केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तिरंगा हाती घेत राष्ट्रगीत गायन
मुंबई, दि. २४ : नीट पेपरफुटीच्या मुद्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात मोठ्या संख्येने तरुणाई एकवटली. आंदोलनकर्त्यांनी हातात तिरंगा घेत राष्ट्रगीत गायन करत शांततापूर्ण पद्धतीने निषेध नोंदविला. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, खासदार संजय राऊत, शर्मिला ठाकरे, तुषार गांधी, अभिनेते मकरंद देशपांडे, अतुल कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी असलेले अभिजित दिपके यांनी आदित्य ठाकरे यांच्या दूरध्वनीवरून शिवाजी पार्कवरील उपस्थित तरुणांशी संवाद साधला. या संवादाद्वारे आंदोलनाची सद्यस्थिती आणि पुढील भूमिका याबाबत माहिती देण्यात आली.
आदित्य ठाकरे यांच्या दूरध्वनीवरून अभिजित दिपके यांचा संवाद
आदित्य ठाकरे यांनी दूरध्वनीद्वारे अभिजित दिपके यांच्याशी संवाद साधत आंदोलनातील घडामोडी जाणून घेतल्या. यावेळी अभिजित दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टी, सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.
तसेच, “आज सीजेपीच्या प्रवक्त्यांनी जे. पी. नड्डा यांची भेट घेत तीन मागण्या केल्याचं” त्यांनी सांगितले. पुढे बोलताना अभिजित दिपके म्हणाले, “सीजेपी आणि विद्यार्थी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.” यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “राजीनामा घेऊनच व्यवस्था बदलायची आहे. हा नवा भारत आहे, झुकणार नाही.”
“आपण सर्व भारतीय आहोत, हीच ओळख आहे” – उद्धव ठाकरे
यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित तरुणांना संबोधित करत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “या चार दिवसात आपण याच जागेवर दुसऱ्यांदा भेटलो आहोत. परवा दिल्लीला जाऊन आलो, आता रविवारी आपण भेटणार आहोत. आपण सर्व भारतीय आहोत, हीच ओळख आहे.” पुढे ते म्हणाले, “आपली ओळख विसरून आपल्याला भीती दाखवून राज्य करत होते. आजपर्यंत त्यांनी हे दृश्य पाहणं गरजेचं आहे. ही जन की बात दिल्लीला ऐकावी लागेल.”
दिल्लीतील आंदोलनाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, “दिल्लीमध्ये बेछूटपणे विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला झाला. सरकारच्या हातात बंदुका, लाठी असेल पण आमच्या हातात तिरंगा आहे. आम्ही तिरंगा घेऊन तुमच्यासमोर आहोत, बघू तिरंगा जिंकतो की तुमची हुकूमशाही जिंकते.”
“आंदोलन संपलेलं नाही” – आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात आंदोलन पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “सोनम वांगचुक यांचं उपोषण संपलं आहे, आपण सर्वजण त्यांचे आभार मानूयात. उपोषण संपलं आहे मात्र आंदोलन संपलेलं नाही. अभिजित दिपके आणि इतर युवक दिल्लीत आंदोलन करत आहेत. आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे.”
पुढे त्यांनी आंदोलनकर्त्यांना आवाहन करत म्हटले, “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. तोपर्यंत शांत बसायचं नाही.” तसेच त्यांनी उपस्थित युवकांना प्रश्न विचारत म्हटले, “लाठीमार सहन केल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र होऊ शकता काय?”
आंदोलनाची प्रमुख मागणी
आंदोलनकर्त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागण्यांवर पुन्हा एकदा ठाम भूमिका मांडली.
शिवाजी पार्कवरील आंदोलनात मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन राष्ट्रगीत गायन, घोषणाबाजी आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला महाराष्ट्रातूनही वाढता पाठिंबा मिळत असल्याचे या आंदोलनातून दिसून आले.
