देवेंद्र फडणवीसांच्या टीकेलाही दिले प्रत्युत्तर
नागपूर, दि. १८ : अयोध्येतील राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि चोरीच्या आरोपांच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरातील प्रसिद्ध राम मंदिरात रामरक्षा पठण करून अनोखे आंदोलन केले. दादर आणि ठाणे येथील आंदोलनानंतर नागपुरात झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामरक्षा पठणानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना राम मंदिराशी संबंधित कथित गैरव्यवहार, हिंदुत्व, भाजपची भूमिका तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला सविस्तर उत्तर दिले.
बाबरी आंदोलनाची आठवण करून दिली
भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी बाबरी प्रकरणाचा संदर्भ देत त्या काळातील घटनांची आठवण करून दिली. ते म्हणाले, “मला तेही दिवस आठवत आहेत, ज्यावेळेला बाबरीचा लढा झाला होता. बाबरीचं पतन झालं, बाबरी पाडण्यात आली, त्यावेळी आज जे सत्तेत बसले आहेत त्यापैकी कुणीही छाती पुढे करुन आला नव्हता. त्यावेळी फक्त केवळ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उभे राहिले होते. कारण त्यावेळी भाजपवालेच म्हणत होते की, हे आमचं काम नाही तर असेल तर शिवसैनिकांचं काम असेल.”
यानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा उल्लेख करत म्हटले, “मी स्वत: तेव्हा बाळासाहेबांच्या बाजूला उभा होतो. बाळासाहेबांनी उत्तर दिलं होतं की, जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला शिवसैनिकांचा गर्व आहे. गर्व से कहो हम हिंदू हैं ही घोषणा त्यांनी बुलंद केली होती. अनेक कारसेवकांनी तुरुंगवास भोगला. अनेकांनी बलिदान केलं. अनेक जण त्यावेळी झालेल्या पोलीस अत्याचारात कायमचे अपंग झाले. बाळासाहेबांनी तो धोका डोक्यावर घेतला होता. अनेकांनी जे बलिदान केलं ते या चोरांच्या पोटापाण्याच्या सोयीसाठी केलं नव्हतं.”

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर
रामरक्षा आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “रामरक्षा पाठ आहे का?” असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात थेट उत्तर दिले. ते म्हणाले, “आम्ही मंदिर लुटारुंच्या विरोधात आहोत. फडणवीसांना सांगायचं आहे की आमची टिंगल करण्यापेक्षा तुम्ही मंदिर लुटणाऱ्यांच्या बाजूने आहात की रामरक्षा करणाऱ्यांच्या बाजूने आहात ते आधी स्पष्ट करा. हे आंदोलन म्हणजे रामरक्षा पाठ आहे की नाही? बघण्याचं आंदोलन नाहीय. एखाद्या वर्गाच्या मॉनिटर सारखं बोलू नका की रामरक्षा पाठ आहे की नाही?”
राम मंदिरासह विविध धार्मिक स्थळांबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर टीका केली. ते म्हणाले, “रामरक्षा म्हणजे आपण म्हणतो की, रामाने आपली रक्षा केली पाहिजे. आज रामभक्तांना रामाची रक्षा करण्याची वेळ या रामाच्या नावाने मत मागून सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभारावर करावी लागत आहे. यासारखं हिंदूंचं दुर्दैवं कोणतं? कोणतं असं क्षेत्र आहे ज्यामध्ये भ्रष्टाचार नाही. केदारनाथच्या मंदिरात चोरी झाली आहे. बद्रीनाथच्या मंदिरात चोरी झाली आहे. उज्जैनमध्ये जमीन घोटाळा झाला आहे.”
राम मंदिर निधी आणि जमीन व्यवहारांवर प्रश्नचिन्ह
अयोध्या राम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक व्यवहारांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, “अयोध्येत जमीन घोटाळा झाला आहे. अयोध्येत मंदिराच्या नावाने स्वस्तात जमिनी घेतल्या गेल्या आणि शतपटीने किंमती वाढून ट्रस्टला विकल्या गेल्या आहेत. हे मी नाही तर बाकी सगळे म्हणत आहेत. अनेक जण जे साधू आहेत ते संताप व्यक्त करत आहेत. एका साधूने सांगितलं की, हे मंदिर नाही तर पैसा गोळा करण्याचं भाजपचं केंद्र झालं आहे. काही जण म्हणाले की, तिथे जो काही पैसा गोळा केला गेला, तिथे तिजोरीवर जो डल्ला मारला गेला त्यातून आमदार-खासदार विकत घेतले गेले.”
भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गेलेल्या आमदार-खासदारांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “आज मला त्या गद्दारांनासुद्धा विचारायचं आहे. माझ्यावर आरोप करत होता की, बाळासाहेबांचे विचार सोडले. मी बाळासाहेबांचे विचार घेऊन आजही ठामपणाने उभा आहे. मंदिर चोरांना आम्ही जाब विचारायला उभे आहोत. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही भाजपला प्रश्न विचारुन बघा. तुमच्यात हिंदुत्वाचं अस्सल रक्त असेल तर त्यांनी मंदिर चोरांवर आपली भूमिका स्पष्ट करावी. का नाही करत? कारण ह्यांच्यात दम राहिलेला नाही. लाचार होणार हिंदू नाही.”
नागपुरातील रामरक्षा पठण आंदोलनाद्वारे उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराशी संबंधित कथित गैरव्यवहार, हिंदुत्व, भाजपची भूमिका आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देत केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या आंदोलनानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
