मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यमांशी साधला संवाद
मुंबई, दि. ६ : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील आपत्ती निवारण व व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन राज्यातील पूरस्थिती, वाहतूक व्यवस्था, बचावकार्य आणि विविध जिल्ह्यांतील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, “मुंबईत एका महिन्यात होणारा पाऊस गेल्या चार दिवसांमध्येच पडला आहे. त्यामुळे मुंबईत इतकी हानी झाली. राज्यात अतिवृष्टीच्या अनुषंगाने ८ जुलैपर्यंत चिंता करण्याची परिस्थिती आहे.”
मुंबईतील हवामानाचा आढावा देताना त्यांनी सांगितले की, “मुंबईत सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून समुद्राला भरती येणार आहे. या काळात मुसळधार पाऊस झाल्यास काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच या काळात ६० ते ७० किमीच्या वेगाने वारे वाहतील.”
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस कोकण, मुंबई महानगर प्रदेश आणि घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनीही अनावश्यक प्रवास टाळून अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाट परिसरात मोठी दरड कोसळून अख्खा डोंगर रस्त्यावर आल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, “मुंबई गोवा महामार्गावर कशेडी येथे अख्खा डोंगर कोसळून खाली आला. तो ढिगारा काढण्याचे काम सुरु आहे. अभूतपूर्व पावसामुळे या मार्गावर आठ ठिकाणी दरड कोसळली आहे. हा सगळा ढिगारा बाजूला करुन मुंबई गोवा महामार्ग पुन्हा सुरु करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.”
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाजवळही मोठी दरड कोसळल्याने वाहतूक प्रभावित झाली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, “मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंकवर दरड कोसळली. त्यामुळे १०० टन ढिगारा रस्त्यावर आला. ही दरड अशा भागात कोसळली की, जिथे यापूर्वी कधीच दरड कोसळली नव्हती. आतापर्यंत जवळपास ७० टन ढिगारा हटवण्यात आला आहे. उर्वरित ढिगारा हटवून मुंबई-पुणे महामार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबईवरुन पुण्याकडे जायच्या मार्गावरील तीन लेन सुरु आहेत. तर मुंबईकडे येणारी एकच लेन सध्या सुरु आहे. पुढील काही तासांत वाहतूक पूर्ववत होईल.”
राज्यातील इतर भागांतील परिस्थितीबाबतही त्यांनी माहिती दिली. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणीपातळी धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणाले, “याशिवाय, साताऱ्यातही अतिवृष्टी झाली आहे. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे सुरु आहे. आठ तारखेपर्यंत लक्ष देण्यासारखी परिस्थिती आहे.”
राज्य सरकारकडून सर्व जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पूरग्रस्त भागांमध्ये बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

