रस्त्यांची दुरवस्था, वृक्षतोड आणि कथित कमिशनखोरीवर सडकून टीका; भाजपला मतदान करणाऱ्यांनाही सुनावले
नाशिक, दि. ७ : आगामी कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. नाशिकमधील रस्त्यांची अवस्था, विकासकामांची गुणवत्ता, वृक्षतोड आणि बाहेरील कंत्राटदारांना दिलेली कामे या मुद्द्यांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासन केवळ कमिशनच्या राजकारणात गुंतल्याचा आरोप केला.
नाशिक दौऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी सध्या शहरात सुरू असलेल्या कामकाजाची तुलना यापूर्वी झालेल्या कुंभमेळ्यांशी केली. त्यांनी सांगितले की, “मी असताना आत्तापर्यंत दोन कुंभमेळे इथे झालेत. एक २००३ साली आणि एक २०१५ साली झाला. २०१५ च्या कुंभमेळ्यात नाशिकमध्ये जी काही कामं झाली आणि ज्या प्रकारे कुंभमेळा झाला, नाशिक शहरालादेखील कळलं नव्हतं की, कुठे काय कामं सुरू आहेत आणि कशा प्रकारची कामं सुरू आहेत. ती कामं झाल्यानंतर सर्वांना दिसलं की कसे रस्ते झाले, कामं झाली. त्या कुंभमेळ्यातून पैसे काढणे, अर्थकारण हा उद्देश नसल्यामुळे तो खूप सोप्या आणि चांगल्या पद्धतीने झाला. पण, आता मला दिसत आहे की, संपूर्ण शहरात खड्डे पडले आहेत. लोकांचे बळी गेले आहेत, पण या प्रशासनाला त्याचं काही नाही. प्रशासन ढिम्म आहे. प्रशासनाला माणसं गेल्याचं काहीच सोयरसुतक पडलेलं नाही. फक्त कामातून आपलं कमिशन कसं मिळेल, हे बघत आहेत.”
गुजरातच्या कंत्राटदारांवरून सरकारला सवाल
कुंभमेळ्याशी संबंधित कामांसाठी गुजरातमधील कंत्राटदारांना संधी दिल्याचा मुद्दाही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात सक्षम कंत्राटदारांची कमतरता नसताना बाहेरील कंपन्यांना कामे देण्यामागील कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी म्हटले, “या कुंभमेळ्यासाठी अनेक कॉन्ट्रॅक्टर गुजरातमधून आणले, असं समजलं आहे. महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टर जन्मलेच नाहीत का? वरून जे आदेश येतील तसे कुंभमेळे करायचे. महाराष्ट्रातील सगळ्या गोष्टी अशाच हाताळल्या जात असतील तर यांना लखलाभ असो. त्या वेळेला आम्ही इतकं सुंदर नाशिक केलं. त्याची दुर्दशा बघून वाईट वाटतं. बोटॅनिकल गार्डन असेल किंवा बाळासाहेबांच्या नावाने केलेलं म्युझियम असेल… दुसऱ्याने केलं आहे म्हणून त्याची वाट लावायची. स्मार्ट सिटीची घोषणा केली होती. त्याचं काय झालं? कुठे गेली ती स्मार्ट सिटी?”
वृक्षतोड आणि निवडणुकांवरही भाष्य
नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीबाबतही राज ठाकरे यांनी प्रशासनावर टीका केली. आंदोलने होऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी मतदारांनाही आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी म्हटले, “देशाच्या कुठल्याही शहरात तुम्हाला काही दिसत नाही. सगळं शहर बरबाद होत आहे. ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जात आहेत. त्या फ्रॉड पद्धतीने हाताळल्या जात आहेत, हे लोकांना देखील माहिती आहे. परंतु जे मतदान करत आहेत, त्यांनीदेखील या गोष्टीचा विचार केला पाहिजे. नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झाडं तोडली जात आहेत. त्यावर इतकी आंदोलनं झाली, पण काही नाही. प्रशासन ढिम्म आहे. हे सगळं चालू असताना ज्यावेळी निवडणुका झाल्या, तेव्हा लोक भाजपला निवडून देत असतील तर भोगा, अजून काय बोलू शकतो मी.”
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यांमुळे आगामी कुंभमेळ्याच्या तयारीवरून राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, नाशिकमधील विकासकामे, कंत्राटांची प्रक्रिया आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
