१ जुलैला मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा
मुंबई, दि. २६ : वसंतराव नाईक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे प्रतिष्ठेचे वसंतराव नाईक कृषी पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आले असून, यंदा राज्यातील विविध जिल्ह्यांतील १८ शेतकरी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक आणि संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन १ जुलै रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात करण्यात आले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विधान भवन परिसरातील मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुरस्कारांची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्याची परंपरा प्रतिष्ठानने जपली आहे.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले की, कृषी क्षेत्रातील नावीन्य, संशोधन, ग्रामीण विकास, जलसंधारण, कृषी प्रक्रिया, महिला सक्षमीकरण, जैवविविधता, पशुसंवर्धन, निर्यात, पत्रकारिता, कृषी साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना या पुरस्कारांद्वारे गौरविण्यात येते. यामुळे राज्यातील शेतकरी, संशोधक आणि कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध घटकांना प्रेरणा मिळते.
प्रतिष्ठानने आतापर्यंत ३०४ शेतकरी आणि ८५ संस्थांचा गौरव केला असून, कृषीविषयक चर्चासत्रे, प्रशिक्षण शिबिरे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विविध उपक्रम सातत्याने राबविले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यंदाच्या पुरस्कारांसाठी गडचिरोली, रत्नागिरी, धुळे, जळगाव, पुणे, कोल्हापूर, पालघर, नाशिक, सांगली, गोंदिया, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, वर्धा, यवतमाळ यांसह राज्याच्या विविध भागांतील शेतकरी, संशोधक आणि संस्थांची निवड करण्यात आली आहे.
यंदाचे पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत :
सामाईक पुरस्कार – किसान मार्केट यार्ड, अध्यक्ष गिरीश अग्रवाल, शेलू (बु.), नांदेड रोड, जि. यवतमाळ.
कृषी उल्लेखनीय योगदान पुरस्कार – डॉ. आदिनाथ चव्हाण, पुणे.
कृषी साहित्य पुरस्कार – सतीश खाडे, पुणे.
कृषी पत्रकारिता पुरस्कार – भिलाजी दिगंबर जिरे, कुडाशी, जि. धुळे.
कृषी निर्यात पुरस्कार – राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनी, अध्यक्ष विकास वीर, करमाळा-कुर्डूवाडी रोड, जि. सोलापूर.
फलोत्पादन पुरस्कार – राजेश श्रीविलास पटवर्धन, रत्नागिरी.
भाजीपाला व रोपवाटिका संवर्धन पुरस्कार – वैभव उघडे, वर्धा.
दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन पुरस्कार – गौ ॲग्रोटेक कोल्हापूर ऑर्डर फार्मर प्रोड्युसर कंपनी, अध्यक्ष योगेश खराडे, शिंदेवाडी, जि. कोल्हापूर.
जलसंधारण पुरस्कार – डॉ. सुमंत पांडे, बाणेर, पुणे.
आधुनिक फुलशेती पुरस्कार – दादासाहेब दौलतराव शिंदे, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर.
सामाजिक वनीकरण पुरस्कार – विशाल वसंतराव पाटील, सोयगाव, मालेगाव आणि संदीप मधुकर लोहारकर, संगमेश्वर, मालेगाव.
महिला केंद्रित ग्रामविकास पुरस्कार – योगेश्वरी चौधरी, दाव्वा, जि. गोंदिया.
पुनर्जीवित शेती पुरस्कार – सदाशिव वामनराव अडकिने, इंजनगाव पश्चिम, जि. हिंगोली.
नाविन्यपूर्ण शेतकरी पुरस्कार – अमित बाजीराव पाटील, कोल्हापूर.
कृषी प्रक्रिया पुरस्कार – सुश्रुत पाटील, वाणगाव, जि. पालघर.
रेशीम उद्योग पुरस्कार – जीवन अशोक चिप्रीकर आणि अश्विनी चिप्रीकर, कवठेएकंद, जि. सांगली.
जैवविविधता पुरस्कार – शंकर बाबा शिंदे (गिधाडबाबा), चिंचवडचा खोरीपाडा, जि. नाशिक.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी राज्यातील शेतकरी, कृषी क्षेत्रातील संशोधक, स्वयंसेवी संस्था आणि कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि शाश्वत शेती पद्धतींचा स्वीकार करून कृषी विकासाला चालना द्यावी, असे आवाहन केले. तसेच आगामी काळातही कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्याची परंपरा कायम ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा १ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात पार पडणार असून, राज्यभरातील कृषी क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, संशोधक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

