एक लाख कोटींच्या गुंतवणुकीची शक्यता; सुमारे ५० हजार रोजगार निर्माण होण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा
मुंबई, दि. १४ : प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांच्या वाढत्या जागतिक बाजारपेठेचा फायदा भारताने मोठ्या प्रमाणावर घ्यावा, यासाठी उत्पादनापासून विक्रीपर्यंतची संपूर्ण साखळी देशातच विकसित करण्याची गरज केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली. नवी मुंबईत रत्न व आभूषण उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर जागा आणि आवश्यक एफएसआय उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली. या प्रस्तावित जेम्स अँड ज्वेलरी पार्कमुळे मोठी गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईत झालेल्या ५२ व्या ‘इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स’ सोहळ्यात अमित शाह बोलत होते. रत्न व आभूषण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि उल्लेखनीय योगदानाचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पणन मंत्री जयकुमार रावल, खासदार गोविंद ढोलकिया, आमदार अमित साटम आणि कौन्सिलचे अध्यक्ष किरीट भन्साळी यांच्यासह उद्योग क्षेत्रातील उद्योजक, निर्यातदार, उत्पादक, बँकिंग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि महिला उद्योजक उपस्थित होते.
नवी मुंबईत उद्योगाला विस्ताराची संधी
लॅबग्रोन डायमंड क्षेत्रात भारताने केवळ उत्पादन किंवा प्रक्रिया केंद्र म्हणून न राहता जागतिक स्तरावरील संपूर्ण व्यवसायसाखळी उभारावी, अशी अपेक्षा शाह यांनी व्यक्त केली. यंत्रसामग्री निर्मिती, हिऱ्यांचे उत्पादन, दागिन्यांची निर्मिती, ब्रँड उभारणी, विक्री केंद्रे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोच या सर्व टप्प्यांमध्ये भारतीय उद्योगाने आपली क्षमता वाढवावी, असे त्यांनी सांगितले.
भारतीय कंपन्यांनी जागतिक स्तरावर स्वतःचे ब्रँड विकसित करून प्रमुख आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये विक्री केंद्रे निर्माण करावीत. या विस्तारासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे शाह यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबईत रत्न व आभूषण उद्योगासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच आवश्यक एफएसआय देण्याची भूमिका त्यांनी मांडली. हा उद्योग महाराष्ट्राबाहेर जाऊ नये आणि राज्यातच त्याचा विस्तार व्हावा, यासाठी राज्य सरकार सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पातून एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० हजार रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
भारताच्या हिरे उद्योगाची मोठी ताकद
रत्न आणि आभूषण क्षेत्राशी भारताचे नाते हजारो वर्षांपासूनचे असल्याचा उल्लेख शाह यांनी केला. प्राचीन काळापासून भारतातून रत्ने व आभूषणांचा व्यापार होत आला असून, राजाश्रयामुळे जडजवाहीर आणि आभूषणनिर्मितीच्या विविध कलांना मोठी चालना मिळाली. कुंदन आणि मीनाकारीसारख्या कलाप्रकारांनी या परंपरेला स्वतंत्र ओळख दिली आहे.
जागतिक हिरे उद्योगात सुरतचे स्थानही त्यांनी अधोरेखित केले. जगभरात पैलू पाडल्या जाणाऱ्या प्रत्येक दहा हिऱ्यांपैकी नऊ हिऱ्यांवर सुरतमध्ये प्रक्रिया होते. या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली असून, भारताच्या निर्यातीतही त्याचा महत्त्वाचा वाटा आहे.
मुंबईने रत्न व आभूषण व्यापार आणि निर्यातीसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. भारत डायमंड बोर्स हे या क्षेत्रातील भारताच्या जागतिक क्षमतेचे महत्त्वाचे उदाहरण असल्याचे शाह यांनी नमूद केले.
रत्न-आभूषण निर्यात २ लाख ४४ हजार कोटींवर
२०२५ मध्ये भारताची रत्न व आभूषण निर्यात २ लाख ४४ हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याचे शाह यांनी सांगितले. देशाच्या एकूण व्यापारी माल निर्यातीत या क्षेत्राचा ६.३ टक्के वाटा आहे. या उद्योगाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सुमारे ७५ लाख नागरिकांचा रोजगार जोडला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अमेरिका, मध्यपूर्व, हाँगकाँग आणि युरोप या बाजारपेठांमध्ये भारतीय आभूषणांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. भारतात जगातील ९० टक्क्यांहून अधिक कटिंग आणि पॉलिशिंग केलेल्या हिऱ्यांवर प्रक्रिया केली जाते. भारतीय उद्योजकांचे कौशल्य आणि या उद्योगाची क्षमता यातून स्पष्ट होत असल्याचे शाह यांनी सांगितले.
युरोपियन युनियन, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, ओमान आणि युनायटेड किंगडमसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारांचा लाभ घेत उद्योगाने नव्या बाजारपेठांमध्ये विस्तार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

विशेष अधिसूचित क्षेत्रात रफ डायमंडचा व्यापार करणाऱ्या कंपन्यांसाठी प्राप्तिकरातील दीर्घकालीन सवलतीचा निर्णय भारताला जागतिक रफ डायमंड व्यापाराचे प्रमुख केंद्र बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा असल्याचेही त्यांनी सांगितले.
पायाभूत सुविधा, उत्पादनवाढीसाठीच्या योजना आणि निर्यातीला मिळणाऱ्या सुविधांच्या माध्यमातून रत्न व आभूषण उद्योगाला आणखी बळ देण्याची गरज आहे. २०४७ पर्यंत भारताला विविध क्षेत्रांत अग्रस्थानी नेण्याच्या उद्दिष्टात रत्न व आभूषण उद्योगाची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.
