नागरिक, कामगार आणि उद्योग क्षेत्राकडून सूचना-हरकतींचे स्वागत
मुंबई, दि. १५ : राज्यातील कामगार व्यवस्थेला अधिक पारदर्शक, सुसंगत आणि आधुनिक स्वरूप देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने लागू केलेल्या नव्या कामगार संहितांच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय नियमावलींचा मसुदा तयार केला असून तो सार्वजनिक अभिप्रायासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मसुद्यावर उद्योग क्षेत्र, कामगार संघटना, कर्मचारी, नियोक्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आपापल्या सूचना आणि हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन कामगार विभागाकडून करण्यात आले आहे.
कामगार कायद्यांमध्ये व्यापक सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र शासनाने दि. २१ नोव्हेंबर २०२५ पासून देशभरात चार महत्त्वपूर्ण कामगार संहितांची अंमलबजावणी सुरू केली आहे. यामध्ये वेतन संहिता २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता २०२० आणि व्यावसायिक आरोग्य, सुरक्षा व कामाची स्थिती संहिता २०२० या संहितांचा समावेश आहे. या नव्या व्यवस्थेद्वारे पूर्वी अस्तित्वात असलेले एकूण २९ स्वतंत्र कामगार कायदे एकत्रित करून अधिक सुलभ आणि एकसंध कायदेशीर चौकट तयार करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्यातील कामगार, कर्मचारी, नियोक्ते, उद्योग संस्था आणि विविध घटकांच्या गरजा लक्षात घेऊन राज्य नियमांचा मसुदा तयार केला आहे. संबंधित मसुदा शासनाच्या कामगार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून सर्व संबंधितांनी त्याचा अभ्यास करून आपली मते शासनापर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
नव्या कामगार संहितांमुळे वेतन व्यवस्थापन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा योजना, कामगारांचे आरोग्य व सुरक्षा, कामाच्या ठिकाणावरील सुविधा आणि कामगार हक्क यांसारख्या महत्त्वाच्या विषयांमध्ये व्यापक बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे या नियमावलींचा उद्योग क्षेत्र, कर्मचारी वर्ग आणि रोजगार बाजारावर दूरगामी परिणाम होणार असल्याने सर्व संबंधित घटकांचा सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, मसुद्याबाबतच्या सूचना आणि हरकती अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत सादर कराव्यात. प्राप्त झालेल्या सूचना आणि हरकतींचा विचार करून अंतिम नियमावली तयार करण्यात येणार आहे. यामुळे धोरणनिर्मिती प्रक्रियेत नागरिकांचा आणि संबंधित घटकांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे.
कामगार आयुक्त कार्यालय, कामगार भवन, बांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१ येथे लेखी स्वरूपात सूचना पाठविता येणार आहेत. तसेच mh-labourcodes@gmail.com वर ई-मेलद्वारेही अभिप्राय स्वीकारण्यात येणार असून संबंधित सूचना व हरकती निर्धारित कालावधीत सादर करण्याचे आवाहन मुंबई शहरचे कामगार उपायुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
कामगार क्षेत्रातील बदलत्या गरजा, डिजिटल युगातील रोजगार व्यवस्था आणि उद्योग क्षेत्रातील नव्या आव्हानांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या या नियमावलींमुळे राज्यातील कामगार व्यवस्थापन अधिक परिणामकारक, उत्तरदायी आणि आधुनिक बनविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे कामगार विभागाकडून सांगण्यात आले आहे. नागरिक, कामगार संघटना आणि उद्योग क्षेत्राच्या सहभागातून अंतिम नियमावली अधिक सर्वसमावेशक आणि परिणामकारक होईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

