जनगणना २०२७ : महाराष्ट्रातील गृहसूची आणि गृहगणनेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण
मुंबई, दि. १६ : देशातील आगामी जनगणना २०२७ अंतर्गत महाराष्ट्रात राबविण्यात आलेला गृहसूची आणि गृहगणनेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. राज्यभरात दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत ही व्यापक मोहीम राबविण्यात आली. या टप्प्यात घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा, मूलभूत सोयी-सुविधा आणि कौटुंबिक मालमत्तांबाबतची महत्त्वपूर्ण माहिती संकलित करण्यात आली असून आगामी मुख्य लोकसंख्या प्रगणनेसाठी आवश्यक पायाभूत माहिती तयार झाली आहे.
या कालावधीत प्रगणकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित केली. केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या एकूण ३३ प्रश्नांच्या आधारे मोबाईल अनुप्रयोगाच्या माध्यमातून माहिती नोंदविण्यात आली. या प्रश्नांमध्ये घरांचे स्वरूप, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छता सुविधा, ऊर्जा वापर, मालमत्ता, संवाद साधने आणि इतर कौटुंबिक सुविधांशी संबंधित बाबींचा समावेश होता.
जनगणना प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी दिलेली सर्व वैयक्तिक माहिती कायद्याच्या चौकटीत पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय ठेवली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेली माहिती कोणत्याही वैयक्तिक किंवा व्यावसायिक उद्देशासाठी वापरली जाणार नसून ती केवळ सांख्यिकीय आणि नियोजनात्मक कामांसाठीच उपयोगात आणली जाईल.
गृहसूची आणि गृहगणनेच्या या पहिल्या टप्प्यामुळे राज्यातील निवासस्थानांची सद्यस्थिती, नागरिकांना उपलब्ध असलेल्या सुविधा आणि कौटुंबिक मालमत्तांचे वास्तव चित्र समोर येणार आहे. याच माहितीच्या आधारे फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या मुख्य लोकसंख्या प्रगणनेचा आराखडा अधिक अचूकपणे तयार करता येणार आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाची नोंद जनगणनेत सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्हे आणि २९ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ही मोहीम एकाच वेळी राबविण्यात आली. जनगणना प्रक्रिया सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी राज्यात एकूण २ लाख २० हजार ५१४ गृहसूची क्षेत्रांची आखणी करण्यात आली होती. प्रत्येक क्षेत्राची जबाबदारी स्वतंत्र प्रगणकांकडे सोपविण्यात आली होती. तसेच प्रत्येक सहा प्रगणकांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एका पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती.

ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी राज्यभरातील प्रशासन यंत्रणा मोठ्या प्रमाणावर कार्यरत होती. या उपक्रमात ३४ जिल्हाधिकारी, २९ महानगरपालिका आयुक्त, एकूण ६३ मुख्य जनगणना अधिकारी, ९४७ चार्ज अधिकारी, १४१ मुख्य प्रशिक्षक, ३ हजार ८५० क्षेत्र प्रशिक्षक तसेच सुमारे २ लाख ४५ हजार प्रगणक आणि पर्यवेक्षक सहभागी झाले होते. जनगणना कार्यासाठी विशेष प्रशिक्षण, तांत्रिक साधने आणि डिजिटल प्रणालींचा वापर करण्यात आला.
देशातील यापूर्वीची जनगणना सन २०११ मध्ये पार पडली होती. आगामी जनगणना २०२७ ही भारताची १६ वी तसेच स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना ठरणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल पद्धतीने माहिती संकलित करण्याचा हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
पहिला टप्पा निर्धारित कालावधीत यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र जनगणना संचालनालयाने सर्व प्रगणक, पर्यवेक्षक, प्रशिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक केले आहे. तसेच या मोहिमेला सक्रिय सहकार्य करणारे नागरिक, महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका यंत्रणा आणि प्रसारमाध्यमांचेही संचालनालयाने आभार मानले आहेत.
आगामी फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या मुख्य लोकसंख्या प्रगणनेसाठी प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली असून, राज्यातील प्रत्येक नागरिकाची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे. जनगणना २०२७ ही राज्याच्या विकास आराखड्यांसाठी, शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि भविष्यातील धोरणात्मक निर्णयांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
