वसुंधरा राजे राष्ट्रीय उपाध्यक्ष; पियूष गोयल यांच्याकडे कोषाध्यक्षपद, महाराष्ट्रातील नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी
नवी दिल्ली, दि. १७ : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा फेरबदल करत नवी राष्ट्रीय टीम जाहीर केली आहे. पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी जाहीर केलेल्या या नव्या रचनेत महाराष्ट्राचे खासदार विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपद कायम ठेवण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना राष्ट्रीय सरचिटणीसपद देत पुन्हा सक्रिय संघटनात्मक भूमिकेत आणण्यात आले आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपच्या नव्या राष्ट्रीय संघटनेत अनुभवी नेत्यांसोबत विविध राज्यांतील नेतृत्वाला स्थान देण्यात आले आहे. १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय सरचिटणीस आणि १६ राष्ट्रीय सचिव अशी प्रमुख संघटनात्मक रचना या नव्या टीममध्ये आहे.
महाराष्ट्रातील नेत्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
नव्या राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्वही ठळकपणे दिसून येत आहे. विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. तावडे हे भाजपच्या केंद्रीय संघटनेतील महत्त्वाचे रणनीतीकार म्हणून यापूर्वीही विविध जबाबदाऱ्या सांभाळत आले आहेत.
डॉ. भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याकडे राष्ट्रीय कोषाध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. भाजपच्या डिजिटल आणि समाजमाध्यमाशी संबंधित संघटनात्मक रचनेतही बदल करण्यात आला आहे. दीपक मस्के यांच्याकडे पक्षाच्या माहिती-तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमाशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून, अमित मालवीय यांच्या भूमिकेत बदल झाला आहे.
स्मृती इराणींचे संघटनेत पुनरागमन
माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना राष्ट्रीय सरचिटणीसपद देण्यात आल्याने या नियुक्तीकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता इराणी यांचा राजकीय अनुभव आणि संघटनात्मक कामाचा उपयोग पक्षाला होण्याची शक्यता आहे.
इराणी यांचे पक्षाच्या राष्ट्रीय संघटनेत पुनरागमन हे भाजपच्या नव्या संघटनात्मक मांडणीतील महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जात आहे. विशेषतः उत्तर प्रदेशात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.
वसुंधरा राजे यांनाही राष्ट्रीय पातळीवर स्थान
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत राम माधव यांनाही राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. अनुभवी आणि प्रभावी प्रादेशिक नेतृत्वाला राष्ट्रीय संघटनेत स्थान देण्याचा भाजपचा प्रयत्न या नियुक्त्यांमधून दिसून येतो. भाजपने बी. एल. संतोष यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) पद कायम ठेवले आहे. पक्षाच्या संघटनात्मक व्यवस्थेत हे अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाते
आगामी काळातील निवडणूक समीकरणांचा विचार करता उत्तर प्रदेशला नव्या राष्ट्रीय टीममध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे. नव्या संघटनेत उत्तर प्रदेशातील ८ नेत्यांना स्थान मिळाले आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रचना महत्त्वाची मानली जात आहे.
महिला नेतृत्व आणि विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधित्व वाढविण्यावरही नव्या टीममध्ये भर दिसून येतो. उपलब्ध माहितीनुसार नव्या राष्ट्रीय संघटनेत १० महिला नेत्यांना स्थान मिळाले आहे. तसेच अल्पसंख्याक समाजातील ६ नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
निवडणुकांपूर्वी संघटनात्मक पुनर्बांधणी
नितीन नवीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील संघटनात्मक फेरबदलाला वेग आला आहे. मे महिन्यात विविध राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या झाल्यानंतर राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नवी टीम जाहीर करण्यात आली आहे.
या नव्या रचनेत एकीकडे पक्षातील अनुभवी नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कायम ठेवण्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे काही नेत्यांना पुन्हा केंद्रीय संघटनेत सक्रिय भूमिका देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी, राज्यनिहाय समन्वय आणि पक्षाचा विस्तार यावर नव्या टीमचा भर राहण्याची शक्यता आहे.
भाजपसमोर आगामी काळात विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांसोबत पुढील लोकसभा निवडणुकीचीही दीर्घकालीन तयारी करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखालील या नव्या राष्ट्रीय टीमच्या माध्यमातून पक्षाची निवडणूक आणि संघटनात्मक रणनीती कोणत्या दिशेने जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
