राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत प्रत्येक पालकांनी सहभागी व्हावे
मुंबई, दि. २७ : राज्यातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून महाराष्ट्राचा पोलिओमुक्त दर्जा कायम राखण्यासाठी रविवार, २८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सर्व पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. राज्यातील एकही पात्र बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले असून राज्यभर मोठ्या प्रमाणावर विशेष पथके कार्यरत राहणार आहेत.
या मोहिमेअंतर्गत राज्यभरात ८९ हजार ४८९ लसीकरण केंद्रे उभारण्यात आली असून २६ हजार ५३० ट्रान्झिट पथके, १३ हजार ५१८ भ्रमणशील पथके आणि ५८६ रात्रपाळी पथके कार्यरत राहणार आहेत. दुर्गम भाग, प्रवासात असलेली मुले तसेच लसीकरण केंद्रावर पोहोचू न शकणाऱ्या बालकांपर्यंतही पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने राबविली जात आहे. महाराष्ट्रात पोलिओचा शेवटचा रुग्ण सप्टेंबर २०१० मध्ये बीड जिल्ह्यात आढळला होता, तर देशातील शेवटचा रुग्ण जानेवारी २०११ मध्ये पश्चिम बंगालमध्ये नोंदविण्यात आला होता. त्यानंतर २७ मार्च २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला अधिकृतपणे पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले. मात्र, शेजारील काही देशांमध्ये अद्यापही पोलिओचे रुग्ण आढळत असल्याने संभाव्य संसर्गाचा धोका कायम असून सातत्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रविवार, २८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत राज्यातील अंदाजे १ कोटी ३ लाख शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक द्विसंयुजी तोंडी पोलिओ लस याचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. प्रत्येक पात्र बालकापर्यंत लस पोहोचविणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
ज्या बालकांना मोहिमेच्या दिवशी लसीकरण केंद्रावर आणणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. शहरी भागात पुढील पाच दिवस, तर ग्रामीण भागात पुढील तीन दिवस आरोग्य कर्मचारी घरपोच जाऊन लसीकरण करणार आहेत. याशिवाय बसस्थानके, रेल्वे स्थानके, महामार्ग, स्थलांतरित कामगारांच्या वस्त्या आणि इतर प्रवासी मार्गांवर विशेष ट्रान्झिट, भ्रमणशील आणि रात्रपाळी पथकांमार्फतही लसीकरणाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.
मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यस्तरावर प्रधान सचिव (सार्वजनिक आरोग्य) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य लसीकरण कृती दलाची बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत सर्व संबंधित शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध यंत्रणांना मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मोहिमेच्या समन्वयासाठी प्रत्येक जिल्हा आणि महानगरपालिकेसाठी राज्यस्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून जिल्हा, तालुका आणि वॉर्ड स्तरावरही स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, आरोग्य कर्मचारी आणि लसीकरण पथकांचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असून जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व शहर लसीकरण कृती दलाच्या बैठका घेऊन सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
याशिवाय मोहिमेसाठी आवश्यक निधी, वित्तीय मार्गदर्शक सूचना तसेच पोलिओ प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा राज्यातील सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. आरोग्य विभागाने प्रत्येक पालकांनी आपल्या शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकाला २८ जून रोजी पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन करत पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
