राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवरून इंडिया आघाडीत मतभेद; शरद पवारांची संमती आहे का, हे स्पष्ट करण्याचे राऊतांचे आव्हान
सातारा, दि. २८ : डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) भूमिकेवरून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील राजकीय तणाव वाढण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या पक्षावर तीव्र टीका केली आहे. या विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे महाराष्ट्राच्या हिताशी प्रतारणा असल्याचा आरोप करत, शरद पवार यांनी या निर्णयाला संमती दिली आहे का, हे स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
शुक्रवारी, २७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डिलिमिटेशन विधेयकाला पक्षाचा पाठिंबा असल्याची भूमिका मांडल्याचे वृत्त आहे. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेतली. दरम्यान, दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवारांच्या पक्षाचा एकही खासदार उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने डिलिमिटेशनच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला असताना राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका वेगळी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यावरून आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद उघड झाल्याची चर्चा सुरू आहे. याच मुद्द्यावर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शरद पवारांच्या पक्षासह केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली.
‘जनतेची फसवणूक करून खोटं बोलून विजय मिळवला’
डिलिमिटेशन विधेयकाच्या संभाव्य परिणामांबाबत बोलताना राऊत यांनी लोकसभेतील जागांची संख्या वाढवण्याच्या प्रस्तावावर आक्षेप घेतला. त्यांच्या मते, मतदारसंघांची पुनर्रचना केंद्र सरकारच्या इच्छेनुसार झाल्यास लोकशाही आणि संघराज्य व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. भारतीय जनता पक्षावर निवडणूक प्रक्रियेबाबत आरोप करत त्यांनी २०२९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव आणला जात असल्याचा दावा केला.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलेले वक्तव्य पुढीलप्रमाणे, “लोकशाहीचा गळा आवळणारं, लोकशाही खतम करणारं विधेयक आहे. ५४३ खासदारांच्या जागी ८६० खासदार आणायचे आणि त्या ८६० मतदारसंघाची पुनर्रचना आपल्या मर्जीप्रमाणे करून या देशातल्या जनतेच्या हातातली सत्ता खेचून घ्यायची कायमस्वरूपी आपल्या हातामध्ये अखंड सत्ता. हे भारतीय जनता पक्षाचं हा एक कारस्थान आहे. आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने जे विजय मिळवले, यापैकी कोणताही विजय हा मेरिटवर किंवा लोकांनी मतदान केलं म्हणून मिळवलेला नाही. २०१४ साली त्यांनी जनतेची फसवणूक करून खोटं बोलून विजय मिळवला. १५-१५ लाख रुपये आम्ही देऊ,अमुक करू, तमुक करू. त्यानंतर त्यांनी ईव्हीएमचा घोटाळा केला. त्यानंतर त्यांनी व्होट चोरी केली. व्होट चोरी, व्होट चोरी अशा प्रकारची कृत्य केली. विरोधी पक्षांना हे सगळं एक्सपोज केल्यावरती आता त्यांनी 2029 च्या विजयासाठी जे मिळावं म्हणून डीलिमिटेशन…आम्ही सांगू ते मतदारसंघ, आम्ही सांगू त्या पद्धतीने मतदारसंघ निर्माण केले जातील आणि 860 खासदार हे संसदेमध्ये आणले जातील. हे देशाच्या सुरक्षेला, देशाच्या एकंदरीतच रचनेला, फेडरल सिस्टीमला अत्यंत धोकादायक असा प्रकार आहे.”
‘देशाच्या लोकशाहीची ही अखेरची धोक्याची घंटा’
यापूर्वी लोकसभेत नामंजूर झालेल्या विधेयकाचा संदर्भ देत राऊत यांनी नव्याने प्रस्ताव आणण्यावर प्रश्न उपस्थित केले. खासदारांची खरेदी आणि पक्ष फोडण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या भूमिकेवर टीका करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विशेष उल्लेख केला.
त्यांचे वक्तव्य, “हे बिल एकदा कोसळलंय. 100 दिवसांपूर्वी हे विधेयक जेव्हा लोकसभेत आलं, तेव्हा प्रचंड म्हणजे मताधिक्याने हे बिल आम्ही पराभूत केलं. ते पराभूत केल्यावर तेच विधेयक पुन्हा जर अमित शहा घेऊन येत असतील आणि त्यासाठी घोडेबाजार त्यांनी केला असेल, म्हणजे खासदारांना विकत घेणं, पक्ष विकत घेणं, तर देशाच्या लोकशाहीची ही अखेरची घंटा आहे धोक्याची. यापुढे या देशामध्ये लोकशाही राहणार नाही. या देशामध्ये स्वातंत्र्य राहणार नाही आणि या देशामध्ये संविधान राहणार नाही. काही पक्षांनी महाराष्ट्रातल्या या विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत भूमिका घेतली आहे, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आहे. जर त्यांनी असा निर्णय खरोखर घेतला असेल आणि जाहीर केला असेल, तर तो त्यांच्या पक्षाच्या विचारधारेसाठी आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अत्यंत दुर्दैवी असा तो निर्णय असेल.यापुढे अशा कोणत्याही पक्षाने फुले, शाहू, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नये, असं माझं स्पष्ट मत आहे.”
‘शाहांनी आणि मोदींनी शरद पवारांचा पक्ष फोडला, कुटुंब फोडलं’
शरद पवारांच्या पक्षाने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्यास तो राजकीय स्वाभिमानाचा प्रश्न असल्याचे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेल्या खासदारांच्या पाठिंब्याचा उल्लेख करत त्यांनी भाजपविरोधात एकत्र लढलेल्या पक्षाने स्वतंत्र भूमिका घेणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले.
अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावर शरद पवारांचा पक्ष तसेच कुटुंब फोडल्याचा आरोप करत राऊत यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचाही उल्लेख केला. या दोन्ही नेत्यांना भाजपविरोधातील संघर्षामुळे तुरुंगात जावे लागल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या मते, अशा पार्श्वभूमीवर भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेणे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेशी विसंगत ठरेल.
राऊत यांनी यासंदर्भात केलेले वक्तव्य, “आपण महाविकास आघाडी म्हणून तुमचे आठ खासदार निवडून आलेले आहेत. त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे. त्यात भारतीय जनता पक्ष नाही, तुम्हाला निवडून आणण्यामध्ये आणि जवळजवळ आठ पैकी पाच ठिकाणी आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा पराभव केलेला आहे. अशा वेळेला आपण एकतर्फी निर्णय घेऊन सरकारच्या बाजूने उभे राहत असाल,तर असं महाराष्ट्राची जनता हे सहन करेल असं मला वाटत नाही. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ज्या पक्षाने म्हणजे अमित शाहांनी आणि मोदींनी शरद पवारांचा पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान गहाण ठेवण्याचा विषय असू शकतो आणि त्या सगळ्यातच जर आपण जाणार असाल भारतीय जनता पक्षाला मदत करण्याच्या भूमिकेतून, तर या पक्षाने अनिल देशमुखांची माफी मागायला पाहिजे, जे तुरुंगात गेले त्या भारतीय जनता पक्षाने अमित शाहांमुळे. नवाब मलिकांची माफी मागायला पाहिजे, नवाब मलिक तेव्हा महत्त्वाचे नेते होते, त्यांची माफी मागायला पाहिजे. हे दोन्ही नेते अमित शाहा आणि मोदींच्या प्रवृत्तीविरुद्ध लढत होते आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं आणि आज आत्ताची काही लोकं जर भारतीय जनता पक्षाशी अशा प्रकारे सत्तेसाठी हातमिळवणी करणार असतील, तर हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहणार नाही लक्षात घ्या. या महाराष्ट्राचं अधःपतन करण्याची भूमिका ही गेल्या काही काळापासून मोदी आणि शाहांनी घेतलेली आहे आणि त्यांचे हात बळकट करणं हा महाराष्ट्राशी केलेला द्रोह आहे. हा मराठी माणसाशी केलेला द्रोह आहे आणि आम्ही हा सहन करणार नाही.”
‘इंडिया आघाडीत स्थान राहणार नाही’
इंडिया आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार गैरहजर राहणार असल्याच्या वृत्तावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आघाडीमध्ये मिळालेला सन्मान आणि राजकीय स्थान लक्षात घेता, सरकारच्या बाजूने स्वतंत्र भूमिका घेतल्यास पक्षाला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत स्थान राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत राऊत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या भूमिकेमुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याची टीका केली. तसेच डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या निर्णयामागे शरद पवार यांची संमती आहे का, याचे उत्तर पक्षाने द्यावे, अशी मागणी केली.
यावेळी राऊत म्हणाले, “नाही तर तोंड काय नाही जाणार? जर तुम्ही महाराष्ट्राचे शत्रू, अमित शाहा आणि नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेणार असाल, आणि ज्या इंडिया ब्लॉकमध्ये तुम्हाला आतापर्यंत मानसन्मान मिळाला, प्रतिष्ठा मिळाली, सर्व काही मिळालं, महाविकास आघाडीने दिलं. तुम्ही जर त्यांच्या विरोधामध्ये एकतर्फी भूमिका घेणार असाल, तर मला वाटतं की तुम्ही तुम्हाला भाजपमध्ये स्थान राहणार नाही आणि तुम्हाला महाविकास आघाडी इंडिया ब्लॉकमध्ये स्थान राहणार नाही. शरद पवार यांनी गेल्या ६० वर्षांमध्ये जी उत्तुंग झेप राजकारणामध्ये आणि समाजकारणात घेतली, हे तर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या हयातीत हे संपूर्ण नष्ट करून टाकल्यासारखं दिसतंय.या लोकांनी एक स्पष्ट केलं पाहिजे. हा जो अमित शाहांना पाठिंबा देण्याचा निर्णय, मी भाजप म्हणत नाही, मी अमित शाहांना पाठिंबा देण्याचा निर्णय म्हणतोय, जो महाराष्ट्राचा शत्रू आहे, त्याला पाठिंबा देण्याचा निर्णयाला शरद पवारांची संमती आहे का? हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे.”
डिलिमिटेशन विधेयकावरील भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे या घडामोडींमधून दिसत आहे. मात्र, या विधेयकाबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची अधिकृत भूमिका काय आहे, तसेच इंडिया आघाडीच्या बैठकीतील पक्षाचा सहभाग कसा असेल, याबाबतची स्पष्टता पुढील घडामोडींनंतरच मिळणार आहे.

