उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले महत्त्वाचे प्रश्न
मुंबई, दि. २५ : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविल्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. नीट-यूजी परीक्षेतील कथित गैरव्यवहार, त्यानंतर देशभरात निर्माण झालेला वाद आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. राजीनाम्याची माहिती जाहीर झाल्यानंतर मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत या घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडण्यात आली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे कौतुक करत या लढ्यामुळे देशातील युवाशक्तीचे सामर्थ्य पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, आंदोलनाचा उद्देश केवळ राजीनामा मिळविणे नव्हता, तर संपूर्ण व्यवस्थेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांनाही उत्तर मिळणे आवश्यक आहे.
“अभिजीत दिपके आणि सगळ्या तरुणांचे आणि पालकांचे अभिनंदन”
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “गेले काही दिवस आपला देश अस्वस्थ आहे, याचे कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. अभिजीत दिपके आणि सगळ्या तरुणांचे आणि पालकांचे अभिनंदन. हा विषय फक्त राजीनाम पर्यंत नव्हता. गेले १२ वर्ष रोज काही तरी सुरू होते. नोटबंदी असेल किंवा काही. देशात जनता राहिली नाही असे हे लोक वागत आहे. हे सगळे झुरळ आहे असे सरकार बघत होते. मला डायलॉग आठवला एक मच्छर आदमी को.. तसे एक झुरळाने देश झुकविला. मी दिपकेचं ट्वीट पाहिले की, हे आंदोलन मागे घेतले नाही. महत्त्वाची मागणी होती ती राजीनाम्याची…आता राजीनामा दिला आहे की, खाते बदल झाला आहे हे स्पष्ट नाही. आता हे झाले त्याच्या पुढे काय?”
“राजीनामा दिलाय का खातेबदल?”
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. ते म्हणाले, “तर ज्या तरुणाला झुरळ म्हटलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की, आपण केवळ खुर्चीत बसलोय म्हणून डोक्यात माज आलाय असं वागू नका. देशातली युवाशक्ती ही जर का एकत्र आली तर काय करू शकते, त्याची ही झलक आहे. मी आपल्यासमोर किंवा आम्ही सगळे आपल्यासमोर येण्यापूर्वी अभिजीत दीपकेचं एक ट्वीट पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की आंदोलन अजूनही आम्ही मागे घेतलेलं नाही, कारण अजून दोन मागण्या त्यांच्या बाकी आहेत. महत्त्वाची मागणी होती ती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. आता त्यांनी राजीनामा दिलाय का त्यांचा खातेबदल केलाय याच्यावरती अजून काही स्पष्टता नाही, पण त्यांनी राजीनाम्याचं पत्र हे सर्व माध्यमांसमोर दिलेलं आहे. आता हे झाल्यानंतर याविषयी जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं पुढे काय होणार?”
दिल्लीतील कारवाईवरही उपस्थित केले प्रश्न
विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, “कारण या आंदोलनाच्या दरम्यान भाजप सरकारचा एक बीभत्स, भीषण, गुन्हेगारी प्रवृत्तीचा चेहरा हा संपूर्ण जगासमोर आलेला आहे. ज्या पद्धतीने तरुणांवरती लाठ्या चालवल्या गेल्या, ज्या पद्धतीने तिथे आलेल्या युवतींवरती हात उचलला गेला… आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा एक ती युवती अत्यंत व्यथित होऊन, व्याकुळ होऊन सांगत होती की तिच्या कपड्याला सुद्धा हात घातला गेला.”
“हे अमित शहांनी सांगितलं पाहिजे”
पुढे बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे काही प्रश्न उपस्थित केले. उद्धव ठाकरे म्हणाले, “आता या पोलिसांवरती कोण गुन्हे दाखल करणार? आणि साध्या वेषातले जे गुंड तिकडे घुसवले गेले होते, त्यांना शोधून त्यांच्यावरती कारवाई करणार की नाही? आणि एकूणच या विद्यार्थ्यांवरती जर कुठे गुन्हे दाखल केले गेले असतील, तर हे मागे घेणार आहेत की नाही, हे आता अमित शहांनी सांगितलं पाहिजे. कारण या पोलिसांवरती ज्यांनी दंडुकेशाही केली, या तरुणांवरती लाठ्या-काठ्या चालवल्या, त्यांच्यावरती जर का कारवाई होणार नसेल, तर मग कदाचित ही तरुणाई आता धर्मेंद्र प्रधानांकडून अमित शनांकडे त्यांचा मोर्चा वळवल्याशिवाय राहणार नाही.”
“देशामध्ये अजून क्रांतीची ठिणगी विझलेली नाही”
युवकांच्या आंदोलनाचे कौतुक करत उद्धव ठाकरे म्हणाले, “असो, मला असं वाटतं की या तरुणांना खास धन्यवाद दिले पाहिजेत. याचं कारण असं परत एकदा सांगतो की, या देशामध्ये जणू काही आता लोक राहतच नाहीत, ही सगळी झुरळं आहेत आणि आपण काही केलं, कशीही मस्ती दाखवली तरी हे चालवून घेतलं जातं, हा जो काही एक समज किंवा हा जो एक भ्रम भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मस्तवाल सत्ताधाऱ्यांनी निर्माण केला होता, ते चित्र यांनी भुईसपाट करून टाकलेलं आहे. म्हणून यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की या देशामध्ये अजूनही क्रांतीची ठिणगी विझलेली नाही. अजूनही क्रांतिकारक जन्माला येऊ शकतात, त्याची एक चुणूक या निमित्ताने संपूर्ण जगाला आपल्या देशातल्या तरुणांनी दाखवून दिलेली आहे.”
उद्याचा कार्यक्रम नियोजनानुसारच होणार
आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करत उद्धव ठाकरे म्हणाले, “उद्याचा मार्च नक्की होणार आहे, कारण हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. अनेक वर्षांनंतर लोक आपल्या भावना व्यक्त करायला लागलेले आहेत आणि मी तमाम जनतेला आवाहन करतो. जसं काल सुद्धा आपण पाहिलं असाल की आम्ही असा विचार केला होता की उद्या जर का आम्ही मोर्चा काढतोय, तर कालचा कार्यक्रम कशाला करायचा? पण हे जाहीर झाल्याबरोबर आदित्यला काय, अमितला काय, असंख्य लोकांनी संदेश पाठवले आणि सांगितलं की नाही, आम्ही उद्या पण येणार आणि रविवारी पण येणार! आता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवाशक्तीची ताकद मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे.”
पुढे ते म्हणाले, “म्हणून उद्याचा जो काही मोर्चा आहे, त्या मोर्चाच्या ऐवजी आपण काय नेमकं करतो ते राज सांगेल. पण उद्याचा कार्यक्रम हा असाच राहील जसा पहिला ठरवला होता, तसाच तिकडेच जमू. पुढचं राज सांगेलच, पण या पुढच्या आंदोलनाची दिशा मी अभिजीतला सांगणार आहे. कारण मी फोन करण्याचा प्रयत्न करतोय, कदाचित तिथलं नेटवर्क जाम झालं असू शकेल किंवा तिथे जॅमर लावले असतील. त्यांच्याशी बोलून अभिजीत आणि त्याचे सहकारी काय ठरवतील, त्याच्याप्रमाणे सगळेजण पुढे जातील. उद्या शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल.”
विद्यार्थी आंदोलनाची पुढील दिशा महत्त्वाची
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी पूर्ण झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत असला, तरी उर्वरित मागण्यांबाबत भूमिका कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळात आंदोलनाची दिशा, केंद्र सरकारची भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांबाबत काय निर्णय होतो, याकडे देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
