नाथ, बेघर, एकल पालकांची तसेच प्रतिकूल परिस्थितीतील बालके योजनेसाठी पात्र; थेट बँक खात्यात जमा होते आर्थिक सहाय्य
मुंबई, दि. ३० : कुटुंबातील प्रतिकूल परिस्थितीमुळे बालकांच्या संगोपनाचा भार वाढलेल्या पालकांना आणि नातेवाईकांना राज्य सरकारच्या योजनेतून आर्थिक आधार दिला जात आहे. महिला व बालविकास विभागाच्या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने’अंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील पात्र बालकांसाठी दरमहा २,२५० रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून लाभार्थी किंवा बालकाच्या संगोपनकर्त्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.
बालकांना संस्थात्मक बालगृहात ठेवण्याऐवजी शक्य तिथे नातेवाईकांच्या देखरेखीखाली कौटुंबिक वातावरणात वाढण्याची संधी मिळावी, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे. त्यासोबतच शिक्षण, आरोग्य आणि बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आधार उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला आहे.
कोणत्या बालकांना मिळतो लाभ?
अनाथ आणि बेघर बालकांसह एकल पालक असलेल्या मुलांचा या योजनेत समावेश होतो. गंभीर आजार किंवा दिव्यांगत्वामुळे पालक संगोपन करू शकत नसतील, तरी संबंधित बालक पात्र ठरू शकते.
तसेच तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या पालकांची मुले, कौटुंबिक हिंसाचाराचा परिणाम झालेली बालके, गंभीर आजाराने ग्रस्त पालकांची मुले, बालकामगार आणि रस्त्यावर राहणारी बालके यांनाही योजनेचा लाभ मिळू शकतो. बाल कल्याण समितीने काळजी व संरक्षणाची गरज असल्याचे घोषित केलेल्या बालकांचाही यामध्ये समावेश आहे.
उत्पन्नाची अट काय?
योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित बालक महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असावे. यामध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्राधान्य दिले जाते.
अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?
योजनेचा अर्ज करताना बालकाचा जन्मदाखला किंवा शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र आणि आधार कार्ड आवश्यक आहे. याशिवाय बालक आणि पालक किंवा संगोपनकर्त्याच्या संलग्न बँक खात्याचे पासबुक सादर करावे लागते.
बालकाचा पालकांसोबत घरासमोरील छायाचित्रही अर्जासोबत द्यावे लागते. पालकांचे निधन झाले असल्यास, लागू परिस्थितीनुसार आई-वडिलांचा मृत्यू दाखला जोडणे आवश्यक आहे. शाळेत शिक्षण घेणाऱ्या बालकासाठी बोनाफाईड प्रमाणपत्रही सादर करावे लागते.
मुंबई शहरात दोन संस्थांमार्फत अंमलबजावणी
मुंबई शहर जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी शासनमान्य प्रवास फाउंडेशन आणि मानव विकास फाउंडेशन या संस्थांच्या माध्यमातून केली जात आहे. पात्र बालकांचे पालक किंवा नातेवाईक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, स्थानिक बाल कल्याण समिती अथवा मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थेकडे अर्ज करू शकतात.
गरजू बालकांपर्यंत योजना पोहोचविण्याचे आवाहन
योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असूनही माहितीअभावी कोणतेही बालक वंचित राहू नये, यासाठी नागरिक, शाळा, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने केले आहे.
योजनेबाबत अधिक माहिती किंवा अर्ज प्रक्रियेसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मुंबई शहर, पहिला मजला, ११७ बीडीडी चाळ, वरळी, मुंबई–४०००१८ येथे संपर्क साधता येईल. तसेच बालकांच्या मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर संपर्क करता येतो.
कौटुंबिक आधाराची गरज असलेल्या बालकांना शक्य तितक्या सुरक्षित आणि घरगुती वातावरणात वाढण्याची संधी देतानाच त्यांच्या शिक्षण व आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही आर्थिक मदत महत्त्वाची ठरते. त्यामुळे पात्र बालकांच्या कुटुंबीयांनी योजनेच्या निकषांची पूर्तता होत असल्यास संबंधित यंत्रणेशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

