हिवाळी अधिवेशनापूर्वी वितरणाचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश; १०२, १०८ आणि ११२ सेवांसाठी एकात्मिक कॉल सेंटर उभारण्याचीही तयारी
मुंबई, दि. २७ : राज्यातील आपत्कालीन आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाच्या ताफ्यात ३५० अद्ययावत रुग्णवाहिका लवकरच दाखल होणार आहेत. हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात या रुग्णवाहिकांचे वितरण करण्याचे नियोजन असून, त्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
मंत्रालयात २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीत रुग्णवाहिकांच्या वितरणाची तयारी, वाहन नोंदणी आणि लोकार्पणाबाबत चर्चा झाली. या बैठकीला आरोग्य आयुक्त डॉ. संजय काटकर आणि संबंधित यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नवीन रुग्णवाहिकांचे ब्रँडिंग पुढील आठ ते दहा दिवसांत पूर्ण करावे आणि वाहन नोंदणीची प्रक्रिया विलंब न करता मार्गी लावावी, अशा सूचना मंत्री आबिटकर यांनी दिल्या. लोकार्पणानंतर संबंधित मतदारसंघांमध्ये स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत वाहनांचे वितरण केले जाणार आहे.
या रुग्णवाहिकांसाठी १२०० प्रशिक्षित डॉक्टर, वाहनचालक आणि सहायकांची व्यवस्था करण्यात येणार असून, त्यांना आधुनिक जीवनरक्षक प्रणालीची सुविधा असेल, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.
जुन्या रुग्णवाहिकांच्या व्यवस्थापनाकडेही लक्ष
नवीन वाहने उपलब्ध करून देण्याबरोबरच सध्या सेवेत असलेल्या रुग्णवाहिकांचे कामकाज सुरळीत ठेवण्याची गरज मंत्री आबिटकर यांनी अधोरेखित केली. विशेषतः १०२ रुग्णवाहिकांसाठी पेट्रोल कार्ड वितरणाचा प्रश्न तसेच चालकांशी संबंधित अडचणी तातडीने सोडवण्याचे निर्देश देण्यात आले.
चालकांच्या उपलब्धतेचे आणि व्यवस्थापनाचे प्रश्न निकाली काढून रुग्णवाहिकांचा वापर प्रभावीपणे व्हावा, यासाठी संबंधित यंत्रणेने कार्यवाही करावी, असे सांगण्यात आले. कामकाजात त्रुटी किंवा निष्काळजीपणा आढळणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले.
१०२, १०८, ११२ सेवांसाठी एकच समन्वय व्यवस्था
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होण्यासाठी विविध सेवांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. यासाठी १०२, १०८ आणि ११२ या शासकीय आपत्कालीन सेवांसह खासगी रुग्णवाहिकांचाही समावेश असलेले एकात्मिक कॉल सेंटर उभारण्याचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे.
न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुषंगाने या प्रस्तावाची तयारी करून तो परिवहन आयुक्तांकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. एकाच केंद्रातून विविध प्रकारच्या रुग्णवाहिकांची उपलब्धता आणि समन्वय साधण्याची व्यवस्था निर्माण झाल्यास आपत्कालीन रुग्णसेवेचे नियोजन अधिक सुसूत्र करता येऊ शकते.
३५० नव्या रुग्णवाहिकांचे वितरण, सध्याच्या वाहनांचे व्यवस्थापन आणि एकात्मिक कॉल सेंटरची उभारणी या तीन स्तरांवर आरोग्य विभागाकडून काम सुरू आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील प्रक्रिया किती वेगाने पार पडते, याकडे लक्ष लागले आहे.

