मुद्रांक खरे आहेत कि बनावट याची तपासणी होणार का? महसूल विभाग व नोंदणी महानिरक्षकांच्या कारवाईकडे लक्ष
पनवेल, दि. २७ : ‘अब्दुल करीम तेलगी’ हे नाव येताच डोळ्यांसमोर येतो तो स्टॅम्प पेपर ..नव्हे बनावट स्टॅम्प पेपर. याच अब्दुल करीम तेलगीच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याने नव्वदीच्या दशकात कल्लोळ माजवला होता. जवळपास ३२ हजार कोटींच्या या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा २००३ साली जेव्हा भांडाफोड झाला तेव्हा महाराष्ट्रासह देशभर खळबळ उडाली होती. तेलगीचे हे बनावट स्टॅम्प पेपर अस्सल होते कारण त्यांची छपाई हि नाशिकच्या इंडियन सिक्युरिटी प्रेस ने भंगारात काढलेल्या खऱ्या छपाई मशिनच्या सुट्ट्या भागांपासून बनवलेल्या डुप्लिकेट छपाई यंत्रावर करण्यात यायची. हे स्टॅम्प पेपर तेलगी आणि टीम ने स्वतःच्या नावे असलेल्या मुद्रांक विक्री लायसन्सच्या अखत्यारीत विकले. सोबतच ते विकण्यासाठी मोठं विपणन जाळं हि उभारलं. हा सर्व व्यवहार रोखीत चालायचा. म्हणजेच काळं धन तयार व्हायचं. आज अब्दुल करीम तेलगीची आठवण अचानक काढण्यामागे कारणही तसंच आहे.
रोखीने व्यवहार करण्याची सक्ती करण्यामागचे कारण काय?
पनवेल येथील परदेशी नामक मुद्रांक विक्रेत्याकडे सर्व प्रकारच्या मुद्रांक विक्रीचे व्यवहार १०० टक्के रोखीत केले जात असल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या. सध्या बाजारात प्रचलित व सोयीस्कर असलेले फोन पे, जी पे Gpay सारखे डिजिटल व्यवहारांचे पर्याय या मुद्रांक विक्रेत्याकडून सरसकट नाकारले जात असल्याचे सगळ्यांचे म्हणणे होते. हा सर्व प्रकार काहीसा संशयास्पद वाटत असल्यामुळे याबाबत खातरजमा करण्याचे महाराष्ट्र वार्ता च्या शोधपत्रकारिता विभागाने ठरवले. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाजवळ असलेल्या या मुद्रांक विक्रेत्याच्या दुकानाला भेट देत सदरच्या तक्रारींची शहानिशा केली असता त्यात तथ्य आढळले. या ठिकाणी कोर्ट फी स्टॅम्प व स्टॅम्प पेपर खरेदी करताना जी पे(Gpay) ने पेमेंट करू का असा सवाल करताच समोरची व्यक्ती कुत्र्याला झिडकारतात तसं आम्ही कॅशच घेतो असे कारण देते. मुळात जर स्टॅम्प पेपर खरे असतील तर ते सरकारकडून विकत घेतेवेळी रीतसर चलान बनवले जात असावे. सर्व व्यवहार बँक खात्यांमार्फत होत असावा. जर स्टॅम्प पेपर कायदेशीररित्या खरेदी केला असेल तर अशावेळी त्याची विक्री करताना खरेदीदाराला रोखीने व्यवहार करण्याची सक्ती करण्यामागचे कारण काय? आणि मग इथेच संशयाला जागा उरते. रोखीने व्यवहार तीच व्यक्ती करते जिला आपले व्यवहार रेकॉर्डवर येऊ द्यायचे नसतात. जिला काहीतरी लपवायचे असते, जी कोणत्यातरी अवैध रॅकेटचा हिस्सा असते.
महसूल विभाग व नोंदणी महानिरक्षकांच्या कारवाईकडे लक्ष
मुद्रांक विक्रेते परदेशी विकत असलेले स्टॅम्प पेपर अथवा कोर्ट फी स्टॅम्प जर बनावट नसतील तर त्यांनी त्याची विक्री पारदर्शकपणे करणे अपेक्षित आहे. पण तसे होताना दिसत नाही. पनवेल व लगतच्या परिसरातील इतर विक्रेते जर मुद्रांक विक्री करताना फोन पे, जी पे सारख्या डिजिटल व्यवहार पर्यायांची अनुमती देत असतील तर मग परदेशी यांनी खरेदीदाराला रोखीच्या व्यवहाराची सक्ती करण्यामागे कारण काय असा प्रश्न उपस्थित होतो. प्रकरणाचे गांभीर्य पाहता, हे मुद्रांक खरे आहेत कि बनावट याची तपासणी सरकारी तपास यंत्रणेकडून होणे गरजेचे आहे. हा खरंच तेलगी ने केलेल्या घोटाळ्यासारखा महाघोटाळा असेल तर यात मोठी धेंडं गुंतलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अब्दुल करीम तेलगीच्या घोटाळ्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री छगन भुजबळ व अनेक दिग्गजांची नावं समोर आली होती. त्यावेळी मंत्री भुजबळ यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. कालांतराने सीबीआय चौकशीतून त्यांचे नाव वगळले गेले. स्टॅम्प पेपर घोटाळा उघड झाल्यानंतर तत्कालीन आघाडी सरकारने सावधगिरीचं पाऊल उचलत स्टॅम्प पेपर विक्रीवर बंदी आणत फ्रँकिंगची सुविधा आणली जी १०० टक्के पारदर्शक होती. कालांतराने मुद्रांक विक्री पुन्हा पारंपरिक प्रकारे सुरु झाली. आता, स्टॅम्प पेपर घोटाळा पुन्हा होऊ शकत नाही अशी जर सरकारची धारणा असेल तर हि हास्यास्पद बाब आहे. या प्रकरणी राज्याचा महसूल विभाग, नोंदणी महानिरीक्षक तसेच स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयाने प्राथमिक तपास करणे अपेक्षित आहे. याच सोबत राज्याच्या गृह विभागाने तसेच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कथित घोटाळ्याच्या व्याप्तीचा तपास करणे व यातील मास्टर माईंडना देशाबाहेर पळून जाण्याआधी अटक करणे गरजेचे आहे. या प्रकरणात तपास यंत्रणा काय कारवाई करतात हे पाहणे लक्षणीय ठरेल.

