Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“कोरोनासारख्या संकटातही जनतेसोबत…!” – राज्यमंत्री बच्चू कडू

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले मनोगत

अकोला, दि.१५: स्वातंत्र्य दिनाचा ७३ वा वर्धापन दिन साजरा करताना मागे वळून पाहताना हेच लक्षात येते की विद्यमान महाविकास आघाडी शासन काळातील मोठा कालावधी हा केवळ कोरोना या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यात गेला. पण या आपत्तीच्या काळातही शासन म्हणून जनतेच्या सेवेत आपण कोठे कमी पडलो? आपण आणखी काय करावयास हवे होते? याचे सिंहावलोकन होणे आवश्यक आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन महत्त्वाकांक्षी योजना होत्या. त्या म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व गोरगरिबांना अन्न देणारी शिवभोजन योजना. आपल्या जिल्ह्यात आपण लगेचच या योजनांवर काम करणे सुरु केले होते. ३१ मे पर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देणे आवश्यक होते. आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख दोन हजार ७०९ पात्र शेतकरी सभासद असून त्यात आधार प्रमाणिकरण व अन्य प्रक्रिया पूर्ण करुन आतापर्यंत ८८ हजार ३६५ शेतकऱ्यांना ५६३ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. मात्र त्या दरम्यानच मार्च महिन्याच्या मध्यात कोरोनाचे संकट देशावर घोंघावू लागले. या जागतिक संकटाचा मोठ्या धीराने आणि संयमाने सामना करणे आवश्यक होते. त्या दिशेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सबंध शासन आणि शासनाची यंत्रणा उभी टाकली. यात आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांचे विशेषत्वाने कौतूक केले पाहिजे. त्यासाठीच त्यांना ‘फ्रंट लाईन कोरोना वॉरियर’ असे संबोधण्यात आले.

कोरोनाच्या संकटाचा पहिला टप्पा हा लॉकडाऊनचा होता. त्यामुळे अनेक स्थलांतरित मजूरांचा प्रश्न निर्माण झाला. या मजूरांना आपापल्या गावी पोहोचविण्यात जिल्हा प्रशासनाने मोठी मोलाची भूमिका बजावली. आपल्या जिल्ह्यातून तब्बल ४७३३ मजूरांना त्यांच्या गावी सुखरुप पाठविण्यात आले. जिल्ह्यात २६ जानेवारी २०२० पासूनच शिवभोजन थाळी केंद्र सुरु झाले होते. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात गोरगरिबांची उदरभरणाची व्यवस्था व्हावी यासाठी ही केंद्र संख्या दोन वरुन १३ पर्यंत वाढविण्यात आली. त्यातून आपण या संपूर्ण लॉकडाऊन कालावधीत या सर्व केंद्रांवरुन दररोज १५०० या प्रमाणे आतापर्यंत तीन लाख ६८ हजार थाळींचे वाटप केले आहे.

कोरोनाचे संकट आले तेव्हा आपल्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांची सज्जता करण्यावर आपण भर दिला. त्यातूनच जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु करण्यात आली. त्यात आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजाराहून अधिक जणांचे नमुने आपण तपासले. आजतागायत तीन हजारांहून अधिक लोक पॉझिटिव्ह आले. त्यातील २५०० हून अधिक लोक बरे होऊन घरी गेले. सद्यस्थितीत ५०० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत, तर १२७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आपत्तीने आपल्याला खूप काही शिकवले. अगदी डोळ्यानेही न दिसणारा हा विषाणू आपले जीवनमान बदलविणारा ठरला. या आजारावर लवकरात लवकर औषध सापडावे हीच आजच्या दिवशी मी प्रार्थना करतो.

या काळात अनेक सेवाभावी संस्थांनी अन्नदानासारख्या उपक्रमाचे आयोजन करुन आपल्या समाजातील गोरगरिबांना मदत केली. शासनानेही स्वस्तधान्य दुकानांमार्फत अन्नधान्याचे वितरण केले, त्यासाठी रेशन कार्ड असणे ही अटही काढून टाकण्यात आली. लॉक डाऊनच्या या कालावधीतही आपला शेतकरी हा सज्ज होता. आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कष्ट करुन तब्बल पाच हजार ७१० मेट्रीक टन शेतमालाचे उत्पादन करुन तो विक्री केला. त्यातून १० कोटी ८४ लक्ष रुपयांचे उत्पादन घेतले. यामुळे आपल्या जिल्ह्यात व शेजारील जिल्ह्यात तसेच परराज्यातही अन्नधान्याची उपलब्धता या आपत्तीच्या काळात झाली. हे उत्पादन करण्यात आणि ते विक्री करण्यात जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे ३६० गट सक्रिय होते.

याच कालावधीत कृषी विभागाने घरपोच कृषी निविष्ठा या उपक्रमात जिल्ह्यात ८०८ शेतकरी गटांच्या माध्यमातून तब्बल १० हजार ६०१ मेट्रीक टन खते, ३० हजार ९५ क्विंटल बियाणे थेट शेतकऱ्यांना घरपोच देण्यात आले. या उपक्रमाचा लाभ ४५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना झाला. आगामी हंगामात करावयाच्या शेती संदर्भात तांत्रिक मार्गदर्शनासाठी जिल्ह्यात कृषी संजिवनी सप्ताह राबवून २५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्ह्यात ६२ हजार ९९३ शेतकऱ्यांकडून १८ लाख ४४ हजार ३४१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे त्यातील २६ हजार ९९० शेतकऱ्यांकडून सात लाख ४९ हजार ७०० क्विंटल कापूस कोरोना मुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत करण्यात आला. जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठीही प्रशासनाने प्रयत्न केले आहेत. ३१ जुलै पर्यंत खरीप हंगाम २०२० साठी जिल्ह्यातील दोन लाख चार हजार ५८२ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यात एक लाख ९२ हजार ७१५ बिगर कर्जदार शेतकरी असून ११ हजार ८६७ कर्जदार शेतकरी आहेत. एकंदर जिल्ह्यात एक लाख ६९ हजार ९२१ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढण्यात आला असून त्यात १३ कोटी ९८ लाख ८० हजार ७७७ रुपयांचा वाटा हा शेतकऱ्यांचा आहे, तर राज्य व केंद्र शासनाचा प्रत्येकी ४७ कोटी तीन लाख १७ हजार ५१३ रुपयांचा वाटा आहे.

कोरोनाचा मुकाबला करताना जिल्ह्यात दाखल झालेल्या रुग्णाला उत्तम उपचारासोबत उच्च पोषणमूल्य असलेला आहार देण्यावरही भर देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना सुका मेवा, अंडी, तसेच चौरस आहार देऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याच सोबत रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे अलगीकरण, त्यांना निरीक्षणात ठेवणे, त्यांचेवर वेळीच प्रतिबंधात्मक उपचार करणे, आवश्यकता भासल्यास चाचणी करुन उपचार करणे. सध्या तर आपल्या जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजेन टेस्टचा वापर केला जात आहे. त्यामुळे संक्रमणाच्या सुरुवातीच्या अवस्थेतच आणि अगदी कमी कालावधीत रुग्ण ओळखता येतो व उपचार करता येतात. त्यामुळे नजिकच्या काळात कोरोना फैलावाला आपण आळा घालू शकू, असा ठाम विश्वास मला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *