२०२३ मधील जुन्या विधानाची करून दिली आठवण; राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमागील राजकीय गणितावर मनसे अध्यक्षांचा सवाल
मुंबई, दि. २८ : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या समर्थनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून व्यक्त होत असलेल्या भूमिकेने महाविकास आघाडीतील राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजकारणावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटांच्या फाटाफुटीपासून सुरू झालेल्या घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी या राजकीय हालचालींना ‘पवारांचं जंतरमंतर’ असे संबोधले. तसेच २०२३ मध्ये केलेल्या आपल्या एका पोस्टचीही त्यांनी पुन्हा आठवण करून दिली.
संसदेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार असून ते २ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकारकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घेण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. या विधेयकाला शरद पवारांच्या पक्षातील आठ खासदारांचा पाठिंबा मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून राष्ट्रवादीच्या भूमिकेवर टीका होत आहे.
याच घडामोडींवर राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरून प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाने २०२३ मध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुढील काळात दोन्ही गटांमध्ये सुरू राहिलेला संघर्ष हा राजकीय नाट्याचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले. आता दुसऱ्या गटाकडूनही भाजपसोबत जाण्याच्या दिशेने हालचाली होत असल्याचा दावा त्यांनी केला.
https://x.com/RajThackeray/status/2126609000058040756
२०२३ मधील पोस्टचा संदर्भ देत राज ठाकरेंची टीका
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “२ जुलै २०२३ ला जेव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती त्यावेळेस मी हे बोललो होतो. अर्थात पुढे ३ वर्ष दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केलं आणि मी म्हटलं तसं सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकारे देत निघाली आहे. मी मध्ये एकदा म्हटलं होतं की हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं. असो.”
या विधानातून राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या राजकीय वाटचालीकडे लक्ष वेधले आहे. सत्तेच्या समीकरणांसाठी दोन्ही गटांमध्ये संघर्षाचे चित्र उभे करण्यात आले, असा त्यांचा आरोप आहे.
अजित पवारांच्या बंडावेळी केलेल्या विधानाचीही चर्चा
२ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांसह भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या पोस्टचाही सध्याच्या प्रतिक्रियेत संदर्भ आला आहे.
त्या वेळी राज ठाकरे यांनी म्हटले होते, “उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक पार पडला. राष्ट्रवादीची पहिली टीम सत्तेच्या दिशेन रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच. महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं अवास्तव महत्व रुचत नसल्याने त्यावर उतारा शोधला.”
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींचा दाखला देत राज ठाकरे यांनी आता पुन्हा शरद पवारांच्या पक्षाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून महाविकास आघाडीतील मतभेद अधिक स्पष्ट होत असताना राज ठाकरेंच्या टीकेमुळे या विषयाला आणखी राजकीय धार आली आहे.

