“‘मुंबई स्टॉक एक्सचेंज’समोर स्वर्गीय बाबूजींचा पुतळा हा त्यांच्या कार्याचा गौरव” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २ : स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ समाजनेते, माजी मंत्री आणि मराठी पत्रकारितेतील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व स्वर्गीय जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे आज मुंबईतील ‘मुंबई स्टॉक एक्सचेंज’ समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. देशातील आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्राचे प्रमुख केंद्र मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी बाबूजींचा पुतळा उभारला जाणे हा त्यांच्या बहुआयामी कार्याचा सन्मान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, माजी खासदार विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “‘मुंबई स्टॉक एक्सचेंज’ देशभरासाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. अशा ठिकाणी स्वर्गीय बाबूजींचा पुतळा असणे, हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेत देशभक्तीची प्रेरणा समाजात जागवली. युवकांना संघटित करून त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या संघर्षात त्यांनी कारावासही भोगला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला वाहून घेतले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यवतमाळमधील शालेय जीवनापासूनच बाबूजी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते. त्या काळातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विचारांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडला आणि त्यातूनच सार्वजनिक जीवनात राष्ट्रहित, समाजसेवा आणि लोककल्याणाची भूमिका त्यांनी स्वीकारली.
महाराष्ट्र शासनात मंत्री म्हणून कार्यरत असताना स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांनी विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. प्रशासनातील त्यांची कार्यपद्धती, लोकाभिमुख निर्णय आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यांची छाप आजही संबंधित विभागांमध्ये जाणवते, असे मुख्यमंत्री यांनी नमूद केले.
पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांनी मराठी पत्रकारितेला नवी दिशा देत ‘लोकमत’ या वृत्तपत्र समूहाची मुहूर्तमेढ रोवली. आज लोकमत समूह राज्यासह देशातील मराठी माध्यमविश्वातील अग्रगण्य संस्थांपैकी एक म्हणून ओळखला जातो. मुद्रित माध्यमांबरोबरच डिजिटल, दूरदर्शन आणि विविध प्रसारमाध्यमांमध्येही लोकमतने आपली भक्कम ओळख निर्माण केली असून, या यशाचे मूळ श्रेय बाबूजींच्या दूरदृष्टीला आणि पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाला जाते, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा गौरव करत त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, समाजकारण, राजकारण आणि पत्रकारिता या सर्व क्षेत्रांतील कार्याचा उल्लेख केला. देशहित, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी उभारलेला आदर्श आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
‘मुंबई स्टॉक एक्सचेंज’सारख्या देशाच्या आर्थिक राजधानीतील ऐतिहासिक स्थळी स्वर्गीय बाबूजींचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आल्याने त्यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावरील अभिवादन मिळाले असून, स्वातंत्र्यसैनिक, लोकनेते आणि पत्रकार म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाची नव्याने आठवण या निमित्ताने सर्वांना झाली.

