Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“तू कायम मित्रांच्याच गराड्यात cheers 🍻करत असायचास”

दारु पिऊन मृत झालेल्या नवऱ्याला त्याच्या विधवा पत्नीने लिहीलेलं पत्र!

आज वटपौर्णिमा! बायकांनी जन्मोजन्मी ‘हाच’ नवरा हवा म्हणून वडाच्या झाडाला ७ फेऱ्या मारल्या असतील. यावेळी बायकांच्या मनात नेमके कोणते विचार चालू असतात हे मोठं कोडं आहे. आज दिवसभर समाज माध्यमांवर दारू पिऊन मृत झालेल्या नवऱ्याला त्याच्या बायकोने लिहिलेलं एक मनःस्पर्शी पत्र व्हायरल होतंय. या पत्रात नेमकं काय लिहिलंय ते पाहुयात.

“काल तुझा अकाली मृत्यू झाला. आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे, मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पागोष्टी, थट्टामस्करी करण्याचे तुझे वय. परंतु त्या सुखाला तू कायमचा मुकलास. मात्र तुझ्या मृत्युमुळे या आनंदाला तुझी मुलं देखील पोरकी झाली. तुझी बायकोही मुकली या सुखाला अन् पती सुखालाही. काय कारण होतं या सगळ्याचं? तू खोट्या आनंदात रममाण झाला होतास.

त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतोस याचे तुला भानच राहिले नव्हते.

लग्न झाल्यापासून पाहतेय, तू कायम मित्रांच्याच गराड्यात cheers 🍻करत असायचास. मित्र असावेतच, पण आपलं कुटुंब सुद्धा आहे, त्याबद्दल आपली जबाबदारी सुद्धा आहे. याचा तुला विसर पडला होता.

शिवाय रोज रात्री बाटली घेऊन घरी बसणे 🍷होतेच. त्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होतो याची तू चिंताच करत नव्हतास. रोज रात्री ९ नंतर बाबा आपले नाहीत याची त्यांना जणू सवय लागली होती, पण तुझी भीतीही वाटत होती. बायकोवर हात उगारणे, भांडणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झाले होते. आपली मुलं कितवीत आहेत, त्यांना काय हवे, काय नको, याची तुला परवाच नव्हती. तू आणि तुझे मित्र.

दारू ही औषधी आहे, हृदयविकार दूर ठेवते वगैरे पेपर मधली माहिती तू दाखवायचास, परंतु त्याच दारूमुळे आपल्यातला दुरावा वाढलेला तुला समजलाच नाही किंवा समजून घेण्याची तुझी इच्छाच नव्हती. जर ही बाटली एवढा आनंद देणारी, औषधी असेल तर ती मी आणि मुलांनी घेतली तर तुला चालली असती का?
अधूनमधून तुला प्रेमाचे भरते यायचे व तू दारू सोडायचे ठरवायचास, परंतु परत मित्रच आडवे यायचे. कुठल्या तरी आनंदात किंवा कोणाच्या तरी दु:खात तू परत त्यांच्या बरोबर बसायचास, की मग पुन्हा सर्व सुरु. मित्राला परत परत दु:खात लोटणारे असले कसले रे हे मित्र? जीवनात आनंद मिळवण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत. परंतु तुम्ही सर्वांनी मात्र वाईट मार्गच निवडला. दारू पिणं सोडून बघितलं असतंस तर यातले अर्ध्याहून अधिक मित्र गायब झाले असते.

तुझी आजारपणे चालू झाली आणि घराची आर्थिक विवंचना अजूनच वाढली. तुझ्या पोटात झालेले पाणी काढणे, लिवरची सूज उतरवायला औषधे घेणे, हे सोपस्कार चालू झाले. माझ्या सुद्धा ऑफिसला दांड्या चालू झाल्या. हौसमौज करणे दूरच, मुलांची फी सुद्धा वेळेवर भरली जात नव्हती.

तुझ्या शेवटच्या आजाराने तर डोक्यावर कर्ज करून ठेवले. तू बरा होणार नाहीस माहित असून सुद्धा तुझ्या औषधोपचाराचा खर्च थांबवला नाही आम्ही.

सरकारला सुद्धा दारूबंदी नको आहे. कारण त्यांचे फक्त मिळणाऱ्या महसूलाकडेच लक्ष आहे. पण माणसाची काम करण्याची ताकद कमी होणे, आजारपण वाढणे यामुळे होणारे नुकसान सरकारला दिसत नाही का? शिवाय नवरा/मुलगा/वडील गमावणे याची किंमत पैश्यात कशी मोजणार आहे हे सरकार?

आता तुझ्या आई वडिलांची सेवा, मुलांचे शिक्षण व संस्कार हे सर्व माझी एकटीची जबाबदारी झाली आहे. ती मी पार पाडीनच पण महत्वाचे म्हणजे माझ्या मुलांना या ‘एकच प्याला’ पासून दूर ठेवणे माझ्या दृष्टीने फार महत्वाचे आहे.

पुढच्या जन्मात मला तूच नवरा म्हणून हवा आहेस, परंतु तुझ्या हातात ❌🍺🍷🔚ग्लास नसेल तरच…

तुझीच प्रिय अर्धांगी
X.Y.Z

सौजन्य – फेसबुक (पत्र निनावी आहे)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *