेच दळणवळणासाठीचे पुढील पेलोड (iii) स्वयंचलित माहिती: संकलक मंचांनी पाठवलेली हवामानविषयक, जलसंबंधी तसेच महासागरविषयक माहिती स्वीकारण्यासाठी डाटा रिले ट्रान्सपाँडर आणि (iv) उपग्रहाच्या मदतीने शोध आणि बचावकार्य करणारा ट्रान्सपाँडर जो धोक्याचा इशारा किंवा सावधगिरीचा इशारा देणाऱ्या ट्रान्समीटरकडून आलेली माहिती जगभरात प्रसारित करू शकेल. इन्सॅट-3 डीएसच्या निर्मितीमध्ये भारतीय कंपन्यांनी लक्षणीय योगदान दिलेले आहे.

केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी), मध्यम पल्ल्याच्या हवामान अंदाजासाठीचे राष्ट्रीय केंद्र (एनसीएमआरडब्ल्यूएफ), भारतीय प्रादेशिक हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम), राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (एनआयओटी) तसेच महासागर माहिती सेवांसाठीचे भारतीय राष्ट्रीय केंद्र (आयएनसीओआयएस) यांच्यासह विविध भारतीय संस्था हवामानविषयक संशोधन आणि सेवांसाठी इन्सॅट-3 डीएस उपग्रहाकडून मिळालेल्या हवामानविषयक माहितीचा वापर करू शकतील. यामुळे देशाचे हंगामविषयक तसेच हवामानविषयक अंदाज, योग्य वेळचे इशारे आणि पूर्वसूचना तसेच सामान्य जनता आणि मच्छिमार व शेतकऱ्यांसारखे महत्त्वाचे वापरकर्ते यांच्यासाठी जारी करण्यात येणारी पत्रके यामध्ये अधिक अचूकता येईल. हवामानाची सद्यस्थिती आणि भविष्यकालीन अंदाजांच्या सेवांसाठी मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरणारा इन्सॅट-3 डीएस उपग्रह प्रक्षेपित केल्याबद्दल देश इस्रोचा आभारी आहे.

  

चित्रे: केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या अर्थसहाय्यातून निर्मित जीएसएलव्ही-एफ14/ इन्सॅट-3डीएस उपग्रह (डावीकडे),   जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपक (जीएसएलव्ही) -एफ14 (मध्यभागी), आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथून 17 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी साडेपाच वाजता झालेले  प्रक्षेपण (उजवीकडे)

इस्रोतर्फे जीएसएलव्ही-एफ14/ इन्सॅट-3डीएस मोहिमेचे तांत्रिक तपशील  पुढील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत:
https://www.isro.gov.in/media_isro/pdf/Missions/GSLVF14/GSLVF14-INSAT-3DS_Brochure_English.pdf.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *