Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

घरकुलाच्या कामांसाठी गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करावे- पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाबाबत आढावा

अकोला : रमाई घरकूल योजना व अन्य घरकूल योजनांद्वारे घरांची बांधकामे करण्यासाठी पुरेशा प्रमाणात वाळुची उपलब्धता आहे किंवा नाही या संदर्भात गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करावे असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी  आज येथे दिले.

पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत विविध विकास कामांकरीता पुरविण्यात आलेल्या निधीबाबत आढावा घेतला. यावेळी विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख,  जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता  धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वैशाली ठग, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक)  प्रकाश मुकुंदे, वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता कछोट तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा नियोजन समितीमार्फत विविध विभागांना देण्यात आलेल्या निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. त्यात सामाजिक न्याय विभागाकडे असलेला घरकुल योजनांच्या  निधीबाबत आढावा घेण्यात आला.  त्यावेळी घरकुलांची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी वाळुची उपलब्धता झाल्याबाबत गावनिहाय खातरजमा करावी,असे निर्देश देण्यात आले. तसेच शाळांच्या बांधकामांबाबत आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या दुरुस्ती कामांबाबत आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेकडे विविध विकासकामांसाठी देण्यात आलेला अखर्चित निधी बाबत  अहवाल सादर करावा, असे निर्देश कडू यांनी दिले.

ग्रामिण भागातील शाळांबाबत अहवाल देण्याचे निर्देश

जिल्ह्यात विशेषतः ग्रामिण भागात  ऑनलाईन शाळा सुरु करण्याबाबत कितपत शक्यता आहेत, याचा सविस्तर पाहणी करुन अहवाल द्यावा, असे निर्देशा पालकमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. यावेळी कडू म्हणाले की, ग्रामिण आणि शहरी भागात शिक्षणाच्या बाबतीत परिस्थिती भिन्न आहे.  ग्रामिण भागातील शाळांचे अनेक शिक्षक  शहरी भागात राहतात.  तर ग्रामिण भागातून अनेक विद्यार्थी हे शहरी भागात  शिक्षणासाठी येतात. त्यामुळे कोवीड च्या संक्रमणाच्या काळात ही वाहतुक होणे कितपत योग्य आहे याचा विचार व्हावा. तसेच  पालकांकडे किंवा विद्यार्थ्यांकडे मोबाईलची उपलब्धता याबाबतही परिस्थितीतील भिन्नतेची  जाण ठेवावी असे निर्देश कडू यांनी दिले. ऑनलाईन शिक्षणाबाबत शहरी आणि ग्रामिण भागासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करतांनाही शिक्षणाचा अधिकार कुणाचाही डावलला जाणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे, असेही कडू यांनी सांगितले.

‘वीज वितरण’ ने  अपघात प्रतिबंधात्मक  उपाययोजना राबवाव्या

जिल्ह्यात अनेक ठिकाणी विज वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या तारा, वाकलेले खांब, ट्रान्सफार्मर यामुळे ग्रामीण भागात अनेक अपघात होत असतात.  येत्या पावसाळ्यात असे अपघात होऊ नये यासाठी विज वितरण कंपनी ने अशा धोकादायक , अपघातप्रवण ठिकाणांची यादी तयार करावी. आणि प्रतिबंधात्मक उपाय, दुरुस्त्या राबवून  अपघात होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

पीक कर्जाची उपलब्धता पूर्ण करा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याबाबत व पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत तात्काळ कार्यवाही पूर्ण करावी व शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्जाची उपलब्धता करुन द्यावी, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले. यासंदर्भात जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तरानिया यांनी जिल्ह्यातील माहिती दिली. तसेच जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमार्फत करावयाच्या पीक कर्ज वितरणाचीही माहिती देण्यात आली. अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *