सह्याद्री अतिथीगृह येथे धारावी पुनर्विकास प्रकल्पाची आढावा बैठक संपन्न
मुंबई, दि. ८ : आशियातील आधुनिक शहरी विकासाच्या आदर्श नमुन्यांपैकी मानल्या जाणाऱ्या सिंगापूर आणि हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा सर्वंकष पुनर्विकास करण्यात येणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या केंद्रस्थानी धारावीतील रहिवासी, त्यांची उपजीविका आणि स्थानिक सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्ट्ये असतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. प्रकल्पाची अंमलबजावणी करताना नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत नियोजित कालावधीत काम पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला मुंबईच्या महापौर रितू तावडे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदानी, व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदाना, अजित बारोडिया तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पाचे सादरीकरण करून भविष्यातील आराखडा आणि प्रगतीची माहिती देण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, धारावी पुनर्विकास हा केवळ झोपडपट्टी पुनर्वसन किंवा बांधकाम प्रकल्प नसून लाखो नागरिकांच्या जीवनमानात परिवर्तन घडवून आणणारा सामाजिक आणि आर्थिक विकासाचा उपक्रम आहे. धारावीतील पारंपरिक उद्योग, लघुउद्योग, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक रचना अबाधित ठेवत आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
धारावीतील कुंभारवाडा परिसराचा विशेष उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, हा भाग केवळ मातीच्या भांड्यांच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध नसून तो मुंबईच्या सांस्कृतिक आणि पर्यटन वारशाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे त्याचे वैशिष्ट्य जपण्यासाठी संबंधित घटकांशी चर्चा करून योग्य नियोजन करण्यात यावे.
प्रकल्पांतर्गत पर्यावरणीय संतुलन राखण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. धारावी परिसरात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी ‘नेचर पार्क’ संकल्पना विकसित करण्यात येणार असून झाडांचे पुनर्रोपण तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाची योजना राबविण्यात येणार आहे. आधुनिक शहरी विकासासोबत पर्यावरणपूरक दृष्टीकोन स्वीकारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
पहिल्या टप्प्यात सन २०२८ पर्यंत किमान दहा हजार कुटुंबांना नवीन घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पात्र रहिवाशांना स्वतंत्र स्वयंपाकघर, शयनकक्ष, स्वच्छतागृह, पुरेसा नैसर्गिक प्रकाश आणि सुरक्षित वास्तव्याच्या सर्व सुविधा असलेली घरे दिली जाणार आहेत. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह सुविधा हा प्रकल्पाचा विशेष घटक असणार आहे.
धारावीतील चामडे उद्योग, वस्त्रनिर्मिती, पुनर्वापर उद्योग, मातीची भांडी निर्मिती, खाद्यपदार्थ उद्योग आणि इतर पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी विशेष सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग योजना तयार केली जात आहे. स्थानिक उद्योजकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगारनिर्मिती आणि महिला सक्षमीकरणावरही भर दिला जाणार आहे. खाद्यपदार्थ व्यवसायांसाठी आधुनिक सामायिक स्वयंपाकगृहांची संकल्पना विकसित करण्याचा प्रस्तावही या प्रकल्पात समाविष्ट आहे.
देशातील पहिला बहुविध वाहतूक केंद्र धारावीत
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे देशातील पहिले अत्याधुनिक बहुविध वाहतूक केंद्र उभारण्याची योजना. या केंद्राद्वारे पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्ग, विविध मेट्रो मार्ग तसेच भविष्यातील द्रुतगती रेल्वे सेवांची जोडणी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
प्रवाशांसाठी शहरातच विमान प्रवासापूर्वी सामान नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर विशेष द्रुत वाहतूक व्यवस्थेद्वारे विमानतळापर्यंत सहज पोहोचता येणार आहे. याशिवाय जलवाहतुकीसाठी आधुनिक धक्के, तसेच भविष्यातील हवाई टॅक्सी सेवांसाठी आवश्यक सुविधा विकसित करण्याचाही आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे, मेट्रो, रस्ता, जलमार्ग आणि हवाई वाहतूक या सर्व सुविधा एकाच केंद्रातून उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
बीकेसी ते धारावी परिसराचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रूपांतर
प्रकल्पांतर्गत बीकेसी ते धारावी या संपूर्ण पट्ट्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. विस्तीर्ण हरित पट्टे, आकर्षक पदपथ, आधुनिक वास्तुरचना आणि सार्वजनिक सुविधा विकसित करून या परिसराला जागतिक दर्जाचे स्वरूप देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बस डेपो आणि इतर मोकळ्या जागांवर आधुनिक निवासी व व्यावसायिक संकुले उभारण्यात येणार आहेत.
दहा वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विविध टप्प्यांचे नियोजन निश्चित करण्यात आले असून पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुमारे बेचाळीस महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. माटुंगा परिसरातील पुनर्वसनासाठी एकोणचाळीस महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील घरे मार्च २०२८ पर्यंत लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे जमिनींचा विकास, पुनर्वसन इमारती, पर्यावरणीय परवानग्या, झोपड्यांचे स्थलांतर आणि आवश्यक पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा सादर केला. प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध असून सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास धारावीचा कायापालट निश्चित वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
मुंबईच्या शहरी विकासाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक मानला जाणारा धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आधुनिक निवास, रोजगार, वाहतूक, पर्यावरण आणि जीवनमान या सर्व क्षेत्रांत नवा आदर्श निर्माण होईल, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.
