Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रुग्णांना सर्वोत्तम सेवा द्या – पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

रुग्णांना सर्वोत्तम सेवा द्या – पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

अकोला : कोविडबाधीत  रुग्ण हा मनाने खचलेला असतो.  त्या रुग्णाला  उत्तम उपचार देतानाच जेवण, औषधे, सेवा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक बळ देऊन  सर्वोत्तम सेवा द्या, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी काल झालेल्या आढावा बैठकीत दिले.

अकोला जिल्ह्यातील कोरोना फैलावाबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांनी काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी  रुग्णालयाची  पाहणी केली. तसेच  उपचार सुविधांबाबत तसेच कोविड चाचणी केंद्राबाबत माहिती घेतली. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच आयोजित बैठकीत त्यांनी आढावा घेतला. यावेळी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसुले तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने उपचार सुविधा व रुग्णांच्या संसर्ग पातळीनुसार करण्यात येणारे वर्गीकरण सांगितले. यावेळी कडू यांनी निर्देश दिले की, रुग्णांना वा संदिग्ध रुग्णांना नेमके कोठे जावयाचे आहे याबाबत उत्तम दिशानिर्देश असलेले फलक दर्शनी भागात लावावे. ‘सर्व उपचार व औषधी हे मोफत आहेत, विकत आणण्याची गरज नाही’ असेही फलक दर्शनी भागात लावावे. उपचार करणारे आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांचा ड्युटी चार्ट वेळेआधीच तयार असावा व तो ही दर्शनी भागात लावण्यात यावा. जेणे करुन येणाऱ्या रुग्णाला कोणत्या डॉक्टरांची ड्युटी आहे हे कळायला हवे.  वार्डनिहाय दाखल रुग्णांच्या स्वतंत्र नोंदी ठेवाव्या.  रुग्णसेवेसाठी आवश्यक मनुष्यबळ व अन्य आवश्यकतांची माहिती यावेळी देण्यात आली. पुढ़ील काळात आवश्यकता भासल्यास आणखी  १२० खाटांची व्यवस्था असलेला वार्ड सज्ज आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

पालकमंत्री म्हणाले की, रुग्णांना सेवा देण्यासाठी  वार्डातील वातावरण स्वच्छ व चांगले ठेवून त्याची मनोवस्था सकारात्मक राहिल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे,असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

पालकमंत्र्यांचा नगरसेवकांशी संवाद

अकोला महानगरपालिका क्षेत्रात  कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांसंदर्भात काल पालकमंत्री बच्चू कडू यांनी  अकोला शहरातील नगरसेवकांशी संवाद साधला. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित  होते.

यावेळी उपस्थित नगरसेवकांनी आपापल्या भागातील नागरिकांना व विशेषतः प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना येत असलेल्या समस्यांबाबत आपले विचार मांडले. यात दाट लोक वस्ती व श्रमिक, रोजंदारी मजूर यांच्या वसाहतीतील प्रश्न मांडण्यात आले. प्रतिबंधात्मक क्षेत्रात द्यावयाच्या आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता या सुविधांसोबतच  नागरिकांना लागणाऱ्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी वस्तूंचा पुरवठा याबाबत चर्चा करण्यात आली.

याबाबत मार्गदर्शन करतांना पालकमंत्री कडू म्हणाले की, या आपत्तीचा सामना करण्यासाठी ही बंधनं लावण्यात आली आहेत. त्यामुळे ही पाळण्यात आपलं हित आहे. हे नागरिकांना समजावून सांगणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची सर्व व्यवस्था प्रशासन करीत आहे. या रोगाचा फैलाव त्याचा प्रसार होण्याची पद्धती व शक्यता या सर्व गोष्टींचा विचार करता केवळ परस्परांमध्ये अंतर राखणे, बंधने पाळून किमान संपर्क राखणे याबाबत सवयी अंगिकाराव्या लागतील, असे आवाहन त्यांनी केले.

तेलंगाणाला जाणाऱ्या ३३ मजुरांची दोन एस.टी. बसने रवानगी

लॉकडाऊन कालावधीत अकोला जिल्ह्यात अडकलेले व मूळचे वारंगल तेलंगाणा येथील रहिवासी असलेल्या ३३ मजुरांना आज धर्माबाद या तेलंगाणा सीमेवरील गावापर्यंत सोडण्यासाठी  अकोला येथून विशेष एसटी बस रवाना झाली. या बसला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी  पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे उपस्थित होते.

या ३३ मजुरांना वारंगल येथे जायचे आहे. काल दुपारी १२ वाजता ही बस रवाना झाली. त्यांच्यासोबत  पिण्याचे पाणी , जेवणाचे पॅकेट देण्यात आले. या सर्व प्रवाशांना मोफत पाठवण्यात आले असून कोणतेही भाडे आकारण्यात आले नाही.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *