Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

स्थानिकांच्या सहभागाने होणार लोणारचा विकास – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

लोणार सरोवर जतन संवर्धन व विकासाबाबत आढावा बैठक

बुलडाणा, दि.५ : लोणारसारखी स्थळे हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. या वैभवाचे जतन, संवर्धन करुन त्यांचा विकास करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. हा विकास करताना स्थानिक गावकऱ्यांचे प्रश्न समाजावून घेऊ, त्यांची सोडवणूक करू व त्यांचा सहभागही ह्या विकास प्रक्रियेत करुन घेऊन हा आराखडा राबविण्यात येईल. याच धर्तीवर ‘मातृतीर्थ सिंदखेडराजा’ चा ही विकास करण्यात येईल, तेथेही आपण लवकरच भेट देऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी लोणार येथील जगप्रसिद्ध सरोवराची पाहणी करून या परिसराचे जतन संवर्धन व विकासाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, आमदार राजेश एकडे, लोणार नगराध्यक्ष पूनम पाटोळे, मुख्य सल्लागार अजोय मेहता, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी एस.राममूर्ती, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर मिना, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया,  माजी आमदार डॉ. शशीकांत खेडेकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी लोणार सरोवर संवर्धन विकास कामांबाबत सादरीकरण केले. यात प्राधान्याने करावयाच्या कामांची माहिती देण्यात आली.  सुलतानपूर येथील कौशल्य विकास केंद्र व अंजनी खुर्द येथील आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, लोणार परिसर आणि यासारखी अनेक स्थळे ही महाराष्ट्राचे वैभव आहेत. हा लपलेला खजिना आहे. हा आपल्याला जगासमोर आणायचा आहे. लोणार सरोवर परिसराचे जतन संवर्धन करताना निश्चित प्राधान्यक्रम ठरवून कामे केली जातील. यात जे-जे नैसर्गिकरित्या प्राप्त झाले आहे ते जतन करणे याला प्राथमिकता असेल. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सोयी सुविधा निर्माण करणे. सांडपाण्याची पर्यायी व्यवस्था करणे, प्रक्रिया करणे ह्या सर्व बाबी विकास आराखड्यात आहेत. ह्या विकास आराखड्याला निधी कमी पडू देणार नाही. तसेच प्राचीन मंदिरांचेही जतन संवर्धन केले जाईल. याचाच एक भाग म्हणून लोणार महोत्सव आयोजित करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, हा विकास करताना स्थानिक गावकऱ्यांचा सहभाग घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर ते समाजावून घेऊन सोडवणूक करू आणि सर्व मिळून ह्या परिसराचा विकास करु, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. याच धर्तीवर मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील विकास करावयाचा आहे. त्यासाठी नियोजित आराखड्यावर  मुंबईत बैठका होतील. या विकासाबाबत प्रश्न समजावून घेऊन त्यावरचे उपाय निश्चित करून मग प्रत्यक्ष सिंदखेडराजाला भेट देण्यासाठी आपण येऊ, अशी ग्वाहीही ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ठरल्याप्रमाणे आराखडा नक्की झाल्यावर होणारे काम हे वेगात आणि पक्के व्हायला हवे. हे वैभव जपण्याची व त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपणा साऱ्यांची आहे. लोणारच्या विकासासाठी मी थेट मुख्यमंत्री कार्यालयातून नियंत्रण ठेवेन, प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येईल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. तहसिलदार सैफन नद्दाफ यांनी सूत्रसंचालन केले.

 लोणारचा विषय पूर्वीपासूनच मनात; मुख्यमंत्री रमले आठवणीत

लोणारबाबत, ‘मुख्यमंत्र्यांनी सांगितले हा विषय फार पूर्वीपासून मनात होता. बऱ्याच वर्षांपूर्वी मी लोणार येथे आलो होतो. येथील मी काढलेले छायाचित्र माझ्या छायाचित्र प्रदर्शनात लावले होते. प्रदर्शन पहायला येणारे लोक लोणारच्या छायाचित्रापाशी थबकत. ते याबद्दल कुतुहलाने चौकशी करत. इथे यायचं कसं? थांबायचं कुठं अशी माहिती विचारत. त्या वेळपासूनच ह्या भागाचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने झाला पाहिजे हे मनात होते. म्हणूनच मी आज इथे आलो, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

असा आहे लोणार संवर्धन व विकास आराखडा

लोणार सरोवर संवर्धन व जतन करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ९१ कोटी २९ लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. त्यात प्रयोगशाळा व पर्यटक माहिती केंद्र, तारांगण व संग्रहालय, दुर्गा टेकडी परिसरात रस्ते, सांडपाणी, वाहनतळ व सुशोभिकरण, सरोवराजवळील सुरक्षा कक्ष, निरीक्षण तळ, प्रदूषण विरहित बसेस आदी कामे तसेच सरोवर परिसरातील पुरातन मंदिरांचे संवर्धन, शासकीय इमारतींचे नूतनीकरण, दुर्गा टेकडी येथे पर्यटक निवास बांधणे प्रस्तावित आहेत. याशिवाय ६१ कोटी रूपयांचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नगर परिषद, लोणार व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत राबविण्यात येणार आहे. तसेच ३ कोटी ६३ लाख रुपये खर्चून पिसाळ बाभूळ निष्कासन प्रकल्प विभागीय वनाधिकारी, वन्यजीव अकोला या यंत्रणेमार्फत राबविण्यात येईल. ५४ हेक्टर क्षेत्रावर हे काम करण्यात येईल. तसेच परिसराच्या विकासासाठी आवश्यक खाजगी जमीन  संपादनासाठीही १५ कोटी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव आहे. एकूण लोणार सरोवर परिसराचा विकास करण्यासाठी २०५ कोटी १२ लक्ष रुपयांचा विकास आराखडा करण्यात आला असून  त्यातून मंजुरी मिळालेल्या व निधी प्राप्त झालेले साडेसात कोटी रुपयांची कामे पूर्ण ही झाली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

लोणार सरोवर

लोणार हे बुलडाणा जिल्ह्यात असून येथे उल्कापाताने तयार झालेले मोठे विवर आहे. इतक्या मोठ्या आकाराचे व बेसॉल्ट खडकातील हे एकमेव विवर आहे. या ठिकाणी  झालेल्या उल्कापाताचा काळ हा सुमारे ५० हजार वर्षापूर्वीचा असावा, असे मानले जाते. या सरोवराचा व्यास सुमारे १८३० मिटर तर खोली १५० मिटर आहे. वर्तुळाकार असलेल्या या सरोवराचा परिघ सहा किमी इतका आहे. या परिसरात अनेक  प्राचीन मंदिरे आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *