आरावी व श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला गती; दर्जेदार व पर्यावरणपूरक कामे वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश
मुंबई, दि. २ : रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासाला नवे बळ देण्यासाठी तसेच समुद्रकिनाऱ्यांचा शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकास सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मौजे आरावी (ता. श्रीवर्धन) येथील बीच सुशोभीकरण आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज सविस्तर आढावा घेतला. संबंधित सर्व विभागांनी विकासकामे उच्च दर्जाची, वेळेत आणि पर्यावरणाच्या निकषांचे पालन करून पूर्ण करावीत, तसेच पर्यटकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
मंत्री आदिती तटकरे यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या या आढावा बैठकीस पर्यटन विभागासह विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आरावी आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांच्या विकासासाठी सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला.
बैठकीत आरावी बीच परिसरातील सुशोभीकरणासह पायाभूत सुविधांच्या उभारणीवर विशेष चर्चा करण्यात आली. समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा, सुरक्षित पादचारी मार्ग, सार्वजनिक स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाशयोजना, वाहनतळ, दिशादर्शक फलक तसेच पर्यटकांना आवश्यक असलेल्या इतर मूलभूत सुविधांची कामे नियोजित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या कामांचाही यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. या मानांकनासाठी आवश्यक असलेले स्वच्छता व्यवस्थापन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्था, प्रशिक्षित जीव रक्षकांची उपलब्धता, पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा या सर्व बाबी निर्धारित निकषांनुसार पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले.
बैठकीत पर्यावरण संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत पर्यटन विकासाची दिशा निश्चित करण्यावर भर देण्यात आला. समुद्रकिनाऱ्यांचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखून विकासकामे करण्यात यावीत, तसेच भविष्यातील पर्यटन वाढ लक्षात घेऊन शाश्वत नियोजन करण्यात यावे, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून निर्धारित कालावधीत विकासकामे पूर्ण करावीत. पर्यावरणपूरक आणि शाश्वत पर्यटन विकासाला प्राधान्य देत आरावी व श्रीवर्धन हे समुद्रकिनारे राज्यातील आदर्श पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.”
रायगड जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने आरावी आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना विशेष महत्त्व आहे. या परिसरात दरवर्षी मोठ्या संख्येने देश-विदेशातील पर्यटक भेट देतात. त्यामुळे जागतिक दर्जाच्या सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यावरणीय निकषांची प्रभावी अंमलबजावणी करून या समुद्रकिनाऱ्यांची पर्यटनक्षमता अधिक वाढविण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे.
बैठकीच्या शेवटी संबंधित विभागांनी कामांचा नियमित आढावा घेऊन कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता सर्व विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक समन्वय राखावा, अशा सूचनाही मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

