अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा कायापालट
बारामती, दि. १४ : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा सुमारे ११.४० कोटी रुपये खर्चून आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असा पुनर्विकास पूर्ण करण्यात आला असून, हे अद्ययावत स्थानक लवकरच राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे बारामतीच्या रेल्वे पायाभूत सुविधांना नवे बळ मिळणार असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. बारामती रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी सांगितले की, या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी त्यांनी खासदार असताना सातत्याने केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. तसेच दिवंगत अजित पवार उपमुख्यमंत्री असताना देखील या प्रकल्पासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. या संयुक्त प्रयत्नांना यश मिळाल्याने बारामतीकरांचे आधुनिक रेल्वे स्थानकाचे स्वप्न आता साकार झाले आहे.
उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, “१९१४ पासूनचा इतिहास असलेल्या या स्थानकाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर आता झालेले हे आधुनिकीकरण बारामतीच्या प्रगतीला नवी गती देईल. रोज अंदाजे १,८०० प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या या स्थानकावर आता दिव्यांग-अनुकूल सुविधा, आधुनिक प्रतीक्षा कक्ष, पार्किंग आणि सुंदर प्रादेशिक स्थापत्य शैलीचा मिलाफ पाहायला मिळत आहे.”
अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून देशभरातील अनेक रेल्वे स्थानकांचे टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण करण्यात येत असून, प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, स्थानिक संस्कृती व स्थापत्यशैली जपणे, तसेच रेल्वे स्थानकांना आधुनिक स्वरूप देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. त्याच धर्तीवर बारामती रेल्वे स्थानकाचाही सर्वंकष विकास करण्यात आला आहे.
नव्या स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी आधुनिक प्रतीक्षागृहे, सुस्थित पार्किंग व्यवस्था, दिव्यांग-अनुकूल प्रवेश आणि सुविधा, सुधारित प्रवासी सेवा तसेच परिसराचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले आहे. स्थानिक वारसा आणि प्रादेशिक स्थापत्यशैलीचा समन्वय साधत स्थानकाला आधुनिक रूप देण्यात आले असून, त्यामुळे प्रवाशांना अधिक सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
बारामती हे राज्यातील महत्त्वाचे कृषी, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जाते. त्यामुळे आधुनिक रेल्वे स्थानकामुळे या परिसरातील दळणवळण अधिक सक्षम होण्यास मदत होईल. उद्योग, व्यापार, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्रालाही या सुविधांचा मोठा लाभ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी व्यक्त केला.
या पुनर्विकासामुळे बारामती रेल्वे स्थानकाची क्षमता वाढण्याबरोबरच परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल आणि भविष्यातील वाढत्या प्रवासी गरजांची पूर्तता अधिक प्रभावीपणे करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

