बळसाणे येथे नवीन वीज उपकेंद्राचे भूमिपूजन; १२ गावांच्या विकासाला मिळणार नवी ऊर्जा
धुळे, दि. १ : साक्री तालुक्यातील बळसाणे परिसरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या ३३/११ के.व्ही. क्षमतेच्या नवीन वीज उपकेंद्रामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम, दर्जेदार आणि विश्वासार्ह होणार असून शेती, घरगुती वापर, लघुउद्योग तसेच भविष्यातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
साक्री तालुक्यातील बळसाणे (सतमाने फाटा) येथे आयोजित नवीन वीज उपकेंद्राच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमास विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता सायस दराडे, कार्यकारी अभियंता भाऊसाहेब पाटील, अपर तहसीलदार अधिकार पेंढारकर, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, बळसाणेचे सरपंच ज्ञानेश्वर हालोरे, महावितरणचे अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील वाढत्या वीज मागणीचा विचार करून हे नवीन उपकेंद्र उभारण्यात येत आहे. त्यामुळे वारंवार होणारे तांत्रिक अडथळे कमी होतील, वीज दाबात सुधारणा होईल आणि शेतीसाठी आवश्यक असलेला दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होईल. सिंचन प्रकल्प, कृषी पंप, घरगुती ग्राहक, व्यापारी आस्थापना आणि लघुउद्योग यांना या सुविधेचा थेट लाभ होणार आहे.
या उपकेंद्रासोबत मुख्य वीजवाहिनी आणि जोडणी वाहिन्यांची कामेही करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे बळसाणे, कढरे, सतमाने, आगरपाडा, दुसाने, इंदवे, हट्टी, ऐचाळे, डोंगराळे तसेच इतर तीन पाड्यांसह एकूण १२ गावांतील नागरिकांना अधिक सक्षम व अखंडित वीजसेवा मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पाणी, वीज आणि शेतीमालाला योग्य बाजारभाव या तीन महत्त्वाच्या घटकांवर शासन विशेष भर देत असल्याचे सांगताना त्यांनी विविध सिंचन प्रकल्प, बंधारे, विहिरी आणि जलसंधारणाच्या कामांद्वारे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले.
धुळे जिल्ह्यात ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित केल्या जात असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, शिंदखेडा शहरासाठी १३२ के.व्ही. क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यात आले आहे. शिरपूर येथे २२० के.व्ही. क्षमतेचे उपकेंद्र कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू असून दहिवद परिसरातही ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प राबविले जात आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
धुळे जिल्हा सौरऊर्जेचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित होत असल्याचे नमूद करताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या सौरऊर्जेचा लाभ स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना प्राधान्याने मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ‘कुसुम’ योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर सौर पंप वितरित करण्यात आले असून अनेक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. विविध ठिकाणी सौरऊर्जा केंद्रांची उभारणी करण्यात येत असून शेतकऱ्यांना अधिक काळ वीज उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
सौरऊर्जेची निर्मिती अधिक प्रभावी करण्यासाठी ऊर्जा साठवण तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावरही शासन भर देत आहे. सौरऊर्जेची वीज बॅटरीमध्ये साठवून तिचा नियोजनबद्ध वापर करण्याच्या दृष्टीने अभ्यास आणि प्रयोग सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ऊर्जा क्षेत्रातील विविध विकासकामांना गती मिळाली असून नवीन उपकेंद्रे, वीज प्रकल्प आणि वितरण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील वीजपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. तर अधीक्षक अभियंता सायस दराडे यांनी प्रास्ताविकातून उपकेंद्राच्या तांत्रिक वैशिष्ट्यांची माहिती दिली.
बळसाणे येथे उभारण्यात येणारे नवीन वीज उपकेंद्र हे केवळ वीजपुरवठ्याची सुविधा वाढविणारे पाऊल नसून ग्रामीण विकास, शेती उत्पादनक्षमता, उद्योगवृद्धी आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरणार असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
