ठाणे-पालघरमधील यांत्रिक व यंत्रचलित नौकांसाठी सुधारित आदेश लागू; मत्स्यसंपत्ती संवर्धन आणि मच्छिमारांच्या सुरक्षिततेवर भर
ठाणे, दि. १० : समुद्रातील मत्स्यसंपत्तीचे संवर्धन, मत्स्यप्रजननाला पोषक वातावरण निर्माण करणे तसेच पावसाळ्यात मच्छिमारांच्या जीवित व वित्ताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यापूर्वी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत लागू असलेली बंदी आता १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली असून, यंदा यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांसाठी एकूण ७६ दिवसांची मासेमारी बंदी लागू राहणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्त (तांत्रिक), ठाणे-पालघर दीपाली बांदकर यांनी यासंदर्भातील सुधारित कार्यालयीन आदेश जारी केले आहेत. शासनाने २९ जून २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार पूर्वीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, त्यानुसार १ जून २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांवर समुद्रात मासेमारी करण्यास बंदी राहणार आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे की, पावसाळ्यात बहुतांश समुद्री माशांचा प्रजनन कालावधी सुरू असतो. या काळात मासेमारीवर निर्बंध घातल्यामुळे मत्स्यसंपत्तीचे संवर्धन होण्यास मदत होते. तसेच खराब हवामान, उंच लाटा आणि वादळी परिस्थितीमुळे मच्छिमारांच्या सुरक्षिततेचाही विचार करून ही बंदी लागू करण्यात आली आहे.
भविष्यातील मत्स्यसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि पारंपरिक मच्छिमारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी अनधिकृत मासेमारीला आळा घालणे आवश्यक असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे. सुधारित आदेशाचे उल्लंघन करून कोणतीही नौका समुद्रात बेकायदेशीरपणे मासेमारी करताना आढळल्यास संबंधितांवर लागू सागरी कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
यासंदर्भात सहायक आयुक्त (तांत्रिक), ठाणे-पालघर दीपाली बांदकर यांनी स्पष्ट इशारा देताना म्हटले आहे की, “जी कोणतीही मच्छिमार सहकारी संस्था अशा अनधिकृत मासेमारीला प्रोत्साहन देईल किंवा प्रशासनाला सहकार्य करणार नाही, त्या संस्थेची नोंदणी थेट रद्द करण्याचा प्रस्ताव उपनिबंधक (मत्स्य) यांच्याकडे पाठवला जाईल.”
सुधारित आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व मच्छिमार सहकारी संस्था, त्यांचे पदाधिकारी आणि मच्छिमारांमध्ये व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मासळी उतरविण्याच्या केंद्रांवर, मत्स्यव्यवसाय संस्थांमध्ये तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी माहितीपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स, समाजमाध्यमे आणि कार्यशाळांच्या माध्यमातून नव्या नियमांची माहिती पोहोचविण्यात येणार आहे.
प्रशासनाने सर्व मच्छिमारांना सुधारित आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, बंदीच्या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला दिला आहे. नियमांचे पालन केल्यास मत्स्यसंपत्तीचे संवर्धन होण्यास मदत होईल, भविष्यातील मत्स्यउत्पादन वाढेल आणि मच्छिमारांचे दीर्घकालीन हितही सुरक्षित राहील, असा विश्वास मत्स्यव्यवसाय विभागाने व्यक्त केला आहे.

