मयुरेश्वर मंदिराच्या पुरातन स्वरूपाला धक्का न लावता विकासकामे करा; सुनेत्रा पवारांच्या सूचना
बारामती, दि. ८ : धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती मंदिराच्या विकासकामांमध्ये आधुनिक सुविधांचा समावेश करताना मंदिराच्या मूळ वास्तुरचनेचे जतन करण्यावर भर द्यावा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मांडली. विकासकामांचा दर्जा, परिसरातील स्वच्छता आणि पावसाच्या पाण्याचा निचरा याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील विविध विकासकामांची पाहणी केली. यामध्ये श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती मंदिर परिसर तसेच मेडद येथील स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाचा समावेश होता. पाहणीदरम्यान त्यांनी सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली तसेच प्रस्तावित कामांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
मयुरेश्वर मंदिर परिसरातील कामांचा आढावा घेताना मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निश्चित करण्यात आलेल्या आराखड्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मंदिर परिसरासह गाभाऱ्यात स्वच्छता राखण्याला प्राधान्य देण्याची सूचना करण्यात आली. पावसाळ्यात परिसरात पाणी साचणार नाही, यासाठी प्रभावी निचरा व्यवस्था करण्याबाबतही त्यांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या.
मंदिर परिसरातील विकासकामांमध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग आणि समन्वय कायम ठेवण्यावरही सुनेत्रा पवार यांनी भर दिला. प्राचीन वास्तूचे वैशिष्ट्य कायम राहील, याची दक्षता घेऊनच आधुनिक सुविधांची उभारणी करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
कामांच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट भूमिका घेत त्यांनी निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. निकृष्ट दर्जाचे किंवा मंजूर पद्धतीपासून वेगळ्या प्रकारे काम करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात कठोर पावले उचलली जातील, तसेच अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सुविधांचाही आढावा
मेडद येथील स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयालाही उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिली. महाविद्यालय परिसरातील रस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेला हद्दवाढीचा प्रस्ताव प्रलंबित न ठेवता तातडीने पुढे नेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच निवासाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाविद्यालय आणि वसतिगृह पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले. यावेळी महाविद्यालय, वसतिगृह आणि परिसरातील विविध सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची माहिती घेण्यात आली.
पाहणीपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले.
या पाहणीदरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पंचायत समिती सभापती किरण तावरे, जिल्हा परिषद सदस्या रोहणी कदम (ढोले), नगराध्यक्ष सचिन सातव, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी किरण माने, मुख्याधिकारी पंकज भुसे, स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल काळे आणि मोरगाव देवस्थानचे विश्वस्त देवराज डहाळे आदी उपस्थित होते.
