अमित शहा आणि कंपनीने आमच्यावर कितीही खोटेपणाचा आरोप केला तरी जनता पुरेपूर ओळखून आहे की खोटे कोण : उद्धव ठाकरे
मुंबई: आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रीपद आणि ५०-५० फॉर्म्युलाबाबत खोटे बोलत असल्याचा आरोप केला. या आरोपामुळे संतापलेल्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शाह या साऱ्यांवर सडकून टीका केली व पुनः एकदा लोकसभेपूर्वी झालेल्या फडणवीस-शाह जोडीबरोबरच्या चर्चेच्या सत्यतेबाबत स्पष्ट भाष्य केले.
पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर संतापलेले उद्धव ठाकरे म्हणाले की, “”मला शिवसेनाप्रमुखांनी जे शिकवलं आहे की शब्द देण्यापूर्वी एकदा नाही, १० वेळा नाही, लाख वेळा विचार कर, त्याहीपेक्षा जास्त वेळा करायचा असेल तर जरूर कर. पण एकदा शब्द दिला म्हणजे दिला, परत मागे घ्यायचा नाही.”
पुढे फडणवीसांच्या आरोपांमुळे व्यथित झालेले उद्धव ठाकरे म्हणाले की, “मला एका गोष्टीचं दुःख झालं की शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय, शिवसेनाप्रमुखांचा परिवार, या परिवारावर म्हणजे माझ्यावर पहिल्याप्रथम कोणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला आहे.”
पुढे त्यांनी अमित शहांवर थेट खोटेपणाचा आरोप करत भाष्य केले की, “दुर्दैवाने मला हा शब्द वापरावा लागतोय की देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांचा संदर्भ घेऊन माझ्यावर खोटेपणाचा आरोप केलाय. मी देवेंद्रजींना सांगू इच्छितो, अमित शहा आणि कंपनीने कितीही आमच्यावर खोटेपणाचा आरोप केला तरी जनता पुरेपूर ओळखून आहे की खोटे कोण बोलतो आणि सत्य कोण बोलतो. मी भाजपला शत्रुपक्ष मानत नाही फक्त त्यांनी खोटं बोलू नये कारण खोटं बोलण्याची परंपरा ही शिवसेनेची असू शकत नाही.”
यावेळी विशेषतः फडणवीसांना उद्देशून ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस हे माझे अतिशय चांगले मित्र आहे, हे मी उपहासाने बोलत नाही आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते म्हणूनच मी त्यांना पाठिंबा दिला अन्यथा दुसरं कोणी असतं तर मला माहिती नाही काय झालं असतं. पण त्यांच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. आम्ही मोदीजींवर टीका केलेली नाही कारण मोदी जी मला दोन वेळा लहान भाऊ म्हणालेले आहेत, हे भावा-भावाच नातं जर का कोणाच्या पोटात दुखल असेल तर तो शोध मोदीजींनी घ्यायला पाहिजे.”
एकूणच आज शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद तुफानी ठरली.
